
Indigenous Cow Conservation : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, तर अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात अति पावसाच्या प्रदेशात डांगी गोवंशाचे प्रामुख्याने संगोपन केले जाते. अलीकडील वर्षात हा गोवंश कमी होत चालला आहे.
त्याचे संरक्षण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशावेळी नाशिक जिल्ह्यातील धामणी (ता. इगतपुरी) येथील भोसले कुटुंबीयांनी तब्बल शंभर वर्षांपासून डांगी गायीचे संगोपन व संवर्धनाची मोठी परंपरा जपली आहे.
पिढीजात जपलेली परंपरा
कोणताही व्यावसायिक हेतू न बाळगता गायींच्या प्रेमापोटी कै. भिका कोंडाजी भोसले यांनी १०० वर्षांपूर्वी डांगी गोवंश संगोपनाची परंपरा सुरू केली. अत्यंत निःस्वार्थी हेतूने काम करीत असल्याने त्यांच्याकडील गायी पाहण्यासाठी लोक आवर्जून येत. स्थानिक ते राष्ट्रीय पातळीपर्यंत स्पर्धा, पशू प्रदर्शनांमध्ये त्यांनी पारितोषिके मिळवली होती.
त्यांच्या तीन मुलांपैकी थोरले कचरू यांनी ही परंपरा पुढे चालवली. तेही वडिलांसोबत स्पर्धा, प्रदर्शनांमध्ये जात. त्या काळात घरच्या गायींची संख्या शंभरपर्यंत होती. कुटुंब पुढे विभक्त झाले. तशी जनावरांची संख्याही विभागली.
मात्र कचरू यांच्या तीन मुलांपैकी धाकटे भाऊसाहेब यांनी पाचवीलाच शाळा सोडून वडिलांचा गोसंगोपनाचा वारसा पुढे सुरू ठेवला. तो आजगायत सुरू आहे. भाऊसाहेबांना जातिवंत गोवंश पैदाशीच्या अनुषंगाने कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाबाबत ‘बायफ’ संस्थेचे जितीन साठे, डॉ. संतोष वाकचौरे व पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजाराम भांगरे यांचे मार्गदर्शन मिळाले. सध्या भाऊसाहेबांकडे लहान-मोठी मिळून १५ पर्यंत गोधन आहे.
संगोपनातील नियोजन
पहिल्यासारखी गायराने आता उरली नसल्याने शक्य त्या ठिकाणी नेऊन चराई होते. कुटुंबाची साडेपाच एकर शेती आहे. त्यातील एक एकरांत वर्षभर फेरपालट पद्धतीने शाळू, मका वा अन्य चारापिके घेतली जातात. भाताचे तूस, गरजेनुसार पेंडही देण्यात येते. सकाळी ८ ते साडेदहापर्यंत गायी मोकळ्या रानात मुक्तपणे चराईसाठी सोडल्या जातात.
दुपारच्या काळात खाद्य, पाणी, गोठ्यातीलआराम व दुपारी तीन ते सहापर्यंत पुन्हा गायींना चराईसाठी मुक्त सोडले जाते. पाण्याने धुणे, बदलत्या ऋतूनुसार कोरडा व हिरवा चाऱ्याचे संतुलन, रोगप्रतिकारक शक्तीसाठी आयुर्वेदिक घटकांचा समावेश, पशुवैद्यकांची मदत, विविध रोगांचे लसीकरण आदी उपायांद्वारे गायींचे आरोग्य सांभाळले जाते.
या जित्राबांनी लळा लावला
पूर्वी भोसले कुटुंब गावातच (धामणी) राहायचे. मात्र जनावरांसाठी जागा, पाणी व चाऱ्याची सोय चांगल्या प्रकारे होण्यासाठी भोसले कुटुंब शेतातच राहण्यासाठी आले आहे. जनावरांची वंशावळ भाऊसाहेब यांच्या तोंडपाठ आहे. जातिवंत वळू, कालवडी तयार करून त्यांना प्रदर्शनात नेऊन बक्षिसे मिळविण्याची त्यांची जिद्द असते.
त्यासाठी सर्वार्थाने कुटुंब मेहनत घेत असते. गायींमध्ये जीव गुंतल्याने कुटुंब पूर्ण वेळ संगोपनात रमले आहेत. जास्त गायी सांभाळण्यापेक्षा मर्यादित व त्यातही जातिवंत जनावरे टिकवणे महत्त्वाचे असल्याचे भाऊसाहेब सांगतात.
जातिवंत वळू पैदास कार्यक्रमासाठी वापरल्यास अस्सल डांगी प्रजातीची अधिक दूध देणारी कालवड किंवा गोऱ्हा मिळतो. डांगी गाय प्रति दिन आठ ते साडेआठ लिटर दूध देते. मात्र दुधाची विक्री केली जात नाही. दोन सड वासराला आणि दोन घरगुती वापराला असे भाऊसाहेब सांगतात. लहान वासरांना दूध पोटभर पाजले जाते.
अर्थकारण
पालनपोषण, व्यवस्थित खुराक यातून उत्कृष्ट गोऱ्हे, कालवड करण्यात भाऊसाहेबांचा हातखंडा आहे. त्यामुळेच प्रति गोऱ्ह्यास ७० ते ७५ हजार, तर गायीस ५० हजारांपासून ते ६० हजारांपर्यंत दर जनावरे मिळतो.
वर्षाला सुमारे सहा जनावरांची विक्री होते. दरवर्षी ८ ते ९ ट्रॉली शेणखत मिळते. त्याचा वापर शेतीत होतो. दावणीला चॅम्पियन ठरलेला वळू असल्याने पशुपालक आपल्या गायींसाठी कृत्रीम रेतनकरून घेण्यासाठी येतात. त्यातून प्रति गाय दोन हजारांचे उत्पन्न मिळते.
गोसेवेचे व्रत : पहिल्या पिढीत भिका, पत्नी सोन्याबाई, तर दुसऱ्या पिढीत कचरू, पत्नी गंगूबाई यांनी गोसेवेचे व्रत निष्ठेने पार पाडले. हे जोडपे आता वयोमानानुसार थकले आहे. कचरू यांना पक्षाघाताचा आजार झाला आहे. तरी जनावरांकडे या दांपत्याचे काटेकोर लक्ष असते. भाऊसाहेबांना पत्नी रूपाली, मुलगा करण भाऊ सुरेश व भावजय सुगंधा यांचीही समर्थ साथ आहे.
राष्ट्रीय पातळीवर झालेले सन्मान
शंभरहून अधिक ठिकाणी कृषी-पशू प्रदर्शनांमध्ये सहभाग. त्यासाठी स्वतःला खर्चही करावा लागला.
भारतीय पशुपक्षी प्रदर्शन, महापशुधन एक्स्पो (जालना)- (२०१९) ‘डांगी नर’ गट- प्रथम पारितोषिक
मागील वर्षी महापशुधन एक्स्पो (शिर्डी)- वळूस ‘चॅम्पियन’ सन्मान.
दिल्ली, भोपाळ, नागपूर, चंद्रपूर, जालना, शिर्डी, राजूर, खीरविरे, पेडेवादी, घोटी, वासाळी, बारी, सिन्नर आदी ठिकाणीही वळू ठरले चॅम्पियन.
सिन्नर, राजूर येथे जातिवंत कालवडींनाही पारितोषिके.
भाऊसाहेबांचे वडील कचरू यांच्या काळातही दिल्ली व भोपाळ येथे ‘चॅम्पियन ऑफ द शो’ किताब.
अखिल भारतीय पशुप्रदर्शन (नागपूर) (दोन वर्षांपूर्वी) ‘टॉप ब्रीड स्पर्धेत ‘चॅम्पियन’ किताब.
प्रामुख्याने आदात दोन, चार, सहा, आठ दात जनावरांच्या प्रकारातील हे सन्मान. वळूंचा खांदा, गळा, रंग, शेपटीचा गोंडा काळा, काळी मध्यम शिंगे, खूर, कांबळ यांची ठेवण पाहण्यासारखीच.
भाऊसाहेब भोसले ८००७१०९२६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.