Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon

Animal Disease : वासरांमधील रोटा विषाणू हगवणीची कारणे अन् उपाययोजना

Animal Husbandry : थंडी संपून उन्हाळ्यास सुरुवात होत असताना नवजात वासरू आणि काही अंशी मोठ्या वयाच्या जनावरांमध्ये रोटा विषाणू हगवण हा आजार दिसतो.

डॉ. सुप्रिया काशीकर

Animal Care : हिवाळ्यानंतर उन्हाळ्याची सुरुवात होत असताना लहान नवजात वासरे आणि प्रौढ आजारी जनावरांमध्ये विषाणू, जिवाणू, बुरशी किंवा परजीवी आजारांचा धोका सर्वाधिक असतो. वासरांमधील रोटा विषाणू हगवण हा महत्त्वाचा आजार आहे.

साधारणतः आजार जानेवारी ते जून या काळात दिसतो. थंडी संपून उन्हाळ्यास सुरुवात होत असताना नवजात वासरांमध्ये आणि काही अंशी मोठ्या वयाच्या जनावरांमध्ये हा आजार दिसतो. हा पचनसंस्थेशी निगडित आजार आहे. एक ते दोन महिन्यांच्या वासरांपासून तीन वर्षांच्या वासरांमध्ये या

विषाणूंचा धोका असतो. चार आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये हा आजार आढळतो. प्रथमतः संसर्गित झालेली वासरे या आजाराची लक्षणे दाखवतात. परंतु दुसऱ्या वेळेस संसर्ग किंवा प्रौढावस्थेत आजाराचा प्रादुर्भाव झाला तर तो तेवढा धोकादायक नसते.

गाई, म्हशीच्या चिकामध्ये भरपूर प्रमाणात प्रतिपिंडे असतात. यामुळे नवजात वासराचे आजारांपासून संरक्षण होत असते. परंतु जसे जसे दुधातील प्रतिपिंडांचे प्रमाण कमी होते किंवा वासरांना कमी दुग्धपान दिले जाते तसतसा आजाराच्या संक्रमणाचा धोका वाढतो.

Animal Husbandry
Animal Disease : नगर जिल्ह्यात जनावरांना लाळ्या खुरकुताची साथ

प्रसार

आजार मानवासह इतर प्राण्यांमध्ये देखील आढळतो. गोठ्यातील अस्वच्छता हे संसर्गाचे मुख्य कारण आहे.

रोटा विषाणू बाह्यस्रोतांमुळे प्रसारित होतो. जन्मतः हा आजार वासरात आढळून येत नाही. संसर्गित जनावरांची हगवण/ अतिसारामार्फत प्रसार होतो. गोठ्यातील संक्रमित वस्तू, दावण, गव्हाणी मार्फत देखील विषाणू प्रसारित होऊ शकतो. प्रथम संसर्गातून स्वयं प्रतिकारशक्तीने वाचलेली वासरे काही काळापर्यंत हा विषाणू प्रसारित करू शकतात. संसर्गित हगवण पाणी, खाद्य, गवत किंवा दुधामार्फत प्रसारित होऊ शकते.

सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, गोठ्यातील अस्वच्छता, निर्जंतुकीकरणाचा अभाव, गोठ्यातील संचारासाठी अपुरी जागा आणि सूर्यप्रकाशाचा अभाव या कारणामुळे आजार पसरण्याचे प्रमाण वाढतात. अपुरी माहिती असलेले अनोळख्या ठिकाणावरून खरेदीकरून विलगीकरण न करता थेट गोठ्यात सोडलेल्या जनावरांपासून रोटा विषाणू तसेच अन्य आजारांचा देखील प्रसार होतो.

हा एक आंतर प्रजाती संपर्कजन्य आजार आहे. यामध्ये माणसांपासून जनावरांमध्ये रोटा विषाणूचा प्रसार होतो. आंतर प्रजाती प्रसारात वासरांना सर्वाधिक धोका हा संसर्गित मानव आणि वराहांमार्फत होतो.

Animal Husbandry
Animal Disease : जनावरांच्या आजार निदानासाठी ‘आरटीपीसीआर’ तपासणी

उपाययोजना

आजारावर ठोस उपाय नाही. तज्ज्ञ पशुवैद्याकडून वासरांमधील लक्षणावर उपचार करून आजाराचा धोका कमी करू शकतो.

जिवाणूवर प्रतिजैविकांचा योग्य वापर

करून संभाव्य धोक्यांपासून वासरू वाचवता येते.

वासरांमधील पाणी आणि क्षारांचे प्रमाण संतुलित ठेवणे महत्त्वाचे आहे.

संसर्गित वासराला निरोगी जनावरांपासून दूर करून विलगीकरण करावे. त्यांची स्वतंत्र व्यवस्था करावी. त्यांना लागणारी भांडी आणि इतर वस्तू वेगळ्या असाव्यात.

बाधित जनावरांचा परिसर निर्जंतुकीकरण केलेला असावा. सर्वप्रथम गोठ्यातील जागा, जमीन गव्हाण, भिंती, फरशी स्वच्छ झाडून गरम पाण्याने धुऊन कोरडी करावी. शेणाचे डाग, वाळलेले शेण खरवडून काढावे आणि झाडून घ्यावे. त्यानंतर १ टक्का फॉर्मॅलिनचे द्रावण किंवा २ टक्के फिनॉल द्रावण बनवून ते संपूर्ण गोठ्यात फवारावे. निर्जंतुकीकरणानंतर १५ मिनिटांनी पुनः एकदा गरम पाण्याने संपूर्ण परिसर धुऊन कोरडा केल्यानंतर जनावरे गोठ्यात घ्यावीत.

गोठ्यात मुबलक सूर्यप्रकाश असावा. हवा खेळती राहाण्यासाठी उपाय करावेत. वासरांमध्ये एकाच वेळी मुक्त दुग्धपान न करता आजार बरा होईपर्यंत एका दिवसातील दुग्धपान ४ ते ५ टप्प्यांमध्ये करावे जेणेकरून हागवणीला धोक्याचे स्वरूप प्राप्त होणार नाही.

बाधित जनावरांच्या विलगीकरण जागेभोवती चुनखडी भुकटी टाकावी. पोटॅशिअम परमॅग्नेटचे ०.१ टक्का द्रावण करून परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.

लक्षणे

हा आजार वासरांमध्ये विविध संसर्गांमधून आढळतो.

कॉकॅसिडीओसिस आजारात रक्ती हगवण असते, अमिबिओसिस हागवणीत आवेचे प्रमाण जास्त असते, बोवाईन व्हायरल डायरिया आजारात हगवण पाण्यासारखी तरल असते. या सगळ्याहून रोटा विषाणू हगवण असते.

हगवण ओळखताना सर्वप्रथम जनावराचे वय लक्षात घ्यावे. लहान नवजात वासरांमध्ये अतिसार होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे रोटा विषाणू संसर्ग.

गाई, म्हशींच्या दुसऱ्या ते तिसऱ्या महिन्याच्या वासरांमध्ये हा आजार आढळून येतो. चार आठवड्यांखालील जनावरांमध्ये आजाराचे प्रमाण कमी असते. आजारी प्रौढ जनावरांमध्ये हा विषाणूजन्य आजार आहे.

आजाराचा प्रादुर्भाव झाल्यापासून दोन ते तीन दिवसांनंतर प्रथम लक्षण दिसून येते. भूक मंदावते, अतिसार किंवा हागवणीस सुरुवात होते. हगवण पांढरट पिवळ्या रंगांची असते. हागवणीत प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे अपचन झालेल्या दुधाचे अंश. आतड्यावरील सुजेमुळे अन्नाचे पचन होत नाही. जिवाणूंमुळे आतड्यावरील मऊ आवेच्या (मुकस) आवरणाची झीज होते, परिणामी, हगवणीत अपचन झालेले दूध, खाद्य, गवताबरोबर आवेचे प्रमाण दिसते.

चिकट हागवणीमुळे शेपटी, मागील पाय हे अतिसाराने माखलेले आढळतात. जर वासरांना मुक्त दुग्धपान केले गेले, तर अतिसारात वाढ होते. क्षार,पाण्याचे शरीरातील संतुलन बिघडते. अशा परिस्थितीमध्ये वासरे दगावण्याचे प्रमाण वाढते.

शरीरातल्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वासराचे वजन कमी होते. भूक मंदावते, बाधित वासरे शांत, निस्तेज दिसतात. आतड्यांवरील सुजेमुळे पोटदुखी होते. त्यांची नजर पोटाकडे असते. अकार्यक्षम, उदासवाणी वासरे पाहावयास मिळते.

निदान

आजाराचे निदान हे वासराचे वय आणि हागवणीची लक्षणांनुसार करता येते.

पशुवैद्यकीय संस्थेमध्ये पॉली अक्रिलामायीड जेल इलेक्ट्रोफोरॉसिस तंत्रामार्फत विषाणूचे पक्के निदान करता येते.

खात्रीशीर उपायासाठी हागवणीचे नमुने निर्जंतुकीकरण केलेल्या डब्यामध्ये गोळाकरून ते पशुवैद्यकीय वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये पाठवता येतात. पीसीआर तंत्रज्ञानाद्वारे खात्रीलायक निदान करता येते.

डॉ. सुप्रिया काशीकर, ९०७५००१६२९

(लेखिका पशुवैद्यकीय सामूहिक स्वास्थ व रोग विज्ञान शास्त्र तज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com