Animal Husbandry Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : गाई, म्हशींतील गर्भपातावर उपाययोजना

Animal Husbandry : गर्भपातानंतर वंध्यत्व होणे, जनावरे वारंवार माजावर येणे, दोन वेतांमधील कालावधी वाढणे अशा समस्यांमुळे पुनरुत्पादन आणि दुग्ध व्यवसाय परिणाम होतो.

Team Agrowon

डॉ. राजश्री गंदगे- पाटील

Animal Health : जनावरांमध्ये पौष्टिक घटकांची कमतरता, चयापचय आणि संप्रेरकांची विकृती, आघात, विषारी द्रव्ये, जंतूच्या संक्रमणाचा परिणाम आणि काही अज्ञात कारणांमुळे गर्भपात होऊ शकतो. गर्भपाताच्या कारणांची विभागणी असंसर्गजन्य आणि संसर्गजन्य अशा दोन मुख्य प्रकारांमध्ये केली जाते.

गर्भपाताची असंसर्गजन्य कारणे

अ) भौतिक कारणे

निसरड्या जमिनीवर पडल्याने आणि गाभण जनावरांमधील भांडणामुळे दुखापत होऊन गर्भपात होऊ शकतो.

उच्च पर्यावरणीय तापमानाच्या तणावामुळे गाभण जनावरांमध्ये विपरीत परिणाम होतो. चांगल्या व्यवस्थापन पद्धती अवलंबून भौतिक कारणांमुळे होणारे गर्भपात टाळता येते.

ब) रासायनिक / विषारी द्रव्ये

कीटकनाशके आणि अनेक वनस्पतींमध्ये आढळणारे विषारी घटक गर्भपातास कारणीभूत ठरू शकतात.

नायट्रोजनयुक्त व्यावसायिक खते मोठ्या प्रमाणात दिल्यावर कुरणातून नायट्रेट/नायट्राइटचे विषबाधा होऊन जनावरांमध्ये वारंवार गर्भपात होऊ शकतो. नायट्रेटच्या विषबाधामुळे श्‍वास घेण्यास गंभीर त्रास होतो, स्नायूंचे थरथरणे आणि श्‍लेष्मल त्वचा तपकिरी दिसणे आणि रक्तातील घटकांमध्ये बदल अशी लक्षणे दिसतात.

गाभण जनावरांना नायट्रेट आणि कीटकनाशकरहित उत्तम चारा देऊन रासायनिक / विषारी द्रव्यांमुळे होणारा गर्भपात टाळू शकतो.

क) संप्रेरकांची असंतुलनता

गाभण जनावरांमध्ये काही संप्रेरकाची संतुलनता असणे महत्त्वाचे असते.

इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, प्रोस्टॅग्लॅंडिन संप्रेरकांचे असंतुलन झाल्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

गाभण जनावरांची पशुचिकित्सकाकडून नियमित तपासणी करून घ्यावी.

ड) पौष्टिकतेची कमतरता

गाभण जनावरांना योग्य पोषण न मिळाल्यास उदा. जीवनसत्त्व अ आणि इ, सलेनियम, आयोडीन, लोह आणि पोषण तत्त्वाच्या कमतरतेमुळे गर्भाची योग्य वाढ होत नाही.

यामुळे मृत आणि कमकुवत नवजात वासरांचा जन्म होतो किंवा गर्भपात होऊ शकतो.

गर्भपाताची संसर्गजन्य कारणे

अ) जिवाणूजन्य गर्भपात

जनावरांमध्ये जिवाणूजन्य गर्भपात मुख्यत्वे ब्रुसेलोसिस, लेप्टोस्पायरोसिस, व्हिब्रीओसिस, कॅम्पायलोबॅक्टेरिओसिस, लिस्टेरियोसिस, क्लायमिडिओसिस आजारांमुळे गर्भपात होतो. या शिवाय अर्कानोबाक्टर पायोजनेस, साल्मोनेला, अॅक्टिनोमायसिस, एस्चेरिशिया कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, स्टेफिलोकोकस, बॅसिलस, पाश्च्युरेला इत्यादी जिवाणूंच्या संसर्गाने गर्भपात होऊ शकते.

सांसर्गिक गर्भपात (ब्रुसेलोसिस)

अत्यंत संसर्गजन्य, झुनोटिक (प्राण्यापासून माणसास होणारा) आजार असून, तो ब्रुसेला अबॉर्टस नावाच्या जिवाणूमुळे होतो.

प्रयोगशाळेमध्ये जिवाणूवर काम करणाऱ्या व्यक्ती, कत्तलखान्यात काम करणारे कामगार, पशुवैद्यक, जनावरे उत्पादक आणि मांस-वेष्ठित (पॅकेजिंग) करणारे कर्मचारी हे अगदी सहज या जिवाणूच्या संपर्कात येत असल्याने संक्रमित होऊ शकतात.

गाई आणि म्हशींमध्ये या जिवाणूचा संसर्ग प्रामुख्याने दूषित खाद्य, पाण्याचे अंतर्ग्रहण, श्वसन, नेत्रश्‍लेष्मल, श्‍लेष्मल त्वचा, इत्यादीद्वारे विविध माध्यमांतून होतो.

गर्भपातानंतर थेट संपर्क आल्याने आणि पर्यावरणीय दूषिततेमुळे, लैंगिक संक्रमण आणि कृत्रिम गर्भादान यामार्फत जिवाणूचे संक्रमण होते.

गर्भधारणेच्या शेवटच्या तिमाहीत गर्भपात होतो, झार/ वार बाहेर न पडणे, पुनरावृत्ती प्रजनन इत्यादी परिणाम ब्रुसेलोसिसमुळे होतात.

विविध नमुन्यांची उदा. गर्भपातीत सामग्री, रक्तजल, दूध इत्यादींचे वेगवेगळ्या चाचण्या करून आजाराचे प्रयोगशाळेत निदान केले जाते.

ब) विषाणूजन्य गर्भपात

संसर्गजन्य बोव्हाइन ऱ्हिनोट्राकायटिस

जगभरात बोवाइन हर्पेसव्हायरस-१ हे विषाणूजन्य गर्भपाताचे प्रमुख कारण आहे, लसीकरण न केलेल्या कळपांमध्ये गर्भपाताचा दर ५- ६० टक्के असतो. चार महिन्यांच्या गर्भधारणेनंतर बहुतेक गर्भपात आढळतात आणि १ ते ५० टक्क्यांपेक्षा जास्त कळप संक्रमणाने प्रभावित होऊ शकतो.

BoHV-१ विषाणूच्या संसर्गामुळे जनावरांमध्ये तुरळकपणे गर्भपात होऊ शकतात. विषाणूचा संसर्ग जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकतेवर परिणाम करतो.

बोवाइन व्हायरल डायरिया

बोवाइन व्हायरल डायरियामध्ये पेस्टिव्हायरस विषाणू गर्भपातास कारणीभूत असतात. हा विषाणू संक्रमित जनावरांच्या संपर्कातून आणि लैंगिकरित्या देखील संक्रमित होतो.

गर्भधारणेच्या सुरवातीच्या काळात बोवाइन व्हायरल डायरिया विषाणूच्या संसर्गामुळे भ्रूण मृत्यू, वंध्यत्व; गर्भ वितळून नष्ट होणे; गर्भपात; वारंवार माजावर येणे; कमकुवत/अकाली/ मृत वासरे जन्मणे अशी लक्षणे या आजारात दिसतात.

संवेदनाक्षम प्रजननशील जनावरांच्या गटामध्ये विषाणू संसर्गाचा शिरकाव झाल्यास आर्थिक नुकसान होते, परिणामी पुनरुत्पादन कार्यक्षमता खराब होते. कायम स्वरूपी विषाणू संक्रमित वासरांचा जन्म होतो.

कळपातून संसर्गजन्य जनावर काढून टाकावे. लसीकरण अत्यंत प्रभावी आहे.

बुरशीजन्य गर्भपात

कळपातील १०-२० टक्के गाभण जनावरांवर बुरशीजन्य संक्रमणाचा परिणाम होतो. गर्भपात सहसा हिवाळा आणि वसंत ऋतूच्या महिन्यांत घडतात.

जनावरांना कायम गोठ्यात ठेवल्यास तसेच त्यांना बुरशीयुक्त गवत किंवा सायलेज दिल्याने गर्भपात होतो. सरासरी ६० टक्के गर्भपात एस्परगिलस फ्युमिगेटसमुळे, २० टक्के झायगोमायसेट्स आणि उर्वरित

२० टक्के तंतुयुक्त आणि एकपेशीय बुरशीमुळे होतात.

बुरशीजन्य गर्भपात सामान्यतः गर्भधारणेच्या ६ महिन्यांनंतर नोंदवले जातात. गर्भपात झालेल्या जनावरात गर्भवेष्टण बाहेर टाकले जात नसल्याने त्रास होतो.

गर्भपातीत नमुन्यातून बुरशीची प्रयोगशाळेमध्ये माध्यमावर वाढ केली जाते आणि वेगवेगळ्या चाचण्या करून आजाराचे निदान केले जाते.

निदान

गर्भपाताचे निदान पूर्वेतिहास, गर्भपाताचा टप्पा, गर्भ आणि गर्भवेष्टणाचे स्थूल स्वरूप इत्यादींच्या आधारावर तसेच प्रयोगशाळेत विविध नमुन्यांची जसे की गर्भपातीत सामग्री, गर्भाशयातील स्राव, रक्तजल आणि दूध यांचे वेगवेगळ्या चाचण्या करून केले जाते.

प्रतिबंध आणि नियंत्रण

गाभण जनावरांना स्वच्छ व सुरक्षित गोठ्यात ठेवावे. स्वच्छ पाणी आणि चारा द्यावा, चांगल्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. मान्यताप्राप्त लस वापरावी.

संक्रमण आणि इजा टाळण्यासाठी गाभण जनावरांना इतर जनावरांच्यापासून वेगळे ठेवावे.

पूर्वी गर्भपात झालेल्या जनावराची विशेष काळजी घ्यावी.

गाभण जनावरांची वाहतूक करणे टाळावे. सहा महिन्यांवरील गाभण जनावरास चराईसाठी नेऊ नये. त्यांची योग्य काळजी घ्यावी.

गाभण जनावरांच्या पोषण आणि पौष्टिकतेची विशेष काळजी घ्यावी.

गर्भपातानंतर ३ ते ४ महिन्यांपर्यंत प्रजनन करू नये. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याचे पालन करावे.

लैंगिक माध्यमातून होणारे संक्रमण टाळण्यासाठी कृत्रिम रेतनाचे अनुसरण करावे अन्यथा ब्रुसेला संसर्गमुक्त प्रजनन वळू किंवा वळूच्या रेतमात्रा वापराव्यात.

जनावरे खरेदी करताना गर्भपाताचा इतिहास घ्यावा. विषेशतः सांसर्गिक गर्भपाताची (ब्रुसेलोसिस) चाचणी करावी.

नव्याने खरेदी केलेल्या जनावरांचा लगेच कळपात समावेश करू नये.

प्रयोगशाळेत गर्भपाताच्या कारणाचे निदान झाल्यास भविष्यात गर्भपात रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोरपणे पालन करावे.

पशुवैद्यकाच्या सल्ल्याचे गर्भपाताच्या प्रतिबंधासाठी आवश्यक लसीकरण करून घ्यावे.

मृत गर्भ, गर्भपातीत सामग्री आणि बाधित साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावे. संपूर्ण बाधित क्षेत्र निर्जंतुक करावे.

डॉ. राजश्री गंदगे- पाटील, ८८५०१६६०१५

(सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख, मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT