Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पीग्रस्त जनावरांवर लक्ष ठेवा...

Team Agrowon

डॉ. अनिल भिकाने,डॉ.रवींद्र जाधव

राज्यात मागील साडे तीन महिन्यांपासून गोवंशात लम्पी आजाराची (Lumpy Skin) साथ चालू आहे. आजाराच्या तीव्रतेनुसार बाधित जनावरांच्यामध्ये (Animal) विविध लक्षणे आढळून येत आहेत. हा आजार विषाणूजन्य असल्याने त्यावर १०० टक्के प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाही. मात्र शेतकऱ्यांनी ज्या जनावरांमध्ये तत्काळ योग्य उपचार करून घेतला, चांगली शुश्रूषा केली ती जनावरे बरी होत आहेत.

आहार नियोजन

आजारी जनावरांची प्रतिकारशक्ती उत्तम राहण्यासाठी संतुलित आणि सकस आहार नियमित द्यावा.

आहार व पाणी पिणे योग्य गुणवत्तेचे राहील याची काळजी घ्यावी.

आजारी जनावरांना हिरवा, मऊ व लूसलुशीत चारा तसेच चांगल्या प्रतीची प्रथिने व उर्जायुक्त खुराक (ढेप/मका आदी) द्यावा.

पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात दिवसातून ४ ते ५ वेळा उपलब्ध करून द्यावे. पाण्यामध्ये मीठ व गूळ मिसळून दिल्यास जनावर पाणी आवडीने पितात. त्यांना खनिज क्षार व ऊर्जा मिळते.

थंडीच्या काळात हलके कोमट पाणी दिल्यास जनावरे आवडीने पाणी पितात. पाणी पिणे चालू राहिल्यास अत्यवस्थ जनावरसुद्धा बरी होत आहेत.

ज्या बाधित जनावरांना मानेवर आणि छातीवरील सुजेमुळे मान खाली करता येत नाही, अशा जनावरांना चारा व पाणी तोंडाच्या उंचीवर उपलब्ध करून देण्यात यावे. गरजेप्रमाणे चारा हाताने खाऊ घातल्यास आजारी जनावर चारा खात असल्याचे दिसून आले आहे.

पूरक खाद्य पदार्थांचा अंतर्भाव

आजारी जनावरांनी चारा खाणे कमी केले असेल तर अशा जनावरांना उर्जावर्धक औषधे तोंडावाटे देण्यात यावीत.

रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी आहारात नियमितपणे खनिज क्षार मिश्रण द्यावे.

जनावरे आजारातून बरी होईपर्यंत त्यांना जीवनसत्वे, प्रतिकारशक्ती वर्धक तसेच यकृतवर्धक औषधे नियमितपणे द्यावीत.

रक्तक्षय झालेल्या जनावरांना रक्तवर्धक औषधे सकाळी संध्याकाळी २१ दिवस देण्यात यावीत.

ओटीपोटातील पचनासाठी आवश्यक जीवजंतू सुस्थितीत राहण्यासाठी प्री व प्रोबायोटीक औषधे त्याचप्रमाणे भूकवाढीसाठी औषधे द्यावीत.

आजारी जनावरांना औषधे पाजणे शक्यतो टाळावे. पावडर किंवा पातळ औषधे कणीक/पीठ/गूळ खुराक किंवा पाण्यातून द्यावीत.

उबदार निवारा

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर आजारी जनावरांचे थंडीपासून संरक्षण करावे. उघड्यावर बांधू नये. त्यांना कोरडा व उबदार निवारा उपलब्ध करून देण्यात यावा.

लहान वासरांना अंगावर उबदार कापड पांघरावे. गोठ्यात अधिक क्षमतेचे बल्ब लावावेत जेणेकरून उष्णता निर्माण होईल. प्रतिकूल वातावरणामुळे येणारा ताण टाळता येईल.

पोळी-पायावरील सुजेवर शेक

ज्या जनावरांना पाया समोरील लसीका ग्रंथी, पाय किंवा छातीवर सूज आहे अशा जनावरांना बसताना त्रास होतो. ही जनावरे सतत उभी राहतात. अशा जनावरांना मिठाच्या गरम पाण्यात भिजविलेल्या सुती कापडाच्या साहाय्याने दिवसातून दोन वेळा उत्तम शेक द्यावा. तसेच मॅग्नेशिअम सल्फेट (बारीक पावडर) आणि ग्लिसरीन या संयुगाचा लेप सुजेवर सकाळ आणि संध्याकाळी लावल्यास सूज कमी होते.

अंगावरील गाठी व सूज कमी करणेसाठी उन्हाच्या वेळेत गरम पाण्याची अंघोळ घालावी. अंग कापडाने कोरडे करावे म्हणजे सर्दी होणार नाही.

लहान वासरांना चेहऱ्यावरील दुखऱ्या गाठीमुळे तोंडाची हालचाल करण्यास अवघड झाल्याने दूध पिता येत नाही. त्यासाठी चेहऱ्यावर गरम पाण्याने शेक द्यावा.गरम पाण्याचा चटका बसणार नाही याची खबरदारी घ्यावी.

बसलेल्या जनावरांची काळजी

पाय,गुडघ्यावरील सुजेमुळे उभे राहण्यास त्रास झाल्याने किंवा अशक्तपणामुळे आजारी जनावर बसून राहाते. अशा जनावरांना सिमेंट काँक्रीटची

जमीन टाळावी. अंगाखाली मऊ गवत/तुसाची

गादी करावी. दर २ ते ३ तासांनी बाजू बदलावी. दिवसातून दोन वेळा मदतीने उभे करावे. पाय चोळावेत/शेकावेत.

बैलांची काळजी

आजारातून बरे झालेल्या बैलांना लगेच शेतीकामास जुंपल्यामुळे पुन्हा अशक्तपणा येऊन दगावत आहेत. म्हणून प्रकृती ठणठणीत होईपर्यंत बैलांना शेतीकामास लावू नये.

- डॉ.अनिल भिकाने, ९४२०२१४४५३

(संचालक, विस्तार शिक्षण,महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

- डॉ.रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३

(सहाय्यक प्राध्यापक, चिकित्सालयीन औषध शास्त्र विभाग,पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय,

उदगीर,जि.लातूर)

तोंडातील व्रणोपचार

जनावरांच्या विषेशतः लहान वासरांच्या तोंडात जखमा आढळून आल्यास, तोंड ०.१ टक्के पोटॅशियम परमँगनेट द्रावणाने धुवावे. दिवसातून ३ ते ४ वेळेस बोरोग्लीसरीनचे द्रावण तोंडातील जखमांवर लावावे. त्यामुळे जनावराला चारा खाण्यास तसेच वासरांना दूध पिण्यास त्रास होणार नाही.

नाकाची स्वच्छता आणि वाफ देणे

आजारी जनावरांच्या विषेशतः लहान वासराच्या नाकामध्ये बऱ्याचवेळा जखमा निर्माण होतात. नाक चिकट स्त्रावाने भरलेले असते, काही वेळा तो घट्ट व कडक होतो. त्यामुळे श्वसनास त्रास होतो. त्यासाठी कोमट पाण्याने नाकपुडी नियमितपणे स्वच्छ करावी.

दोन्ही नाकपुड्यात बोरोग्लिसरीन किंवा कोमट खोबर तेल व बोरीक पावडरचे मिश्रण चार थेंब टाकावे, जेणेकरून मऊपणा टिकून राहील,जखमा भरून येतील. श्वसनास त्रास होणार नाही.

सर्दी असेल तर निलगिरी तेलाची वाफ दिली तर चांगला फायदा होतो.

डोळ्यांची निगा

डोळ्यांत व्रण असतील तर डोळ्यातून पाणी येते, पुढे पांढरेपणा येतो. त्यासाठी डोळे बोरीक पावडरच्या द्रावणाने, नियमीत धुवून घ्यावेत किंवा कोमट पाण्याने स्वच्छ करावेत.

जखमांची स्वच्छता

बाधित जनावरांमध्ये २ ते ३ आठवड्यानंतर प्रामुख्याने सूज आलेल्या भागात विशेषतः पायावरती जखमा होतात त्याचप्रमाणे शरीरावरील गाठी फुटून जखमा होतात. त्या जखमांवर खालीलप्रमाणे उपचार करावा.

जखमा ०.१ टक्के पोटॅशियम परमँगनेट द्रावणाने धुवून घेतल्यानंतर त्यावर पोव्होडीन आयोडीन किंवा टिंक्चर आयोडीन लावावे. त्यानंतर जखमेवर मॅग्नेशिअम सल्फेट आणि ग्लिसरीनचे मिश्रण लावून बँडेजने हळुवारपणे बांधावे.

जखमांवर माश्या व इतर बाह्यपरजीवी बसू नयेत यासाठी दिवसातून दोनवेळा हर्बल स्प्रे जखमेच्या जवळपासच्या भागात फवारावा.

जखमेमध्ये अळ्या पडल्यास त्या जागी टरपेनटाईंनच्या तेलात भिजवून कापसाचा बोळा ठेवावा. त्यानंतर मृत अळ्या बाहेर काढून घ्याव्यात. अशा जखमांवर दिवसातून दोन वेळा हर्बल स्प्रे फवारावा.

जखमा जास्त खोल व दूषित प्रकारच्या असल्यास हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करून अशा जखमांचा उपचार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करून घ्यावा. जखमा पूर्णपणे बऱ्या होण्यासाठी नियमित ड्रेसिंग करणे गरजेचे आहे.

गोमाशांचा उपद्रव

आजारी जनावर सुस्त झाल्याने तसेच अंगावर जखमा झाल्याने त्यावर माशा बसतात, जनावर त्रस्त होते. म्हणून आजारी जनावरांना गोचीड-गोमाशा यांचा त्रास कमी होण्यासाठी गोठ्यात दर ३ ते ४ दिवसांनी गोचिडनाशकाची फवारणी करावी.

तसेच अंगावर वनस्पतिजन्य कीटकनाशकाची नियमित फवारणी करावा. यासाठी एक लिटर पाण्यामध्ये १० मिलि निंबोळी तेल, १० मिलि करंज तेल, १० मिलि निलगिरी तेल आणि २ ग्रॅम अंगाचा साबण मिसळावा. हे मिश्रण फवारणीसाठी वापरावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT