Animal Care Agrowon
कृषी पूरक

Animal Care : पशुरोग निदानासाठी महत्त्वाच्या चाचण्या

Team Agrowon

डॉ.वर्षा देविदास थोरात, डॉ.मनोजकुमार आवारे

Veterinary Diagnosis : रोगनिदानात प्रयोगशाळेत विविध चाचण्या केल्या जातात. शरीरातील विशेष द्रव जसे रक्तजल, दूध, रक्त, मूत्र, शेण, सायनोव्हिअल द्रव, सेरेब्रोस्पायनल द्रव इत्यादी बाबी तसेच प्रत्यक्ष शरीराची आधुनिक उपकरणाद्वारे रोगनिश्चिती करून त्वरित उपचार करणे पशुवैद्यकांना शक्य होते.



पशुसंगोपनामध्ये आरोग्याला अनन्यसाधारण महत्व आहे. जनावरांना निरनिराळे आजार होत असतात. या आजारांचे  नेमके निदान करणे आवश्यक असते. जनावरांच्या शारीरिक बदलावरून आजारी जनावर कळते परंतु आपण जर प्रयोगशाळेत तपासणी केली तर रोगाचे निश्चितीकरण करून तो लवकर बरा करता येतो. याचबरोबर साथीच्या आजारामध्ये सुद्धा रोगनिश्चिती ही रोग नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.  

रोगनिदानात प्रयोगशाळेत विविध चाचण्या केल्या जातात. शरीरातील विशेष द्रव जसे रक्तजल, दूध, रक्त, मूत्र, शेण, सायनोव्हिअल द्रव, सेरेब्रोस्पायनल द्रव इत्यादी बाबी तसेच प्रत्यक्ष शरीराची आधुनिक उपकरणाद्वारे रोगनिश्चिती करून त्वरित उपचार करणे पशुवैद्यकांना शक्य होते.

प्रयोगशाळेतील रोगनिदान ः  
शारीरिक चाचणी ः

यामध्ये एक्स रे,अल्ट्रासोनोग्राफी यासारख्या आधुनिक तंत्राद्वारे हाड मोडणे, शरीरातील अंतर्गत भागाच्या चाचण्या,श्वासनलिका, पोट यामधील अनावश्यक बाबींची तपासणी करून शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येतात.

रक्त व रक्तजल तपासणी ः
संसर्गाने होणारे बरेचसे रोग या तपासणीद्वारे तपासता येतात.  रक्तातील घटक जसे लोह, पीसीव्ही, एमसीव्ही, एलएफटी, केएफटी या चाचण्या शरीरक्रियामधील दोष ओळखण्यास उपयुक्त ठरतात.

रक्ताची काचपट्टीवरील तपासणीः
याद्वारे रक्तातील जिवाणू, आदिजीव यांचा संसर्ग काचपट्टी घेऊन सूक्ष्मदर्शकाद्वारे पाहता येतो. तसेच रक्तातील पेशींची संख्यासुद्धा तपासात येते, जेणेकरून योग्य ती उपाययोजना करता येते.

रक्ताची जिवाणूंसाठी तपासणी ः
सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत रक्ताचे कृत्रिम अन्नघटकांवर निर्जंतुक पद्धतीने संवर्धन केले असता रोगास कारणीभूत ठरणारे जिवाणू वेगळे करून उपचारासाठी योग्य प्रतिजैविके निवडता येतात.

रक्तजल तपासणी ः
पेशीपुंजके बनविणे, साका बनविणे, पेशीआवरण फाडून पेशीतील हिमोग्लोबिनचे रक्तद्रवात विद्रावण करणे या तीन प्रकारच्या क्रियांवर रक्तजलशास्त्र विभागात होणारी बहुतेक सर्व परीक्षणे आधारलेली असतात. संसर्गित रोगांचे निदान रक्तजल तपासणीद्वारे जसे एलायजा चाचणी, एजिपीटी चाचणी, पीसीआर इत्यादी करून पशुवैद्यकांना आजार प्रतिबंधक उपाय करणे शक्य होते.

रोझ बंगाल प्लेट टेस्ट ः
ब्रुसेलोसिससाठी रोझ बंगाल प्लेट टेस्ट ही एक सोपी आणि सामान्य चाचणी आहे. ही चाचणी रक्ताच्या नमुन्यापासून वेगळे केलेल्या सीरम मधील ब्रूसेला जिवाणूविरुद्ध प्रतिपिंड शोधते. ही एक जलद परंतु प्राथमिक चाचणी आहे. पुढील पुष्टीकरणासाठी, एलायजा सारख्या चाचण्या उपलब्ध आहेत ज्याद्वारे विशिष्ट संसर्गजन्य रोगांविरूद्ध प्रतिपिंड / विशिष्ट रोगांचे प्रतिजन प्राण्यांच्या रक्तामध्ये शोधले जाऊ शकतात.

त्वचेची तपासणी ः
१) जनावरांच्या त्वचेवर बाह्य किटाणूंपासून ( गोचीड, उवा, पिसवा) तसेच इतर परोपजीवींचा मारा होतो. त्यांच्या माध्यमातून इतर काही महत्त्वाच्या रोगाचा प्रसार होत असतो.
२) खरूज विशेषतः तोंडावर, कानावर तसेच शेपटीच्या भागावर आढळते. अशा आजारांच्या परीक्षणासाठी कातडीचा बाधित भाग
खरडून त्याचे नमुने निर्जंतुक बाटलीमध्ये गोळा करावेत. त्वचेचे हे गोळा केलेले नमुने प्रयोगशाळेमध्ये परीक्षणासाठी पाठवावेत.
३) बुरशीजन्य आजारासाठी त्वचेच्या वरच्या थराची तपासणी लॅक्टोफेनॉल कॉटन ब्लू या द्रवाने रंगवून  सूक्ष्मदर्शकाद्वारे करतात.

मूत्र तपासणी ः
१) मूत्र तपासणीसाठी प्रथमतः जनावराचे सुरवातीचे थोडे मूत्र गोळा करू नये. थोडेसे मूत्र वाहून गेल्यानंतरचे मूत्र टोल्युन किंवा थायमॉल असणाऱ्या निर्जंतुक काचेच्या बाटलीत गोळा करावे.
२) बाटतील गोला केलेले मूत्र लगेच रोगनिदान करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवावे.
३) मूत्र परीक्षणामुळे मूत्रपिंड तसेच त्या संस्थेशी निगडित विविध आजारांचे निराकरण करणे शक्य होते.
 

शेणाची तपासणी ः
१) जनावराच्या शरीरातील पचनसंस्था, इतर अवयवातील परोपजीवी जंत, जंतांची अंडी यांचे परीक्षण करण्यासाठी शेणाची परीक्षा करणे गरजेचे असते.
२) शेणाचे नमुने प्रयोगशाळा परीक्षेसाठी गोळा करताना शक्यतो खाली पडलेले शेण घेण्याऐवजी गुदद्वारात हात घालून साधारण ५ ग्रॅम शेण काचेच्या बाटलीत घ्यावे.
३) शेणाचे तपासणीद्वारे गोलकृमी, चपटेकृमी तसेच पट्टकृमी यांची ओळख करून त्यावर योग्य ते उपचार करू शकतो.

योग्य प्रतिजैवीसाठी तपासणी ः
१) विविध जिवाणूमुळे होणाऱ्या आजारांचे निदान करून योग्य ते प्रतिजैविक निवडणे शक्य होते. या तपासणीमध्ये कृत्रिम माध्यमांवर शरीरद्रव,पू, रक्त, लघवी, दूध इत्यादी योग्य ते नमुने प्रयोगशाळेत कृत्रिम वातावरणात शरीराबाहेर वाढवून प्रतिजैविकांसोबत जिवाणूंचा प्रतिसाद पाहता येतो. तसेच सदर प्रतिजैविक निश्चित उपचार म्हणून वापरता येते.  
केंद्रसरकारच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रयोगशाळा आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात पशुसंवर्धन विभागातर्फे पुणे येथील प्रयोगशाळा, विभागीय प्रयोगशाळा ठिकठिकाणी उपलब्ध  आहेत. तसेच पशू महाविद्यालय, संशोधन केंद्रामध्ये रोगनिदानाच्या सोयी उपलब्ध करून देतात. पशुपालकांनी पशुवैद्यकांच्या सल्ल्याने मुंबई महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा फायदा घेऊन पशुधनाचे योग्य संगोपन व संवर्धन करावे.

दूध नमुने तपासणी ः
१) दूध उत्पादन व्यवसायामध्ये कासदाह या आजारामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. ते टाळण्यासाठी दरमहा जनावरांच्या दुधाचे नमुने घेऊन कॅलिफोर्निया मस्टायटीस चाचणीद्वारे गोठ्यातच तपासणी करता येते.
२) दुधाचे नमुने गोळा करण्यासाठी प्लास्टिकचे चौपाळे वापरावे. प्रत्येक कप्प्यामध्ये सडातील पुढील दोन व मागील दोन सडातील दुधाचे नमुने घ्यावेत. त्यामध्ये कॅलिफोर्निया मस्टायटीस द्रव एक किंवा दोन थेंब मिसळावे म्हणजे त्वरित निदान निदान करता येते.

रासायनिक तपासणी ः
१) रासायनिक पदार्थ किंवा की
टकनाशकांमुळे जनावरांमध्ये विषबाधा झालेली असल्यास रासायनिक प्रयोगशाळेमध्ये बाधित अवयव पाठवून परीक्षण करण्यात येते.
२) साथीच्या आजारात गाई-म्हशी, बैल इत्यादी मृत्युमुखी पडल्यास त्यांचे शवविच्छेदन करून शरीरातील विशिष्ट अवयवांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये परीक्षणासाठी पाठवावेत. त्यामुळे पशुवैद्यकांना परिणामकारक औषधोपचार तसेच त्वरित रोगनियंत्रण करणे सहज शक्य होते.

संपर्क ः
- डॉ.वर्षा देविदास थोरात, ८७७९२२७२६२
(सहाय्यक प्राध्यापक ,सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई)

- डॉ. मनोजकुमार आवारे, (विभाग प्रमुख, पशू पोषण व पशुआहार शास्त्र,बायफ रिसर्च फाउंडेशन, उरुळी कांचन,जि.पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pm Aasha Scheme : 'पीएम आशा'तून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Rain Maharashtra : राज्यात पावसाला पोषक हवामान; शुक्रवारी मराठवाड्याला 'येलो अलर्ट'  

Marathwada Mukti Sangram : मराठवाडा मुक्ती संग्रामाची गौरवशाली शौर्यगाथा

Soybean Yellow Mosaic : मळेगावातील सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव

Poultry Business : भांडवलाअभावी पोल्ट्री व्यवसाय धोक्यात, सांगली जिल्ह्यात परिस्थिती

SCROLL FOR NEXT