महारुद्र मंगनाळे
लम्पी रोगामुळे अनेक दिवस जनावरांचे बाजार बंद होते.तीन आठवड्यापासून पुन्हा बाजार सुरू झालाय.मला एक म्हैस आणि खोंड विकायचं होतं.
त्यातही ही देखणी म्हैस शक्य तेवढ्या लवकर विकायची होती.ही म्हैस मारकी आहे.पाच महिन्यांपूर्वी म्हशी चारत असताना,ही म्हैस मला मारायला पळत आली होती.तेव्हाच मी विकायचं ठरवलं होतं.
पण तेव्हा ती चार महिन्यांची गाभण होती.तीस हजारांपर्यंत विकली असती.आणखी चार -पाच महिने तिला सांभाळू असं गडी बोलला.त्यामुळं ती राहिली.तिनं मला बघितलं की, बांधलेल्या ठिकाणी ती मारण्याचा पवित्रा घ्यायची.
मी सावध राहायचो.इतरांनाही ती जवळ येऊ देत नव्हती.वामन आणि नरेशच तिला चारापाणी करायचे.तिला दहावा महिना लागल्याने विकणे गरजेचे होते.दोघे-तिघेजण येऊनही गेले पण आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं,नवीन माणसांना ती मारते.
तिला बाजारला नेणं हाच पर्याय होता.आज जांबच्या बाजारला जायचं ठरलं होतं.काल सायंकाळी जांबच्या बाजारात म्हशींचा व्यापार करणारे कापसे शेतात शेडवर आले.त्यांना म्हैस पसंद पडली. ती मारकी आहे,याचा अनुभवही त्यांनी घेतला.