Turmeric Market Update : शेतीमाल बाजारातील चढ-उताराचा ठपका वायदे बाजारावर ठेवत केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी सात शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली. त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये रोष असताना आता गोदामांमध्ये लावलेल्या हळदीत भेसळ झाल्यामुळे थेट वायद्यांवरच बंदी घालण्याची मागणी व्यापारी करत आहेत. वायदे बाजारातील असे गैरप्रकार रोखणे आवश्यक आहेच. याशिवाय आणखी सुधारणाही करायला हव्यात. शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणेही गरजेचे आहे. परंतु वायद्यांचे महत्त्व लक्षात न घेताच वायदेबंदीची टोकाची मागणी करणे चुकीचे आहे. महाराष्ट्रातील पिकांचा विचार केला तर आता केवळ हळद आणि कापसाचेच वायदे सुरू आहेत. त्यातही हळद उत्पादनातील महाराष्ट्राचा वाटा पाहिला तर वायदेबंदी नव्हे, तर हळदीच्या वायदेबाजाराचा आणखी विकास होणे गरजेचे आहे..निजामाबाद येथील एनसीडीईएक्सच्या गोदामात (वेअरहाउस) लावलेल्या हळदीत वसमत येथील हळदीची भेसळ केल्याचे उघडकीस आले. निजामाबाद येथील गोदामामध्ये फक्त निजामाबाद परिसरातील, सांगली येथील गोदामात राजापुरी तर इरोड आणि वसमत येथील गोदामात सेलम हळद स्वीकारावी, असा नियम एनसीडीईएक्सने घालून दिला आहे. निजामाबाद येथील गोदामांमधील काही सॅम्पलमध्येच भेसळ आढळल्याचे एनसीडीईएक्सने स्पष्ट केले. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी अशी भेसळयुक्त हळद गोदामात लावली होती त्या व्यापाऱ्यांनी आपला माल आता बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. तरीही तपासणीचे काम पूर्ण झाल्यानंतरच भेसळीचे प्रमाण किती आहे, ते उघड होईल..निजामाबाद येथे घडलेला प्रकार संबंधित गोदामाने नियमांची पायमल्ली केल्यामुळे घडला. एनसीडीईएक्सने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी गोदामाची असते. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचे अधिकार एनसीडीईएक्सला आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. पण या प्रकारामुळे पुन्हा एकदा हळदीच्या वायदेबंदीचा मुद्दा चर्चेत आला. निजामाबाद, सांगली आणि वसमत येथील काही व्यापारी हळदीच्या वायदेबंदीची मागणी करत आहेत. तर व्यापाऱ्यांचा मोठा गट आणि शेतकरी झालेल्या गैरप्रकारावर कारवाई करून पुन्हा असा प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी आणि वायदे सुरूच ठेवावेत, अशा मताचे आहेत..Turmeric Market: वायदेबंदीची अवास्तव मागणी.निजामाबाद येथे घडलेला प्रकार आणि वायदे बाजाराचे काही मुद्दे या विषयांवर नांदेड येथे एक बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्यातील हळदीला वायदे बाजारात वजन कसे प्राप्त होईल, याविषयीदेखील चर्चा झाली. परंतु मूळ मुद्दा बाजूला राहून वायदेबंदीच्या मुद्द्यालाच जास्त हवा देण्यात आल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी सांगितले. शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही वायदेबंदीच्या मागणीला विरोध केला. केवळ शेतकरीच नाही, तर व्यापाऱ्यांचा मोठा गट या मागणीच्या विरोधात असल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांचा विचार केला तर वायदे बाजारात अनेक टप्प्यांवर मोठ्या सुधारणा आवश्यक आहेत. पण हा मुद्दा बाजूला पडून वायदेबंदीवरून भुई धोपटणे चुकीचे आहे..वायदे बाजाराचा मुख्य उद्देश हेजिंग म्हणजेच जोखीम व्यवस्थापन आहे. हजर बाजारात काम करताना दरातील चढ-उतारामुळे निर्माण होणारी जोखीम वायद्यांमध्ये पोजिशन घेऊन कमी करता येते. मोठे व्यापारीच नाही तर छोटे व्यापारी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग वायदे बाजारात वाढत आहे. शेतकऱ्यांना हेजिंग आणि भविष्यातील सहा महिन्यांच्या दराचा अंदाज वायदे बाजारातून घेता येतो. वायद्यांचे महत्त्व वाढत असल्याने शेतकरी या बाजाराकडेसकारात्मकतेने पाहत आहेत. आज सोयाबीन, मोहरी, हरभरा, तूर, गहू, तांदूळ यांचे वायदे नाहीत. त्यामुळे पुढील चार-पाच महिन्यांत बाजाराची दिशा काय राहू शकते, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वायदे बाजारात शेतकऱ्यांचा सहभाग कमी असला तरी भविष्यातील किमतीचा अंदाज घेण्यासाठी वायद्यांमधील दराचा आढावा बहुतांश शेतकरी घेत असतात.शेतकऱ्यांचा माल एनसीडीईएक्सच्या गोदामांमध्ये स्वीकारला जात नाही, अशी चर्चा आहे. परंतु एनसीडीईएक्सचे हळदीच्या गुणवत्तेचे निकष ठरलेले आहेत. त्या निकषांत बसणारा माल लाॅटच्या मर्यादेत स्वीकारला जातोच. मग तो व्यापाऱ्याचा असो किंवा शेतकऱ्यांचा. निकषांचे पालन करणे आवश्यक आहे..मराठवाड्याचे वाढते महत्त्ववसमत मार्केटमधून सांगली, निजामाबादसह इतर मार्केटला हळदीचा पुरवठा होत असे. पण आता मराठवाड्याच्या हळदीलाही वेगळी ओळख मिळाली आहे. एनसीडीईएक्सच्या सेंटरने त्यात आणखी भर पडली. जागतिक पातळीवरचा विचार केला तर हळदीचे जवळपास ८० टक्के उत्पादन एकट्या भारतात होते. देशातील उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सुरुवातीपासून देशात सांगली, निजामाबाद, इरोड हे बाजार महत्त्वाचे होते. या बाजारांच्या पट्ट्यात हळद उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. परंतु मागील दशकभरात देशातील हळद उत्पादनाचा आलेख बदलत गेला. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी पारंपरिक कापूस आणि सोयाबीन पिकाला पर्याय शोधत हळदीला पसंती देऊ लागले. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात हळदीचे क्षेत्र वाढत गेले. त्यातही मराठवाडा हा देशातील सर्वांत मोठा हळद उत्पादक प्रदेश ठरला. व्यापारी आणि उद्योगांच्या मते देशातील जवळपास ४० टक्के उत्पादन मराठवाड्यात होते. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, लातूर आणि विदर्भातील वाशीम जिल्ह्यात हळदीची लागवड लक्षणीय वाढली..वेगळ्या वायद्याने प्रश्न सुटेल?हळद उत्पादनात मराठवाडा आघाडीवर पोहोचला तरी हळदीचे बेंचमार्क मार्केट निजामाबाद आहे. त्यामुळे निजामाबाद मार्केटचे निकष आणि दर वसमत मार्केटला लागू केले जातात. मराठवाड्यातील व्यापारी आणि शेतकरी निजामाबादऐवजी वसमतलाच हळदीचे बेंचमार्क मार्केट गृहीत धरावे, अशी मागणी करत आहेत. पण बेंचमार्क मार्केट होणे ही एक प्रक्रिया आहे. मालाची गुणवत्ता आणि उत्पादन वाढले तर बेंचमार्कचा मान आपोआप वसमतकडे येईलच. त्यासाठी पुढचे काही वर्षे केवळ एनसीडीईएक्सच नाही तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांनीही पुढाकार घेऊन सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक आहे..तसेच एनसीडीईएक्सचे हळदीच्या गुणवत्तेचे निकष जास्त कडक आहेत. त्याचे पालन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना करणे शक्य नाही. त्यामुळे एनसीडीईएक्सने मराठवाड्यातील हळदीचा विचार करून कमी गुणवत्तेचे वायदे सुरू करावेत, अशी मागणी काही शेतकरी उत्पादक कंपन्या आणि व्यापारी करत आहेत. पण निजामाबाद आणि सांगली केंद्राचे वेगळे वायदे केले आणि गुणवत्तेचा निकष पातळ केला तर त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त दिसते. कारण एनसीडीईएक्सने बाजारातील मागणी लक्षात घेऊनच गुणवत्तेचे निकष ठरवले आहेत. निजामाबाद आणि सांगली पट्ट्यातील शेतकऱ्यांनी त्यानुसार हळद उत्पादनाचे तंत्र अवगत केले. त्यामुळे येथील हळदीला चांगली मागणी आणि दर मिळतो. मराठवाड्यातही शेतकरी आता सांगली आणि निजामाबादच्या तोडीस तोड हळद निर्मिती करत आहेत. त्यामुळे वसमत येथील केंद्रावरही हळद लागण्याचे प्रमाण वाढत आहे. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. शेतकरी हळूहळू गुणवत्ता सुधारत आहेत. पुढील पाच ते दहा वर्षांत वसमत मार्केट गुणवत्तेच्या बाबतीत सांगली आणि निजामाबादला टक्कर देईल, असा विश्वास एनसीडीईएक्सने व्यक्त केला आहे. त्याऐवजी गुणवत्तेचे निकष कमी करून वेगळे वायदे सुरू केले तर वसमत मार्केट कायमस्वरूपी डिस्काउंटमध्ये चालेल. त्याचा फटका शेतकरी, व्यापारी आणि एकूण मराठवाड्याच्या हळद बाजाराला बसेल, असे एनसीडीईएक्सचे म्हणणे आहे..Turmeric Rate: हळदीच्या दरावरील दबाव कायम.शेतकऱ्यांचा सहभाग कसा वाढेल?एनसीडीईएक्सच्या वायद्यांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमी आहे. त्यामुळे एनसीडीईएक्सच्या गोदामांमध्ये २५ टक्के हळद शेतकऱ्यांची घ्यावी, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केली आहे. मुळात शेतकऱ्यांकडे जर गुणवत्तेच्या निकषात बसणारी हळद असेल तर आजही ती स्वीकारली जाईल. लाॅट साईजमध्ये हळद लावण्याला मर्यादा नाहीत. मात्र सध्याच्या निकषाला डावलून जर शेतकऱ्यांचा माल गोदामांमध्ये लावला तर पुन्हा भेसळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे एनसीडीईएक्सचे म्हणणे आहे. सध्या उद्योगांच्या मागणीनुसार पीक सल्ला समितीच्या सल्ल्यानुसार गुणवत्तेचे निकष ठरवले आहेत. ज्या शेतकऱ्यांना सध्या या गुणवत्तेची हळद घेणे शक्य नाही ते शेतकरी हेजिंगचा वापर करून आपली जोखीम कमी करू शकतात. त्यासाठी गोदामालाच हळद लावली पाहिजे, असे नाही. वायदे बाजाराचा मुख्य उद्देश प्रत्यक्ष माल देण्यापेक्षा (फिजिकल डिलिव्हरी) हेजिंग हा आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा, असे आवाहन एनसीडीईएक्सने केले आहे..सट्टेबाजीचा ठपकावायदे बाजारात सट्टेबाजी होत असल्याने प्रत्यक्षात काम करताना अडचणी येतात, असे काही व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वायदे बाजारात काही प्रमाणात सट्टेबाजी होतेच. परंतु नेहमीच सट्टेबाजी होते आणि त्यामुळेच भाव वाढतात किंवा घटतात हा ठपकाही चुकीचाच आहे. परंतु वायदे बाजारात हेजिंग करून व्यापारी आणि शेतकरीही या तेजी-मंदीचा फायदा घेऊ शकतात. वायदे बाजारातील दरावरही मागणी- पुरवठ्याच्या बदलत्या समीकरणाचा परिणाम होतच असतो. हजर बाजारातील दरावरही हा परिणाम दिसतोच. जोपर्यंत कोणत्यातही कमोडिटी बाजारात गुंतवणूकदार येणार नाहीत तोपर्यंत त्याचे भाव वाढणार नाहीत. मागील वर्षी सोयाबीन, कापसात गुंतवणूकदार म्हणजेच स्टॉकिस्ट आले नाहीत, त्यामुळे भाव मंदीत राहीले. सोयाबीनचे वायदे बंद आहेत. तर तूर आणि हरभऱ्याचे उत्पादन कमी राहिल्याने वायदेबंदी असतानाही तेजी आली होती आणि आता खुल्या आयातीने पुरवठा वाढून मंदी आली. यात वायदे बाजाराचा कुठेही संबंध दिसून आला नाही..हळद, कापूस वायद्यांचा आधारशेतकरी एनसीडीईएक्सच्या गुणवत्तेची हळद निर्मिती करू शकले नाही तरीही हेजिंग करू शकतात. हेजिंग केले म्हणजे डिलिव्हरी दिलीच पाहिजे असे नाही. फक्त वायदे बाजारात व्यवहार करताना त्याचे पूर्ण प्रशिक्षण आणि माहिती घेणे आवश्यक आहे. सध्या वायदे बाजारात शेतकऱ्यांचा माल येत नाही. यंदा हळदीची लागवड वाढली आहे. त्यामुळे उत्पादन वाढण्याचाही अंदाज आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आताच आपला माल काढणीला येण्याच्या काळातील वायदे घेऊन जोखीम व्यवस्थापन करू शकतात. तसेच एनसीडीईएक्सवर कच्च्या कापसाचेही वायदे आहे. लांब धाग्याच्या म्हणजेच किमान २९ एमएमपासून पुढच्या कापसाचे वायदे आहेत. कापसाच्या गुणवत्तेचे निकषही एनसीडीईएक्सने ठरवून दिलेले आहेत. परंतु डिलिव्हरी हा दुसरा पर्याय आहे. मात्र हेजिंगचा वापर करून दरातील चढ-उताराचे जोखीम व्यवस्थापन करता येईल. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.