Animal Management Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Husbandry Business : नव्या जोमाने पुन्हा उभारला पशुपालन व्यवसाय

Team Agrowon

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पशुपालन

शेतकरी : योगेश रमेश ढेरे

गाव : लोहगाव, ता. नेवासा, जि. नगर

शेती : १८ एकर

गायींची संख्या : १७ गाई व १३ कालवडी

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात काही भागांत पाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. चारा उत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने शेतकरी पशुपालन, दुग्ध व्यवसायाला अधिक प्राधान्य देत आहेत. नेवासा तालुक्यातील लोहगाव योगेश रमेश ढेरे या तरुण शेतकऱ्याने पशुपालनाला प्राधान्य दिले आहे. त्यांची वडिलोपार्जित १८ एकर शेती आहे. त्यात सहा एकरांवर ऊस, दोन एकरांवर मका तर चाऱ्यासाठी पाऊण एकर घास, अर्ध्या एकरावर गिन्नी गवताची लागवड आहे.

लोहगाव (ता.नेवासा) येथील योगेश रमेश ढेरे या तरुण शेतकऱ्याने बंद पडलेला पारंपरिक दुग्ध व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने उभा केला आहे. योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाला प्राधान्य देत त्यांनी पशुपालन व्यवसायात प्रगती साधली आहे. शेती करताना पूरक व्यवसाय म्हणून सुरु केलेल्या पशुपालनातून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीला मदत होत आहे.

पुन्हा नव्याने सुरवात

ढेरे कुटुंबाचा अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय आहे. कुटुंबाकडे नऊ वर्षांपूर्वी २० गाई होत्या. त्यावेळी लाळ्या-खुरकूत या साथीच्या आजारामुळे तब्बल तेरा गाईंचा मृत्यू झाला होता. आणि दुग्ध व्यवसाय उद्धस्त झाला. उरलेल्या गाई त्यांनी विकून टाकल्या. सात ते आठ लाखांचे नुकसान झाले. सुमारे सात ते आठ वर्षे त्यांनी दुग्ध व्यवसाय बंदच ठेवला.

मागील दीड वर्षापूर्वी पुन्हा नव्याने शेतीला जोड म्हणून पशुपालन करण्याचे योगेश यांनी ठरविले. त्यानुसार गायींची खरेदी करून नियोजन आणि व्यवस्थापनावर भर देऊन दुग्ध व्यवसायाची पुन्हा नव्याने सुरवात केली. सध्या ढेरे कुटुंबाकडे १७ गाई व १३ कालवडी आहेत. गाईंसाठी अर्ध्या एकरावर मुक्त गोठा उभारण्यात आला आहे. सध्या दररोज २५० लिटर दुधाचे संकलन होत आहे.

व्यवस्थापनातील बाबी

नऊ वर्षापूर्वी झालेले नुकसान लक्षात घेऊन आता ढेरे कुटुंब व्यवस्थापन, नियोजनाला अधिक प्राधान्य देते. पशुपालन व्यवसाय करताना व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य दिले तरच दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरतो असा त्यांचा अनुभव आहे. त्यात मुक्तसंचार गोठा पद्धती महत्त्वाची आहे.

गोठ्यातील दैनंदिन कामांना दररोज सकाळी पाच वाजता सुरवात होते. प्रथम मुक्त गोठ्यातील गाई दूध काढणीसाठी दावणीला बांधल्या जातात. त्यानंतर यंत्राच्या साह्याने दूध काढणी केली जाते. दूध काढणी पूर्ण झाल्यावर गाईंना चारा व खुराक दिला जातो. हे काम साधारण सकाळी दहा वाजेपर्यंत चालते. त्यानंतर गाई मुक्त संचार गोठ्यात मोकळ्या सोडल्या जातात.

एका गाईला साधारण दहा ते बारा किलोची चारा कुट्टी दिली जाते. त्यात गिन्नी गवत, मका, ऊस, मुरघास यांचा समावेश असतो. गाईंना देण्यासाठीची कुट्टी रात्रीच तयार करून ठेवली जाते. सकाळी चाऱ्याची कुट्टी दिली तर सायंकाळी मुरघास दिला जातो. असेच जर सकाळी मुरघास दिला तर सायंकाळी कुट्टी असे आलटून पालटून चारा नियोजन केले जाते.

गाईंना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होण्यासाठी मुक्तसंचार गोठ्यात पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

खुराकामध्ये गोळीपेंड, सरकी पेंड यांचा समावेश असतो. दुभत्या गाईंना गाईच्या दूध देण्याच्या क्षमतेनुसार तीन ते साडेचार किलोपर्यंत गोळीपेंड, सरकी पेंड, वालीस दिले जाते. तसेच गरजेनुसार प्रथिनयुक्त खाद्य चारा कुट्टीत मिसळून दिले जाते.

पुन्हा संध्याकाळी चार वाजता दूध काढणी, चारा व अन्य कामांना सुरवात होते. सकाळप्रमाणेच सायंकाळी चारा, खुराक दिला जातो.

चाऱ्यासाठी वर्षभरात ५० टनांपर्यंत मुरघास निर्मिती केली जाते. त्यामुळे अडचणीच्या काळात चारा टंचाईवर मात करणे सहज शक्य होते.

शेणखताचा योग्य वापर

योगेश ढेरे यांच्याकडे पशुपालनातून वर्षभरात सुमारे चाळीस टनांपर्यंत शेणखत उपलब्ध होते. त्यातील बहुतांश शेणखत शेतातील पिकांमध्ये वापरले जाते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च बऱ्यापैकी कमी झाला आहे. याचा फायदा शेतीमध्ये दिसून येत असून दर्जेदार पीक उत्पादनासह आणि उत्पादनवाढ मिळत आहे. शिवाय सेंद्रिय कर्बही वाढला आहे.

एका खासगी डेअरीकडून पशुपालकांना इंधन खर्च बचतीसाठी बायोगॅस सयंत्र देण्यात आले आहेत. ढेरे यांनाही हे सयंत्र मिळालेले आहे. या सयंत्रामुळे दर महिन्याला इंधन खर्चावरील सुमारे दीड हजारांपर्यंत बचत होत असल्याचा अनुभव ते सांगतात.

आरोग्य व्यवस्थापन

गोठ्यातील गाईंना दर सहा महिन्यांच्या अंतराने लम्पी, लाळ्या खुरकूत या साथ आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. लम्पीचे दोन महिन्यांपूर्वी तर लाळ्या खुरकुताचे महिनाभरापूर्वी लसीकरण केले आहे.

गोचीड ताप, फऱ्या यांचेही पंधरा दिवसांपूर्वी लसीकरण केले आहे. गरजेनुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार जंतनाशकांच्या मात्रा दिल्या जातात.

वासरांची संगोपन

नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. नवजात वासरांची स्वतंत्र व्यवस्थापन केले जाते. सुरवातीच्या काळात वासरांना सकाळ आणि संध्याकाळी बाटलीद्वारे दूध पाजले जाते. तसेच वाढीसाठी आवश्यक तो खुराक दिला जातो.

साधारण तीन महिन्यानंतर दूध पाजणे हळूहळू बंद करून चारा खाण्याची सवय लावली जाते. वासरांच्या स्वतंत्र व्यवस्थापन करण्यामुळे त्यांची वाढ चांगली होत असल्याचा अनुभव योगेश ढेरे सांगतात.

योगेश ढेरे ९६५७५९९३९१ (शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य

Retreating Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

SCROLL FOR NEXT