
Traditional Indigenous Cow Farming : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात लक्ष्मीवाडी हे कोरडवाहू पट्ट्यातील गाव आहे. तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आलमप्रभू, धुळोबा, रामलिंग आदी डोंगरांच्या कुशीत वसलेल्या या गावाला निसर्गाचे वरदान लाभले आहे. सुमारे १३०० लोकसंख्येचे आणि अंदाजे ३२५ कुटुंबांचे आटोपशीर अशा या गावाची गोपालकांचे गाव म्हणून विशेष ओळख आहे.
देशी गाय, बैल, वासरे मिळून सुमारे दोनशेहून अधिक पशुधन गावात नांदते आहे. अपवाद वगळल्यास प्रत्येकाच्या गोठ्यात देशी गाय अथवा खिलार बैल आहेच. जुन्या पिढीपासून सुरू असलेला गोपालनाचा हा वारसा अगदी नव्या पिढीने देखील पुढे सुरू ठेवला आहे.
लक्ष्मीवाडीत बहुतांशी कृष्णवंशीय नंदगवळी (हणबर) समाज आहे. गायी- म्हशींचा सांभाळ करून डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा समाज अशी त्याची ओळख आहे. अन्य गावांपासून दूर असलेल्या या गावाचा दिवस घरातील देवपूजा व त्यानंतर गोठ्यातील गायींच्या पूजनाने सुरू होतो.
अलीकडील काळात नवी पिढी नोकरी- व्यवसायात व्यस्त झाली आहे. त्यामुळे वर्षापूर्वी घरटी चार ते पाचपर्यंत असलेली गायींची संख्या आता एक ते दोन गाईंवर आली आहे. सभोवतालच्या डोंगराळ भागात गाईंना सकाळी चरण्यासाठी सोडले जाते.
सायंकाळी पाचच्या दरम्यान गाई घरी येतात. या गाईंचे दूध अत्यंत पौष्टिक असते. कोरोनाच्या साथीत शेजारील गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असताना लक्ष्मीवाडीत मात्र या रुग्णांची संख्या जवळपास नव्हतीच. लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाणही कमी आहे.
गाईंची विक्री नाही
गावातील शेतकरी भुईमूग, भाजीपाला आदी पिके घेतात. गावाला शेतीसाठी गरजेइतकाच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे उसासारखे पीक घेतले जात नाही. रासायनिक खतांचा वापर अत्यंत कमी तर शेणखतावर अधिक भर असतो. यामुळे गावातील जमिनीची सुपीकताही चांगली आहे. गोमूत्र, शेण यांची विक्री केली जात नाही. गाय विकलीही जात नाही. एखाद्या कुटुंबाला गायीचे पालनपोषण करणे अडचणीचे ठरत असेल तर अन्य कुटुंब त्यासाठी मदतीला धावून जाते.
खिलार बैल बहुतांशी शेतीसाठीच वापरले जातात. गावात चार दुग्ध संस्था आहेत. गाय, म्हैस आदींचे मिळून १२०० लिटरपर्यंत दूध संकलित होते देशी गाईचे दूध मात्र घरच्या वापरासाठीच ठेवले जाते. डोंगराळ भाग असल्याने गावात श्रमदान व लोकसहभागातून सुमारे १८ माती बंधारे, दहा सिमेंट बंधारे, बांधण्यात आले आहेत. त्यातून विहिरींची पाणीपातळी वाढली आहे. रस्त्यांची कामे झाली आहेत. मंदिरांचा जिर्णोद्धार विविध निधींच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.