Desi Cow Conservation : सुमारे शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश गॅझेटियर्समध्ये कुलाबा (सध्याचा रायगड जिल्हा) जिल्ह्यात जवळपास सर्व बैल (स्थानिक गुरे) कणखर, सक्रिय आणि सुबक शारीरिक बांध्याचे आणि दख्खन आणि गुजरातच्या बैलांच्या तुलनेत स्वभावाने गरीब,लहान आकार आणि कमकुवत असल्याचे नमूद केलेले आहे.
२०१२ मध्ये झालेल्या जातिनिहाय पशुगणनेवरुन कोकणातील स्थानिक गोधन सुमारे सहा लाखांच्या घरात असल्याचे दिसते. कोकण कपिलाचा विस्तार शेजारील गोवा राज्यात सुद्धा आढळतो तथापि, गोव्यामध्ये कोकण कपिलाच्या शरीरयष्टीशी साधर्म्य असणारी आणि संपूर्ण पांढरा रंग असणाऱ्या गोवंशाची श्वेत कपिला अशी नोंद करण्यात आली आहे. या गोवंशाची शास्त्रीयदृष्ट्या अधिकृत नोंद राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संसाधन ब्यूरो (कर्नाल) या संस्थेमार्फत करण्यात आली आहे.
गोवंशाचे महत्त्व
स्थानिक पशुपालकात कोकण गिड्ड किंवा कोकणी गाय म्हणून हा गोवंश सुपरिचित आहे. कोकणातील दुर्गम आणि विषम वातावरणात, निकृष्ट चारा, कमी खर्चात आणि माफक व्यवस्थापनात स्थानिक पशुपालकांच्यासाठी हा गोवंश महत्त्वाचा आहे.
मुख्यत्वे शेतीकाम आणि वाहतुकीसाठी हा देशी गोवंश उपयुक्त आहे.
कोकण कपिला गोवंश मुख्यत्वे रंगाने गडद तपकिरी असून त्या तांबड्या विटकरी, राखाडी, काळ्या तसेच मिश्र रंगसंगतीत आढळतात.
पापण्या, नाकपुड्या, खुरे, शेपटीचा गोंडा इत्यादी काळ्या रंगात आढळतात. बांधेसूद शरीररचना, सरळ समांतर टोकदार कान व सरळ उतरते कपाळ, मागच्या दिशेने वळणारी आणि मध्यम आकाराची शिंगे, मध्यम आकाराची मानेची पोळी आणि वशिंड आदी शारीरिक गुणधर्म त्यांच्या लहान ते मध्यम आकारमानास साजेसे ठरतात.
पारंपरिक गोपालनात दुधापेक्षा शेतीकाम आणि वाहतुकीसाठी अधिक महत्त्व दिले गेल्याने दररोज साधारण १ ते २ लिटर दूध देण्याची क्षमता आहे. गाईची कास कटोऱ्यासारखी मध्यम आकार, घट्ट बांधणी आणि बोटांसारखी निमुळती टोकदार सडे असणारी दिसते. एक वेतात सरासरी ५५० किलोग्रॅम दूध देते.
पहिल्यांदा माजावर येण्याचे वय, दोन वेतातील अंतर, ऋतुचक्र काळ इत्यादी प्रजनन गुणधर्म दखल घेण्यासारखे आहेत.
उतरत्या टेकड्यांवर न थकता चराई करण्याची विलक्षण क्षमता या गोवंशात आहे. स्थानिक डोंगरदऱ्यात मिळणाऱ्या चाऱ्यावर गुजराण करत उत्तम श्रमशक्ती देणारे आणि रोगप्रतिकार क्षमता असणारा हा गोवंश दुर्गम भागात, जिथे वाहतुकीची व्यवस्था नाही त्याठिकाणी दुधाचा एकमेव स्रोत म्हणून कोकण प्रदेशासाठी वरदायी आहेत.
विषम हवामानात, डोंगराळ भागात शेती आणि ओझे वाहतुकीसाठी, शेणखतासाठी कोकण कपिला गोवंश अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजगाराचे महत्त्वाचे साधन ठरत आहेत.
संशोधन आणि प्रबोधनाच्या माध्यमातून माफसू, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पशूपैदासकार, स्वयंसेवी संस्था या गोवंशाच्या संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९,(सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.