नागपूर जिल्ह्यातील रिधोरा गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी अन्य गावाचा शोध चालविला. सातगाव येथे त्यांचे शासकीय स्तरावर स्थलांतर करण्यात आले. असे असले तरी बहुतांश शेतकऱ्यांची शेती (Agriculture) चारगाव शिवारात होती. त्यामुळेच अनेकांनी याच गावी वसण्याचा निर्णय घेतला.
स्थलांतरित रिधोरा ग्रामस्थांचा पूर्वीपासूनच दुग्धोत्पादनावर (Milk Production) भर होता. त्यामुळे चारगावला आल्यावरही त्यांनी पारंपरिक व्यवसाय सुरुच ठेवला. सन १९९७ मध्ये हे स्थलांतरण झाले. त्यानंतर गेल्या २४ वर्षांच्या कालावधीत प्रगतिपथावर राहून चारगावने दुधात आघाडी घेतली आहे.
शेतीतील वाटचाल
चारगाव येथील गोपीचंद बोंडे यांचे वडील ‘टेलरिंग’ व्यवसायात होते. सुकळी हे त्यांचे मूळ गाव. या कुटुंबाकडे शेती नव्हती. गोपीचंद यांच्या आजीच्या नावे असलेली सहा एकर शेती त्यांना मिळाली. ती वन्य भागात असल्याने ती विकण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर जिल्हयात सासुरवाडी असल्याने त्या ठिकाणीच शेती घ्यायला त्यांनी प्राधान्य दिले.
ती विकल्यानंतर चारगावला सद्या असलेल्या साडेतीन एकर शेतीची खरेदी केली. सिंचनासाठी विहिरीचा पर्याय आहे. पाटपाणी देण्यावर भर असतो. बोडे खरिपात कपाशी घेतात.एकरी उत्पादकता आठ ते दहा क्विंटलपर्यंत आहे. गेल्यावर्षीच्या हंगामात एकरी कमाल दर १० हजार रुपये प्रति क्विंटल त्यांना मिळाला होता.
दुग्धव्यवसायात प्रगती
गोपीचंद यांचे नातेवाईक शंकर बथकल यांच्याकडे २० ते २५ म्हशी होत्या. त्यातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली होती. त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. हाच व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यावेळी त्यांचे वय अवघे २० वर्षाचे होते. सुरवातीला चार म्हशींची खरेदी समुद्रपूर (वर्धा) भागातून केली.
सुरवातीला २० ते ३० लिटर दूध उपलब्ध होऊ लागले. चारगाव पासून काही अंतरावर बुटीबोरी हे नागपूरचे औद्योगीक क्षेत्र आहे. त्यामुळे या भागात दूध आणि प्रक्रियाजन्य पदार्थांना मागणी अधिक असते. डेअरी व्यावसायिकांची संख्याही या भागात अधिक आहे. ही सर्व संधी ओळखली. दुधाचा पुरवठा सुरू झाला. त्यातून चांगले अर्थार्जन होऊ लागले. त्यानंतर व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. आज लहान मोठी मिळून जनावरांची संख्या ३९ वर पोचली आहे. त्यातील दुधाळ जनावरे वीसपर्यंत आहेत. प्रतिदिन १०० लिटरपर्यंत दूध संकलन होते.
प्रक्रियाजन्य पदार्थाची विक्री
सुरवातीला दुधाला अपेक्षीत बाजारपेठ आणि दरही मिळत नव्हता. परिणामी उपलब्ध सर्व दुधापासून दही तयार केले जायचे. आता मात्र दह्यासोबत लोणी देखील तयार केले जाते. शुक्रवार, मंगळवार असे आठवड्यातील दोन दिवस दही ‘मार्केट’ भरायचे. नागपूर येथील जानकी टॉकीजनजीक भरणाऱ्या या बाजारात १५ लिटर क्षमतेचे पाच डबे नेऊन विक्री करण्यावर गोपीचंद यांचा कल होता. दही, लोण्याची मोठी उलाढाल या ठिकाणी व्हायची. कोरोनाच्य काळानंतर ही बाजारपेठ जी बंद पडली ती पुन्हा सुरु झालीच नाही. त्यानंतर प्रक्रियाजन्य पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांनी विक्रीसाठी नवे पर्याय शोधले.
पशुखाद्याची सोय
जनावरांना मोठ्या प्रमाणावर चाऱ्याची गरज भासते. त्यासाठी हरभरा कुटाराची खरेदी हंगामात केली जाते. दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक त्यासाठी केली जाते. ढेपीच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. ५० किलो ढेपीसाठी पूर्वी ७०० ते १००० रुपये मोजावे लागायचे. आता त्याचे दर दोनहजार रुपयांवर पोचले आहेत. दुधाळ जनावरांसाठी दररोज ५० किलो ढेप लागते.
एका जनावरावरील आहाराचा दररोजचा खर्च किमान १५० रुपये आहे. प्रति जनावरापासून दोन्ही वेळचे मिळून सुमारे १२ लिटर दूध मिळते. फॅटनुसार त्यास ५५ ते ६० रुपये प्रति लिटर दर मिळतो. दोन वर्षांपूर्वी चारगाव येथे पशुचिकित्सक म्हणून पवन भागवत रुजू झाले. गावात मोठ्या प्रमाणावर दूध संकलन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याचा पाठपुरावा करीत गावात मदर डेअरीचे संकलन केंद्र त्यांनी सुरु केले. त्याचा फायदा आज गोपीचंद यांच्यासह गावातील बहुतांश पशुपालकांना होत आहे.
गोपीचंद बोडे- ८०८०३७३३७५, ९७६७८५७००२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.