Management of Goats Sheep
Management of Goats Sheep Agrowon
ॲनिमल केअर

Goat Farming : हिवाळ्यातील शेळी, मेंढीचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. संजय भालेराव, डॉ. विकास सरदार

शेळी, मेंढीच्या (Management of Goats Sheep) गोठ्याची रचना ही इंग्रजी A अक्षरासारखी असावी. शेळ्या, मेंढ्यांना फार खर्चिक गोठ्याची आवश्यकता नसते. गोठे थोड्या उंचावर बांधणे आवश्यक असते. गोठे (Goat Shed) कोरडे, हवेशीर असावेत. हिवाळ्यात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे गोठ्यामध्ये ओलावा (Moisture) जास्त वेळ टिकून राहतो आणि तापमान कमी होते. गोठ्याची दिशा ठरवताना दक्षिण-उत्तर किंवा पूर्व-पश्‍चिम बाजूने ठेवल्यास सकाळी आणि सायंकाळी कोवळ्या सूर्यकिरणांमुळे गोठ्यातील ओलसरपणा कमी होतो.

सूर्यकिरणामुळे जंतुनाशक प्रक्रिया होऊन गोठे निर्जंतुक होण्यास मदत होते. गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा. गोठ्यातील जमिनीत चुनखडी किंवा मुरमाचा वापर केल्यास ओलसरपणा कमी होतो. जमिनीचे तापमान कमी करण्यास प्रतिबंध करता येतो. गोठ्यांच्या आजूबाजूला मोकळी जागा असावी. गोठ्याच्या दोन्ही बाजूस जागा ठेवून कुंपण करावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी. 

१) वयोमानाप्रमाणे शेळी, बोकड आणि लहान करडांची व्यवस्था करावी. आजारी आणि सांसर्गिक आजार झालेल्या (उदा. फुफ्फुसाचा आजार, जंत इत्यादी) करडांना ताबडतोब वेगळे करावे. हिवाळ्यात करडे, कोकरांचा निवारा उबदार असावा, अन्यथा त्यांच्या शरीराचे तापमान कमी होऊन ते जीवघेणे होऊ शकते.

२) दिवसा गोठ्याची दारे व खिडक्या खुल्या ठेवावीत, जेणेकरून हवा खेळती राहील. रात्री गोणपाट किंवा पोते यांनी शेड नीट झाकावे. जेणेकरून थंड हवा आत येण्यास प्रतिबंध होईल.
३) करडे, कोकरांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २ ते ३ दिवसांनी बदलावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वच्छ आणि अमोनिया मुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसांना दाह निर्माण करून खोकला, श्‍वसन संस्थेचे विकार निर्माण करतो. यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होतो.

४) कोकरांना थंडी जास्त वाजत असेल तर छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. त्यामुळे करडांना सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही याची काळजी घ्यावी. साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी. विजेचा दिवा साधारणपणे करडांपासून २० इंचांपेक्षा जास्त उंचीवर छताला टांगावा. विजेचा दिव्याला संरक्षक पिंजरा असावा.

५) करडे, कोकरांना स्वच्छ आणि कोमट पाणी पिण्यासाठी दिले, तर त्यांची मूत्रसंस्था सुस्थितीत राहण्यास मदत होते. एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात (तापमान ४० ते ४५ अंश सेल्सिअस) ४ ते ५ मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या गोणपाटात लपेटावे. कोरड्या जागी ठेवावे, कोमट दूध पाजावे.

६) नवजात करडाला त्याच्या वजनाच्या १/१० इतका चीक (पहिले दूध) द्यावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २ टक्के ते ३ टक्के कमी करता येते. 


७) शेळ्या,मेंढ्यांचे मुक्त संचार पद्धतीने संगोपन केले जात असेल, तर त्या ठिकाणी एका कोपऱ्यात एखादा बंदिस्त गोठा जरूर असावा. जेणेकरून रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या तेथे जाऊन बसतील. थंडीपासून संरक्षण होईल.

८) शेळ्या, मेंढ्या आणि लहान करडांना सकाळच्या वेळी कोवळ्या उन्हात मोकळे सोडावे, जेणेकरून त्यांना सूर्यप्रकाशातून ऊब मिळेल.

हिवाळ्यातील आहार व्यवस्थापन ः
१) शेळ्या, मेंढ्यांच्या वजनवाढीसाठी हा काळ योग्य असल्यामुळे वजनाच्या अर्धा टक्के किंवा १०० ते २५० ग्रॅम खुराक द्यावा.
हिवाळ्यात वाढत्या वयाच्या करडांना जास्त चांगल्या प्रतीचा चारा आवश्यक असतो. याशिवाय ३ ते ४ आठवड्यांनंतर करडांना दररोज प्रत्येकी ५० ग्रॅम आंबोण मिश्रण आणि खातील तेवढी हिरवी वैरण देणे आवश्यक आहे.

२) आंबोणाचे रोजचे प्रमाण हळूहळू वाढवत जाऊन रोज प्रत्येकी २५० ग्रॅमपर्यंत आणावे. साधारणत: चार महिन्यांनंतर वयात येईपर्यंत, मटणासाठी विकण्यापर्यंत त्यांना चांगल्या प्रकारची वैरण पुरेशी असते. ती उपलब्ध नसल्यास वैरणीशिवाय २०० ते २५० ग्रॅम आंबोण मिश्रण करडांना मिळणे आवश्यक आहे. चरण्याच्या जोडीला घन आहार दिल्यास उच्चतम वाढ दर मिळतो.

३) करडांच्या आहाराचे दोन भाग म्हणजे वैरण आणि आंबोण. आंबोण म्हणजे प्रथिने, ऊर्जा पुरवणारे खाद्य घटक म्हणजे वेगवेगळी धान्ये (मका, गहू, ज्वारी) आणि त्यांचे दुय्यम पदार्थ (उदा. कोंडा आणि पॉलिश गव्हाचा कोंडा वगैरे). प्रथिने पुरवण्याकरिता वेगवेगळ्या तेलबियांच्या पेंडीचा (उदा. शेंगदाणा, तीळ, सरकी, सोयाबीन, सूर्यफूल, खोबरे, करडई वगैरे) समावेश करावा. याशिवाय डाळ तयार झाल्यावर उपलब्ध होणारी चुणी (तूर, चणा, उडीद चुणी इ.) सुद्धा प्रथिनांच्या दृष्टीने उपयुक्त आहे. यातून शरीर थंडीत उबदार राहण्यास मदत होते.

४) आहार बदल हळूहळू करावा. अचानक करू नये नाहीतर त्यातून आजार आणि पोटफुगी होते. शेळ्यांना ओला व सुका चारा देणे गरजेचे आहे. आहार नेहमी जास्त ऊर्जा निर्माण करणारा ठेवावा, कारण थंडीत शरीराचे तापमान नियमित ठेवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज भासते. 

आजार आणि उपाययोजना ः
१) आजाराचे मुख्य कारण म्हणजे जिवाणू, विषाणू आणि जंत प्रादुर्भाव. थंडीमध्ये आजार लवकर पसरतात कारण जिवाणू व विषाणू थंड तापमानात जास्त वेळ टिकून राहतात, त्यामुळे गोठा जंतुनाशकाने आठवड्यातून १ ते २ वेळा धुवावा. 
२) बाह्य परजीवीची हिवाळ्यात अंधाऱ्या, थंड आणि ओलसर जागेत झपाट्याने वाढ होते. ज्या करडांमध्ये जंत प्रादुर्भाव असेल ती करडे कमकुवत आणि संथ असतात. शरीरातील लोह आणि धातूचे प्रमाण कमी होऊन वजनात घट होते आणि शरीर खंगते. परजीवीमुळे लहान करडांना काही आजार होतात.

३) रक्ती हगवणीमध्ये करडांची वाढ खुंटते किंवा ती अतिसाराने मरण पावतात. आतील आणि बाह्य परजीवीमुळे करडांना शरीराचे तापमान हिवाळ्यात स्थिर राखणे अवघड जाते.
४) जंत हे अन्नद्रव्ये, अन्नरस आणि रक्ताचे शोषण करतात. आतड्यातील अन्नद्रव्ये शोषण करणाऱ्या ग्रंथीना इजा पोहोचवितात. त्यामुळे अनेमिया (पंडुरोग) होतो. आजूबाजूच्या परिसरात चरण्यासाठी गवतावर दव असताना सकाळी सकाळी सोडू नये. कारण या वेळात जंतांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.

५) करडांना आजार झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा तो होऊ न देणे अधिक चांगले. म्हणून करडांना ठरल्यावेळी रोगप्रतिबंधक लस आणि जंतुनाशक औषधे द्यावीत. शेळ्यांना लस कधीही आजार आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट साथीमध्ये आजारी शेळीला लस दिल्यास तो आजार बरा न होता बळावतो.

६) हिवाळ्यात करडांवरील पिसू, गोचिड यांचे योग्य वेळेस नियंत्रण करणे आवश्यक आहे. अन्यथा, हे करडांच्या अंगावर, केसांच्या खाली राहून त्यांचे रक्त पितात. यामुळे करडू अस्वस्थ होते आणि त्यांना रक्तक्षय होण्याची शक्यता असते. त्यांच्या चावण्यामुळे खाज सुटते आणि करडू शरीरावर तोंडाने चावा घेते. यामुळे तेथील केस गळणे, जखमा होतात. उवा, पिसू, गोचीड यांचा उपद्रव टाळण्यासाठी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने गोचिडनाशकाचा वापर करावा. संपूर्ण अंगावर हे द्रावण लावावे. द्रावण तोंड, डोळे या ठिकाणी लावू नये. हे द्रावण पोटात गेल्यास विषबाधा होऊ शकते.

संपर्क ः डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५
(पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

Groundnut Flower : मका पोटरीत, तर भुईमूग फुले लागण्याच्या अवस्थेत

Fire in Nainital forest : नैनितालच्या जंगलात भीषण आग; लष्करासह, हवाई दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

SCROLL FOR NEXT