Lumpy Skin
Lumpy Skin Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’चा प्रकोप थांबता थांबेना

टीम ॲग्रोवन

पुणे : राज्यात गेल्या अडीच महिन्यांपासून गोवंशीय पशुधनांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आणि ९९.७९ टक्के लसीकरण (Lumpy Vaccination) होऊनही नियंत्रणात न आलेल्या ‘लम्पी स्कीन’चा (Lumpy Skin Outbreak) प्रकोप थांबलेला नाही. या उलट गेल्या पंधरा दिवसांत सात हजारांवर जनावरे या चर्म आजाराने मृत्युमुखी (Animal Died) पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे पशुसंवर्धन विभाग (Department Of Animal Husbandry) नियंत्रणाचा दावा करत असले, तरी मृत्यू पावलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्याने शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.

देशात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात धुमाकूळ घातल्यानंतर सप्टेंबर महिन्यात लम्पी स्कीन आजार महाराष्ट्रात दाखल झाला. प्रारंभी १२ नंतर २४ आणि आता राज्यातील जवळपास सर्व ३५ जिल्ह्यांत लम्पी स्कीन या चर्म आजाराचा प्रादुर्भाव गोवंशीय पशुधनामध्ये झाला आहे. बुलडाणा, अमरावती, अकोला, नगर, जळगाव आदी जिल्हे यात सर्वाधिक प्रादुर्भावित मानले जात आहेत. दूध उत्पादनातही घट झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. दूध उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्राला हे नुकसान नक्कीच पेलवणारे नाही.

पशुसंवर्धन आयुक्तालयानुसार एकूण ३९०८ संसर्ग केंद्रांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव आहे. सप्टेंबरच्या मध्यावर ८९ जनावरे मृत्युमुखी पडलेली असताना, आता तब्बल ७५ दिवसांनी राज्यातील २३ हजार ४९३ जनावरे या रोगाने मृत्युमुखी पडली आहेत. मृत्यू झालेल्या पशुधनांची नुकसान भरपाई म्हणून १० हजार ४५५ पशुपालकांना २६ कोटी ६१ लाख रुपये मदत देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिली आहे.

यात सर्वाधिक मदत अमरावतीमध्ये १ हजार ४०३ पशुधनाला ३ कोटी ६५ लाख ६५ हजार रुपये, जळगाव जिल्ह्यात १ हजार २७८ पशुधनाला ३ कोटी २१ लाख ११ हजार रुपये, तर बुलडाणा जिल्ह्यात १ हजार २३० पशुधनाला ३ कोटी १८ लाख१३ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

राज्यात २ डिसेंबरअखेर ३ लाख ३६ हजार ९५८ बाधित पशुधनांपैकी २ लाख ५५ हजार ५३५ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबरअखेर एकूण १ कोटी ४४ लाख १२ हजार लसमात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून १ कोटी ३९ लाख २३ हजार लसमात्रांद्वारे मोफत लसीकरण करण्यात आले आहे. ही आकडेवारी सुमारे ९९.७९ टक्के आहे. लसीकरणामध्ये खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांचा समावेश आहे.

दृष्टिक्षेपात राज्यातील ‘लम्पी स्कीन’ प्रादुर्भाव...(२ डिसेंबर २०२२)

- बाधित जनावरे : ३ लाख ३६ हजार ९५८

- बरी झालेली जनावरे : २ लाख ५५ हजार ३३५

- आतापर्यंत मृत्युमुखी : २३४९६

- लस मात्रा उपलब्ध : १४४.१२ लाख

- मोफत लसीकरण : १३९.२३ लाख

- एकूण लसीकरण : ९९.७९ टक्के

(माहिती : पशुसंवर्धन आयुक्तालय)

बुलडाण्यात सर्वाधिक मृत्यू

‘लम्पी स्कीन’च्या प्रादुर्भावामुळे वऱ्हाडातील बुलडाणा जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मृत्युदर १० टक्क्यांपर्यंत आहे. आतापर्यंत या जिल्ह्यात ४४०० पेक्षा अधिक जनावरे दगावली आहेत. तर या पाठोपाठ नगर २८००, अमरावती २३००, अकोला जिल्ह्यात १९१४ जनावरे आतापर्यंत दगावली आहेत. या जिल्ह्यांत ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आता कमी होत आहे, बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा पशुसंवर्धन यंत्रणा करीत आहे.

पशुसंवर्धन मंत्र्यांच्या जिल्ह्यात चिंता...

राज्याचे पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यातही लम्पी स्कीन आजाराचा जनावरांमध्ये चांगलाच प्रादुर्भाव आहे. दररोज ५० ते ६० जनावरे मृत्युमुखी पडत असल्याची माहिती असून, अडीच महिन्यात सुमारे २८०० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. राज्यात दूध उत्पादनातील नगर महत्त्वाचा जिल्हा आहे, येथे दूध उत्पादन कमी झाल्यास भरपाईही वेळेत मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारीही आहे.

मी शेतीसोबत दुधाचा व्यवसाय करतो. माझ्याकडे तीन गायी आहेत. त्यातील पाच महिन्यांची एक गाभण गाय लम्पी स्कीन आजारामुळे १५ दिवसांपूर्वी दगावली. लसीकरण केले होते. औषधोपचारही केले. पण लम्पी नियंत्रणात आला नाही. सुमारे ५० हजार रुपये किमतीची गाय होती, अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही.
गोविंदा बढे, आडविहिर, ता. मोताळा, जि. बुलडाणा
सध्या दुधाला चांगला दर मिळत आहे, मात्र लम्पी स्कीन या आजारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. दूध उत्पादनात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. पशुसंवर्धन विभागाकडून दक्षता घेतली जाते. मात्र जनावरे मयत झाल्यानंतर मदतीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात पैसे मिळत नाहीत. माझा एक बैल मयत होऊन सव्वा महिना आणि गायीस पंचवीस दिवस होत आले. अजून काहीही मदत मिळाली नाही. ज्या कुटुंबाचा भार केवळ दूध व्यवसायावर झालाय, त्यांची परिस्थिती लम्पी स्कीनने अवघड केलंय.
सर्जेराव पाचपुते, दूध उत्पादक शेतकरी, काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. नगर
लम्पी स्कीन आजारामुळे माझे सुमारे १० हजार रुपये किमतीचे वासरू दगावले. औषधोपचार केले. पण त्याचा प्रभाव फारसा झाला नाही. अचानक हे वासरू दगावले.
यशवंत खारोडे, तळेगाव बाजार, जि. अकोला
माणसांमधील साथीचा रोग असलेल्या कोरोना नियंत्रणाप्रमाणे जनावरांप्रती तशी संवेदनशील भूमिका शासनाने घेतली नाही. त्यामुळेच मृत्यूचे प्रमाण वाढले. आमच्या लोकवस्तीच्या गावात १५ जनावरे दगावली. शासकीय मदत देण्याचे सौजन्यदेखील दाखविले जात नाही, पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचारी कमी असल्याचे कारण देत सेवा मिळत नाही. परिणामी, खासगी पशुवैद्यकाची सेवा घ्यावी लागली.
सुधीर ठाकरे, वडूरा, चांदूर बाजार, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT