Lumpy Skin Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : संकरित जनावरांना ‘लम्पी स्कीन’चा धोका अधिक

लम्पी स्कीन आजाराचे विषाणू प्रामुख्याने माश्‍या आणि डास आणि टिक्स यांसारख्या कीटकांच्या चावण्याने पसरतात. साधारणत: ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. विषाणू संक्रमण झाल्यावर १ ते २ आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागांत संक्रमण होते.

Team Agrowon

डॉ. आर. बी. अंबादे, डॉ. एस. एस. सोले

लम्पी स्कीन (Lumpy Skin) हा जनावरांतील संसर्गजन्य, विषाणूजन्य आजार आहे. हा पॉक्सविरिडे कुटुंबातील कॅप्रीपोक्स व्हायरस (Capripox Virus) वंशाशी संबंधित आहे.

या आजारामध्ये जनावराला ताप येणे, डोळ्यांतून पाणी येणे, हायपरसलायव्हेशन आणि वैशिष्ट्यपूर्ण त्वचेचा उद्रेक यांचा समावेश होतो. रोगाचा निदान हिस्टोपॅथॉलॉजिकली, व्हायरस आयसोलेशन किंवा पीसीआरद्वारे केले जाते.

या विषाणूचे शेळी, मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येते. मात्र हा आजार शेळी, मेंढ्यात अजिबात होत नाही.

या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. रोगाच्या प्रादुर्भाव गोवंशात (३० टक्के) म्हशीच्या (१.६ टक्का) तुलनेत अधिक प्रमाणात आहे.

सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरांत तीव्रता अधिक असते. आजाराचे विषाणू प्रामुख्याने माश्‍या आणि डास आणि टिक्स यांसारख्या कीटकांच्या चावण्याने पसरतो.

हे फोमाइट्सद्वारे देखील प्रसारित केले जाऊ शकते आणि काही वेळा प्राण्यांपासून प्राण्यांमध्ये सुद्धा प्रसार होऊ शकतो.

आजार सर्व वयोगटात होत असला तरी लहान वासरे ही प्रौढ जनावरांच्या तुलनेने अधिक प्रमाणात बळी पडतात. हिवाळ्यातील थंडी वातावरणात प्रसार कमी होतो. रोगामुळे मरतुकीचे प्रमाण कमी असले, तरी बाधित जनावरे अशक्त होत जातात.

त्यांचे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटते, काही वेळा गर्भपात होतो. प्रजनन क्षमता घटते. त्वचा खराब झाल्याने जनावर विकृत दिसते. हा आजार मनुष्यास होईल याची भीती अनेक पशुपालकांत निर्माण झाली आहे.

परंतु शंभर वर्षाच्या इतिहासात हा आजार मनुष्यास प्रसारित झाल्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही.

प्रसार

मुख्यत्वे चावणाऱ्या माशा (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉइडीस) यांच्यामार्फत होतो.

विषाणूचा संसर्ग निरोगी, बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. साधारणत: ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. विषाणू संक्रमण झाल्यावर १ ते २ आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये राहतो.

त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्राव, डोळ्यांतील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होते. त्यातून इतर जनावरांना याचा प्रसार होऊ शकतो.

त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ (३५ दिवस) जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा प्रसार कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो.

गाभण जनावरांत प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो. दूध पिणाऱ्या वासरांना आजारी गायीच्या दुधातून व सडावरील व्रणातून रोग प्रसार होतो.

निदान

त्वचेवरील व्रणाच्या खपल्या, रक्त, रक्तजल नमुने गोळा करून त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून निदान जाते.

लम्पी स्कीन आजाराचा जनुकीय डीएनए जनावराच्या त्वचा बायोप्सीवरून निदान करता येते. तसेच विशिष्ट जनुक (P३२) वापरून LSDV च्या संदर्भ स्ट्रेनच्या तुलनेत EDTA रक्तामधील लम्पी स्कीन डिसिज व्हायरसच्या (LSDV) जीनोमिक डीएनएचे पॉलिमरेझ चेन रिअक्शन अम्प्लिफिकेशनकरून निदान करता येते.

आजारामुळे शरीरातील जैवरासायनिक बदल

रक्तातील विश्‍लेषणाने असे दिसून आले, की जनावरांत ल्युकोपेनिया, लिम्फोपेनिया आणि प्रारंभिक अवस्थेत मॅक्रोसाइटिक ॲनिमिया तर शेवटच्या टप्प्यात हायपोक्रोमिक मायक्रोसायटिक ॲनिमिया आणि थ्रोम्बोसाइटोसिस दिसून आले.

आजारात सिरम बायोकेमिकल्स विश्‍लेषणात असे दिसून आले, की सिरम एएसटी आणि एएलपी पातळीमध्ये वाढ झालेली दिसली.

आजारामध्ये हायपोअल्ब्युमिनिमिया दिसून आले आहे. तसेच सिरम प्रोटीन, बिलिरुबिन, ब्लड युरिया नायट्रोजन आणि सिरम क्रियाटिनिन या जैवरसायनिकात कोणतेही बदल झालेले दिसून आले नाही.

आजारी जनावरातील प्रभावित जैवरासायनिक बदलामुळे हे निदान उपचारांमध्ये निश्‍चितच मदत करणारे आहे.

उपचार

आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध नाही. तरीही इतर आजारांच्याबरोबरीने गुंतागुंत होऊ नयेत म्हणून आवश्यक उपचार तातडीने केल्यास जनावर पूर्णपणे बरे होते.

प्रतिजैविके ज्वरनाशक, अँटी हिस्टॅमिनिक औषधे, प्रतिकारशक्ती वर्धक जीवनसत्त्व अ, ई, शक्तिवर्धक ब जीवनसत्त्व तसेच त्वचेवरील व्रणासाठी अँटिसेप्टिक / फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर केला जातो.

आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने जिवाणू प्रतिबंधक औषधी म्हणजे प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.

शिफारशीत इंजेक्शन द्यावे. वेदनाशामक व अँटी हिस्टॅमिनिक औषधांचा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.

जनावरास मऊ व हिरवा चार व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.

तोंडातील व्रणास २ टक्के पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरोग्लिसरीन लावावे. लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.

नियंत्रण

भारतात सध्याच्या काळात आजाराच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे नियंत्रणासाठी विविध उपाययोजनेचा अवलंब करावा.

बाधित जनावरांना वेगळे करावे. बाधित आणि निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत. बाधित भागातून जनावरांची ने-आण बंद करावी. साथीच्या काळात गाव तसेच परिसरातून गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी.

बाधित जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी योग्य पोशाख परिधान करावा. हात अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझरने धुऊन घ्यावेत. जनावरांची तपासणी झाल्यांनतर कपडे, फुटवेयर गरम पाण्यात धुऊन निर्जंतुक करावेत.

साथीच्या काळात बाधित भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश टाळावा. गोठ्यात भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी. जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने कमीत कमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून विल्हेवाट लावावी.

बाधित जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे की, वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करावे.

नियंत्रणासाठी माशा, डास, चिलटे व गोचीड इत्यादींचे निर्मूलन करावे. यासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता द्यावी.

आजाराने बाधित जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन दिल्यास गोचीड नियंत्रण होऊन प्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे. बाधित परिसरात स्वच्छता करावी. निर्जंतुक द्रावणाची फवारणी करून परिसर निर्जंतुक करावा. याकरिता १ टक्का फॉर्मलिन किंवा २ ते ३ टक्के सोडिअम हायपोक्लोराइटचा वापर करावा.

लक्षणे

बाधित जनावरांमध्ये सुप्त काळ साधारणपणे २ ते ५ आठवडे एवढा असतो.

प्रथम जनावराचे डोळे, नाकातून पाणी येते. लसिका ग्रंथींना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो, दुग्ध उत्पादन कमी होते.

त्वचेवर हळूहळू १० ते ५० मिमी व्यासाच्या गाठी डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागांत येतात.

सुरवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. त्यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय, व जननेद्रिय इत्यादी भागांत येतात.

काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चार चघळण्यास त्रास होतो. डोळ्यांतील व्रणामुळे चिपाडे येतात, निमोनिया व श्‍वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.

पायांवरील व्रणामुळे सांधे व पायामध्ये सूज येऊन जनावरे लंगडतात.

प्रादुर्भावामुळे जनावरात फुफ्फुसदाह किंवा कासदाहाची बाधा होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेट्ची संख्या कमी होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT