Dairy Business Agrowon
काळजी पशुधनाची

Dairy Business : उत्तम, काटेकोर व्यवस्थापनातून दुग्धव्यवसाय केला किफायतशीर

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथील सचिन वरेकर व कुटुंबीयांनी कोणत्याही मजुरांविना एकोप्याने काम करीत सुमारे २२ गायचे संगोपन असलेला दुग्धव्यवसाय फायदेशीर केला आहे. उत्तम खाद्य-खुराक, जनावरांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य, हिरव्या चाऱ्याची वर्षभर उपलब्धता, मुक्त गोठा पद्धती ही त्यांच्या व्यवस्थापनाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे आपला गोठा लंपी रोगापासून मुक्त ठेवण्यातही कुटुंबाला चांगले यश आले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या सीमेवरील उदगाव (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथे सचिन राजाराम वरेकर (वय वर्षे ४१) यांचा नेटके व्यवस्थापन (Dairy Management) असलेला गोठा (Cattle Shed) आहे. सचिन यांनी विशेष श्रेणीत बीए (इंग्लिश) ही पदवी घेतली. त्यांचे वडील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. सचिन यांनी शिक्षक व्हावे अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण त्यांनी नोकरीस नकार देऊन दुग्धव्यवसायास (Dairy Business) पसंती दिली.

सन २००२ मध्ये दोन गायी विकत आणून कोणत्याही अनुभवाशिवाय व्यवसायास प्रारंभ केला. चार एकर शेती आहे. वडील शिक्षकी पेशा सांभाळून शेती पाहण्याची कसरतही करायचे. दरम्यान छोट्या भावाचे आकस्मिक निधन झाल्यानंतर कुटुंबाचे स्वास्थ्य व घडी विस्कटली. अशा आव्हानात्मक परिस्थितीतून सचिन यांनी व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेतली. सन २००७ पर्यंत गोठ्यात गायींची संख्या बारापर्यंत झाली. काहींची गोठ्यात पैदास झाली तर काही गायी विकत आणल्या.

गोठ्याचे नेटके व्यवस्थापन

गोठ्याचे तीन भागांत वर्गीकरण केले आहे. एका भागात दुभत्या, दुसऱ्या भागात गाभण व दूध देणाऱ्या तर तिसऱ्या भागात व्यायला आलेल्या गायी अशी विभागणी आहे. दोन विभाग प्रत्येकी १५ गायींचे तर एक विभाग सात गायींचा आहे. लोखंडी अँगलचा वापर करून हवेशीर बांधकाम केले आहे. गारव्यासाठी पंख्याची व्यवस्था केली असून रोगराई कमी करण्यासाठी मॅटचा वापर केला आहे. मुक्त गोठा पद्धतीची व्यवस्था आहे. गोठ्याची स्वच्छता केलेले पाणी चारा पिकांना दिले जाते. सध्या गोठ्यात गायींची संख्या २२ (जवळपास सर्व एचएफ) असून पैकी १५ गायी दूध देणाऱ्या आहेत.

कुटुंबाचा सहभाग

वरेकर कुटुंबीय मजुरांविना गायींचा सांभाळ करते ही उल्लेखनीय बाब आहे, सचिन यांच्यासह पत्नी मनीषा व वडील राजाराम हे देखील व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. सचिन खाद्य, वैरण कापणी आदींचे नियोजन करतात. तर मनीषा यांच्याकडे यंत्राद्वारे दूधकाढणीचे काम असते.

वर्षभर घरचा चारा

चार एकरांपैकी दोन एकरांत विविध चारा घेतला जातो. एक एकरात संकरित नेपियर गवत तर प्रत्येकी अर्ध्या एकरात मका व ज्वारी घेण्यात येते. प्रत्येक पिकाचा ‘प्लॉट’ ठराविक अंतराने घेत राहिल्याने वर्षभर हिरवा व संतुलित पद्धतीने चारा उपलब्ध होत राहतो. कोरडा चारा म्हणून कडब्याचा वापर केला जातो. यंत्राच्या माध्यमातून कुट्टी केली जाते.

जनावरांच्या आरोग्याची काळजी

सचिन यांनी व्यवसायातील विविध माहितीचे संकलन करून गायींचे आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण त्यामुळे कमी आहे. जनावरांच्या वजनाच्या आठ टक्के अन्न व दहा टक्के पाणी देण्याकडे कल असतो. ज्यांचे वजन ४०० किलो आहे व दूध देण्याची प्रति दिन क्षमता २५ लिटरच्या आसपास आहे अशांना दररोज ३५ ते ४० किलोच्या आसपास खाद्य देण्यात येते. यात सरकी, गोळी, शेंग पेंड, मका व गहू पीठ असे प्रथिनयुक्त घटक दिले जातात. गाभण गाईंना एक किलो खाद्य जादा दिले जाते. भाकड गायींचे खाद्य व्यवस्थापनही चांगले ठेवले जाते.

अर्थकारण

दररोज सरासरी ३२५ ते ३५० लिटर दूधसंकलन होते. बहुतांशी गायी दिवसाला २५ ते ३० लिटरपर्यंत दूध देतात. ३.७ ते ३.८ फॅट तर ८.८ च्या दरम्यान एसएनएफ असते. वर्षाला सुमारे ७० ट्रॉली शेणखत मिळते. त्याच्या विक्रीतून वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांपर्यंतचे अतिरिक्त उत्पन्न मिळते. शेतकरी गोठ्यातूनच शेण घेऊन जातात. दूध सहकारी संघाला जात असल्याने वर्षाला सुमारे दोन लाख रुपयांचा लाभांश दिला जातो. सचिन यांनी एक दूध संस्था चालवण्यास घेतली आहे. त्यामार्फत दूध संघास जाते.

सातत्याने प्रयोगशील

सचिन सातत्याने सोशल मीडियाच्या विविध प्रकारांचा वापर गोठा व्यवसाय वृद्धीसाठी करतात. आधुनिक व्यवसाय व तंत्रज्ञान याबाबतचे ज्ञान त्यातून होते. गायींची प्रसूती झाल्यानंतर त्यांची ताकद काही प्रमाणात कमी झालेली असते. ही ताकद टिकवून ठेवण्यासाठी प्रसूतीपूर्वीच दोन महिने गाईची अत्यंत काटेकोरपणे निगा ठेवण्यात येते. यात सकस खाद्य मिनरल मिक्चर, कॅल्शिअम, फॉस्फरस, जीवनसत्वे आदी घटक देण्याचा प्रयत्न असतो. प्रसूतीनंतर पाचव्या ते दहाव्या दिवसानंतर गाय चांगले दूध देण्याच्या क्षमतेकडे जाऊ लागते. अशा व्यवस्थापनामुळे गायीमध्ये आजारपणा येत नाही व दूध ही संकलनही घटत नाही.

लंपी वर केली मात

अलीकडील काळात लंपी या रोगाने दुग्धउत्पादकांवर मोठे संकट ओढवले. जनावरे सुरवातीपासूनच सशक्त ठेवली. वेळच्यावेळी सर्व लसीकरण व खुराक चांगला ठेऊन रोगप्रतिकारक ठेवल्याने या रोगाला गोठ्याबाहेर ठेवण्यात वरेकर यशस्वी झाले. अगदी अखेरच्या टप्प्यात काही दिवस एका गायीला लंपीची लक्षणे जाणवली. पण रोग तातडीने आटोक्यात आला. मध्यंतरी काही काळ वरेकर अन्य व्यवसायाकडे वळले. या काळात काही गायी कमी केल्या. पण त्या व्यवसायात मंदी आल्याने २०१६ पासून सचिन यांनी पुन्हा पूर्ण क्षमतेने दुग्ध व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. भविष्यात त्यात अजून वाढ करण्याचा मानस आहे.

सचिन वरेकर-८६०५८१५०९१

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT