Chicken Feed Agrowon
ॲनिमल केअर

Poultry Feed : कोंबडीखाद्यामध्ये जीवनसत्त्वाचे महत्त्व काय असते?

कोंबड्यांचे आरोग्य निरंतर सुदृढ ठेवण्याकरिता तसेच उच्च उत्पादन कायम राहण्याकरिता आहारातील जीवनसत्त्व उपलब्धता योग्य प्रमाणात कायम राखणे हीच यशस्वी व्यवसायाची गरज आहे.समतोल आहारामध्ये जीवनसत्वे योग्य त्या प्रमाणात मिसळून देणे अत्यंत आवश्यक असते

Team Agrowon

डॉ.आर.सी.कुलकर्णी, डॉ.के.वाय.देशपांडे, डॉ.आकाश मोरे

Poultry Feed Management कोंबड्यांना दैनंदिन खाद्यामध्ये (Poultry Feed) जीवनसत्त्वांची आवश्यकता असते, त्याचे प्रमाण खाद्यात खूप कमी असते परंतु ते योग्य वाढीसाठी, मांस (Chicken Meat) आणि अंडी उत्पादनासाठी (Egg Production) आवश्यक असतात.

जीवनसत्वे अल्प प्रमाणात लागत असली तरीही ती खाद्यातून पुरवली जाणे गरजेचे असते. कारण त्यांच्या आहारातील अभावामुळे विविध आजार कोंबड्यांमध्ये (Poultry Disease) दिसतात.

जीवनसत्त्व अ :

- दृष्टीसाठी, योग्य वाढीसाठी, अंडी उत्पादन आणि प्रजोत्पादन यासाठी ‘अ’ जीवनसत्त्व आवश्यक असते.

- हे जीवनसत्त्व पेशीमध्ये आढळून येते. याचा यकृतात मोठा साठा असतो.

कमतरतेची लक्षणे :

- वाढ खुंटते. अशक्तपणा दिसून येतो. पंखे राठ होतात.

- नाक,डोळ्यातून सारखे पाणी गळते.

- डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटलेल्या दिसतात. काही काळानंतर डोळ्यांमध्ये पांढरा पडदा येतो. आंधळेपणा येतो.

- अंडी उत्पादन घटते. अंड्यामध्ये रक्ताच्या डागाचे प्रमाण वाढते.

- उबवाणीस ठेवलेली अंडी दोषपूर्ण होऊन उबवण क्षमता कमी होते.

-अंड्यामधील भृणदोष प्रमाण वाढते, रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, मरतुकीचे प्रमाण वाढते.

जीवनसत्त्व ड :

- हाडे व चोच मजबूत ठेवण्यासाठी आवश्यकता असते. जीवनसत्त्व ‘ड’ चे अनेक प्रकार आहेत परंतु, ड-२ आणि ड-३ ही महत्त्वाची आहेत.

- खाद्यात या जीवनसत्त्वाच्या वापरामुळे कॅल्शिअम आणि फॉस्फरस या खनिजांचा शरीरात योग्य वापर होतो.

- कोंबड्यांमध्ये मात्र ड-३ या स्वरूपात हे जीवनसत्त्व कार्यशील असते.

- जीवनसत्त्वाचा उपयोग हाडातील कॅल्शिअम व फॉस्फरस रक्त व अंडी कवच निर्मितीकरिता पुरवठा करण्याकरिता होतो. ड-३ जीवनसत्त्वाच्या प्रेरणेनेच पाराथोर्मोन व कॅल्शिटोनीन सारखी संप्रेरके कॅल्शिअम व फॉस्फरसचे शरीरात संचालन करतात.

कमतरतेची लक्षणे :

- मुडदूस होतो.चोच, छातीच्या हाडांचे टोक, पंजा ठिसूळ होतो. छातीचे हाडे वाकलेली दिसतात, फासळ्या आत झुकतात.

-पिल्ले अवघडून चालतात, त्यानंतर पायाच्या घोट्यावर बसतात, असे करताना त्यांचा दोन्ही बाजूस तोल जातो.

- अंड्याचे कवच पातळ होते. उत्पादनात घट होते.

जीवनसत्त्व ब ः

बी-१ जीवनसत्त्व (थायमीन):

- हे जीवनसत्त्व भूक वाढविते, पचनास मदत करण्यासाठी उपयोगी आहे. खाद्य घटकांत उपलब्ध असल्याने कमी पडत नाही.

- धान्ये, भुईमूग, लुसर्न (लसूणघास) मील, सरकी, बारीक केलेले सोयाबीनची साल, धान्यांचा भुसा, इत्यादीमध्ये हे जीवनसत्त्व असते.

- कमतरतेमुळे एकाच वेळी अनेक मज्जातंतूचा दाह (पॉलीन्यूरायटीस) होतो.

बी-२ जीवनसत्त्व ( रायाबोफ्लेवीन):

- हे महत्त्वाचे जीवनसत्त्व जीवनावश्यक क्रियेमध्ये भाग घेते.

- सर्वसाधारणपणे खाद्यामधील घटकांमधून याचा पुरवठा होत नाही.

-मासे,लसूण घास, दुग्धजन्य पदार्थामध्ये हे जीवनसत्त्व असते परंतु ही घटकद्रव्ये खाद्यामध्ये कमी प्रमाणामध्ये वापरली जातात.

कमतरतेची लक्षणे :

- पाय पांगळे होतात.

- अंडी घालणाऱ्या कोंबड्यांची उबवणूक शक्ती कमी होते, अंड्याच्या उत्पन्नात घट होते.

- पिल्लांच्या पायाची बोटे आतल्या बाजूने वाकलेली दिसतात, पिल्ले बसूनच राहतात.

- दोन आठवड्यात हगवण लागते, कोंबडी अशक्त होऊन रोडावते.

- जीवनसत्त्वाच्या अभावामुळे सजीव अंड्यामध्ये भृणदोष अधिक प्रमाणात निर्माण होतात.

पँटोथेनिक ॲसिड (बी-३) :

- प्रथिने, कर्बोदके आणि स्निग्ध पदार्थाच्या पचनासाठी आवश्यकता.

- वाढणाऱ्या पिल्लांना, तलंगांना अधिक गरज असते.

कमतरतेची लक्षणे :

- पिलांची वाढ खुंटते.पायावर खरुज येते.

- पंखाचा मऊपणा जातो, पंख खुरटवलेले व चुन्याच्या झालरी सारखी दिसतात.

- पिल्लांच्या डोळ्यात, तोंडात पापुद्रे पाहायला मिळतात.

- डोळे सुजल्यासारखे दिसतात. काही कोंबड्या कालांतराने आंधळ्या होतात.

- अंडी उत्पादन घट होते, उबवणूक क्षमता कमी होते.

- मृत कोंबडीच्या तोंडात पिवळट पदार्थ जमा झालेला दिसतो.

कोलीन :

- लहान पिलांना मोठ्या प्रमाणात गरज असते. पिलांच्या शरीरात याची निर्मिती होते परंतु ती अपुरी असते.

- कोलीनमुळे रक्तात स्निग्ध पदार्थांचे योग्य वाहन होते, शरीर वाढीस उपयुक्त असते.

- यकृतामध्ये चरबीचागरजेपेक्षा अधिक होणारा साठा नियंत्रित करते.

कमतरतेची लक्षणे:

- सांध्यावर ठीपकेदार रक्तस्राव दिसतो. यानंतर पाय सरळ होतो. सांध्याच्या खालचा भाग बाहेरच्या बाजूस वळतो याला पेरॉसीस म्हणतात.

- मोठ्या कोंबडीत मृत्यूचे प्रमाण वाढत जाते.

- मृत कोंबड्यांमध्ये यकृतावर चरबीचा पांढरा थर आढळतो.

नियासीन (बी-५) :

- वाढत्या पिलांना याची गरज असते.

- शरीरातील ऊर्जा चयापाचयामध्ये अनन्यसाधारण भूमिका असते.

कमतरतेची लक्षणे :

- सांधे सुजतात, वाढ खुंटते.जीभ व तोंड सुजते.

- हगवण लागते. पायाच्या कातडीवर खवले येतात.

- पिसे राठ होतात. खाद्य खाणे कमी होते.

- शरीरात यकृत व इतर अवयवांवर चरबी साठते.

पायरीडॉक्झीन (बी-६) :

- हे जीवनसत्त्व बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये समाधानकारक प्रमाणात असते.

कमतरतेची लक्षणे :

- भूक मंदावते, वजनावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो.अंडी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट.

- पिल्ले चालताना आचके देतात, त्यातच त्यांचा मृत्यू ओढवतो.

बायोटीन:

- संतुलित खाद्यामध्ये याचे प्रमाण भरपूर असते. परंतु त्यामधील केवळ ५० टक्के पिल्लांना उपयुक्त होते. -आतड्यांमध्ये याची निर्मिती होते. ऊर्जा चयापचय, चरबीचे यकृतातील नियोजनामध्ये महत्त्वाची भूमिका असते. कमतरतेची लक्षणे :

- चर्मरोग किंवा त्वचेचा दाह दिसून येतो. वाढ खुंटते.

- जन्मताच पिल्लांचे पाय वाकडे असतात.सांगाड्याचा विद्रूपपणा दिसतो.

- मेलेल्या पिल्लांची चोच पोपटासारखी दिसते. पायाची हाडे वाकलेली दिसतात.

- अंड्याची उबवणूक क्षमाता कमी होते. भृणदोष आढळतात.

फोलिक अॅसिड :

- शरीरातील अनेक क्रियांसाठी, वाढीसाठी, शरीरातील स्नायू, रक्त तयार होण्यासाठी, पंख्यांच्या वाढीसाठी याची गरज असते.

कमतरतेची लक्षणे :

१) वाढ खुंटते, मोठ्या कोंबडीमध्ये मानेचा लकवा होतो.

२) रंगीत कोंबड्यांचा रंग पांढरा होतो, पंख विरळ होतात.

रक्तक्षय होतो (अनेमिया)

- अंड्याची उबवणूक क्षमता कमी होते.

बी १२ (सायनोकोबालामीन) :

- मांसाहारी खाद्यामध्ये हे जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. वनस्पतींयुक्त खाद्यात अत्यंत थोड्या प्रमाणात हे उपलब्ध असते.

- पिलांच्या खाद्यांमध्ये हे जीवनसत्त्व मिसळावे लागते.

- पिंजरा पद्धतीत वाढविलेल्या पिल्लात या जीवनसत्त्वांच्या अभावाची लक्षणे अधिक दिसतात.

कमतरतेची लक्षणे ः

- रक्तक्षय होतो (अनेमिया ), पिलांची वाढ खुंटते.

- यकृत मोठे होते. अंड्यांची उबवणूक क्षमता कमी होते.

४. जीवनसत्त्व ‘क’ :

- कोंबड्यांच्या खाद्यामध्ये या जीवनसत्त्वांची आवश्यकता नसते. कोंबड्या गरजेपुरते हे जीवनसत्त्व शरीरात तयार करतात.

- यामुळे हाडांची वाढ चांगली होते, शरीरातील चरबीवर नियंत्रण ठेवले जाते. पिंजऱ्यात ठेवल्याने, उष्णतेने, कुक्कुट गृहात होणाऱ्या गर्दीने, वाहतुकीने किंवा उच्च उत्पादनाने कोंबड्यांवर येणारा ताण नाहीसा करण्यात जीवनसत्त्व ‘क’ ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

५. जीवनसत्त्व ‘ई’ :

- शरीरातील पेशींच्या निर्मितीसाठी, रक्त तयार होण्यासाठी याची आवश्यकता असते. खाद्यामध्ये याचा अभाव असल्यास विविध लक्षणे दिसून येतात. शरीरावर कुठलाही ताण निर्माण झाल्यास जीवनसत्त्व ई चा पुरवठा करणे गरजेचे असते.

- चरबीची शरीरात योग्य साठवण करण्यासाठी देखील हे जीवनसत्त्व महत्त्वाचे असते.

- रोगप्रतिकार क्षमता देखील ‘ई’ जीवनसत्वामुळे वाढण्यास मदत होते. प्रजोत्पादन उत्तम राखण्याकरिता जीवनसत्त्व ‘ई’ सर्वात महत्त्वाचे ठरते.

कमतरतेची लक्षणे :

- मान वाकडी होते,पंजे वाकडे होतात.नर नपुंसक होतात.

- अंडी उत्पादन कमी होते किंवा कोंबडी अंडी देणे बंद करते.

- अंड्याची उबवणूक क्षमता कमी होते.

६. जीवनसत्त्व के :

- रक्त साकाळण्यासाठी याची गरज असते. याच्या अभावाने जखमा झाल्यास अधिक रक्तस्राव होतो. याच्या कमतरतेची लक्षणे ः

- शरीरात बारीक ठिपक्यासारखे रक्ताचे डाग दिसून येतात.

- चामडी सोललेल्या कोंबड्याच्या मांसावर रक्ताचे डाग दिसून येतात

- जिवंत कोंबडीची कातडी ओढून पाहिल्यास छाती, तंगड्या याठिकाणी रक्त दिसून येते.

- पिंजऱ्यात लेअर कोंबड्यांना इजा झाल्यास रक्तस्राव थांबण्यास विलंब होतो. रक्ताचा अधिक स्त्राव होऊन मृत्यू होतो.

प्रतिबंधात्मक उपाय :

१) जीवनसत्त्वाची कमतरता कमी करण्यासाठी समतोल आहार देणे गरजेचे आहे.

२) आहारामध्ये वय व गरजेनुसार सर्व अन्नघटक योग्य प्रमाणात असतात. या आहारामुळे वाढ चांगली होते.

३) समतोल आहारामध्ये जीवनसत्वे योग्य त्या प्रमाणात मिसळून देणे अत्यंत आवश्यक असते.

४) जीवनसत्वे पावडरच्या स्वरूपात बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

संपर्क ः डॉ कुलदीप देशपांडे ८००७८६०६७२, (सहायक प्राध्यापक तथा विभाग प्रमुख, पशू पोषण विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

डॉ.आर.सी.कुलकर्णी ७७७६८७१८००, (सहायक प्राध्यापक, कुक्कुटपालन शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर,जि.लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT