लेखक- विकास गोडगे
नदीला पाणी आलंय म्हणून आज हि दोनचार गाबडी शाळेच्या पिशव्या हातात घेऊन तडक नदीला पोचली. नदीला पाणी आल्यावर शाळा वैगेरे गोष्टी म्हणजे त्यांच्यासाठी उगीचच असतात. घरच्यांना पण पोरं शाळेत गेलीत का कुठ कुत्री मारीत फिरत आहेत हे बघायला वेळ नसतो. तुरी फवारायच्या, कापूस फवारायचा, ज्वारीची पेरणी करायची असली उत्पादक कामं सोडून लेकरा मागे फिरायला कुणाला सवड असणार आहे!
त्यांनी दप्तर नदीच्या कडेला ठेवले आणि जरा पुढे जाउन चिखल गोळा करू लागली. तेव्हढ्यात नामु परटाने धुनी धुताना ह्या चौघांना बघितले आणि जोरात शिवी हासडून म्हणाला, "ये ~~~~ गाबड्यानो, पळता का नाही शाळेत, नाहीतर एकेकाचं टांगडच तोडीन" ही चौघं थोडी गुर्मी दाखवून तिथंच थांबली. पण नामु खरंच पाण्याच्या बाहेर निघून मारायला येतोय हे बघून पोरं पण दप्तर घेऊन शाळेच्या दिशेने चालण्याचे नाटक करू लागली. नदीच्या जरा खाल्लाकडच्या बाजूला नामुच्या नजरे आड जाऊन नदीत शिरली. काळ्या चिकन मातीचा चिखल जमा केला. कडेच्या पाण्यात पोहण्याचे नाटक केले आणि तशीच चिखलात घाण झालेली कपडे घालून गावात आली.
भर दुपारचं गावात कुत्री पण दिसत नव्हती. त्या पूर्ण उभट गल्लीत कधीतरी वैभवाच्या असलेल्या काही खुणा अंगावर ठेवून भग्नावस्थेत दिवस काढणाऱ्या वाड्याच्या एका वट्ट्यावर बसून ती मुलं चिखल तिंबण्यात गढून गेली. चिखल तीम्बल्या नंतर चालू झाला खेळ "अक्का का बोका, कसाकाय ठोका". म्हणजे चिखलाचा मोठा खोल्या तयार करायचा आणि तो खाली जोरात पालता आपटायाचा.
मोठा आवाज होऊन त्या दुपारची शांतता भंग करतो आणि त्या पडक्या वाड्याच्या छिन्न भिंतीतील बिळात शांत पडलेल्या चिमण्यांचा चिवचिवाट चालू होतो. त्या चिखलाच्या खोल्याला वरून भोक पडते ते दुसर्यांनी चिखलाची छोटी चपाती करून भुजवायचे. अशा तर्हेने चिखल जिंकायचा खेळ चालू झाला. दोन तीन तास असा खेळ खेळून झाल्यावर जो चिखल तयार होतो ते एक नंबर मटेरियल असते बैल किंवा काहीही बनवण्यासाठी.
ईटु, कल्या आणि फ़त्र छान बैल बनवतात. लंगडा राजा उगीच सगळ्या गोष्टीची नाटकं करतो. त्याच्याच्यान होत काहीच नाही पण भांडनाला एक नंबर आहे. इटुने दोन बैलं आणि एक खोंड बनवलं. पळत पळत घरी जाउन ज्वारी आणली आणि त्या ज्वारीचे डोळे सगळ्या बैलांना लावले. आणि बैलांना पुन्हा पुन्हा थुका लावून मालिश करू लागले. आता बैलं तयार झाली. संध्याकाळी आबा आलं कि आठाणे घेऊन बैलांना दुकानातून झुली आणि चमकीचे कागद आणून सजवायचं म्हणून इटु तिन्ही सांजा व्हायची वाट बघत बसला. उद्या पोळा असल्याने रानातली लोक आज लवकर घरी येणार हे त्या पोरांना माहित होते.
इटुचे आबा आणि आई आली, ईटुने त्यांच्याकडून आठाणे आणून बैलांना मस्त सजवू लागला. तेवढ्यात कल्याने ईटुला बोलावून त्यांच्या परसातील बैल कशी सजवत आहेत ते बघायला न्हेलं. कल्याचे वडील त्यांच्या चार बैलांना घासून धूत होते, कल्या पण धुऊ लागत होता, शिंगे कातरीने तासंत होते, आता त्या खिल्लारी बैलांच्या सिंगाला कल्याचे वडील हिंगुळ आणि बिगुड लावून रंगवु लागले. इटु तिथून तडक घरी पळत आला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला, "आताच्या आता आपल्या "हिऱ्याला" घेऊन या नाहीतर कायच खरं नाही तुमचं" आणि मोठ्याने रडू लागला. उद्या पोळा आहे, आपल्या दोस्ताना बैलं आहेत आणि आपली बैलं नाहीत हे त्याला खूपच वाईट होते. इटूची आई त्याला समजाउन सांगू लागली, आरं बाळा किती चांगली चिखलाची बैलं केलीयत तू, त्याच बैला बरोबर खेळावं …वैगेरे वैगेरे.
इटुने तसलं काय नगं, मला आपली "हिऱ्या-मव्हऱ्या" आताची आता आणून द्या म्हणाला आणि ते चिखलाचे झटून केलेले दोन बैल भिंतीवर मारले. त्या बैलाचा चिखल होऊन त्या भिंतीच्या चिखलात मिसळून गेला. आणि त्याचे वडील उठून घराबाहेर पडले. चालताना त्यांच्या डोळ्यात पाणी होते. इटुच्या वडिलांच्या डोळ्यातील पाणी फक्त त्यांनाच दिसत होते. त्यांचा "हिऱ्या" दोनच महिन्यापूर्वी पोट फुगून मेला होता आणि त्यांनी कर्ज झाले म्हणून "मव्हर्याला" विकून सावकाराचे व्याज भागवले होते.