Animal Care  Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Care : वाढत्या तापमानात जनावरांचे व्यवस्थापन

Animal Management : पशू शारीरिक तापमान स्वनियंत्रित करताना शरीरात तयार होणारी उष्णता विविध मार्गांनी उत्सर्जित करतात. यामुळे शारीरिक तापमान बाह्य वातावरणातील तापमानाशी समरूप होते.

Team Agrowon

डॉ. संदीप ढेंगे, डॉ. मंगेश वैद्य

पशूंच्या सभोवती बाह्य वातावरणातील तापमानात अचानक वाढ झाल्यावर पाळीव पशू (गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कोंबड्या, वराह इत्यादी) बाह्य वातावरणातील तापमानाइतके स्वत:चे शारीरिक तापमान संतुलित करीत असतात. मात्र उन्हाळ्यात बाह्य वातावरणातील जास्त तापमानामुळे पशूंना शारीरिक उष्णता बाहेर उत्सर्जित करताना ताण येतो. काही शारीरिक क्रियांचे कार्य योग्य प्रकारे होत नाही. पशूंचे आरोग्य बिघडते. उत्पादनात लक्षणीय घट होते, उष्माघात होतो.

१) उन्हाळ्यात ताण निर्माण करणारे वातावरणातील विविध घटकांचा (जसे, बाहेरील हवेचे अधिक तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग इ.) पशूंच्या आरोग्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विघातक परिणाम होत असते.

२) वातावरणातील तापमान आर्द्रता निर्देशांक हा प्रामुख्याने बाह्य वातावरणातील हवेचे तापमान आणि आर्द्रता यांवर अवलंबून असतो. साधारणपणे, तापमान आर्द्रता निर्देशांक हे ७२ पेक्षा कमी असल्यास बाह्य वातावरण पशुधनास अनुकूल आहे असे समजले जाते आणि दरम्यान पशूंची उत्पादकता निरंतर राहते.

३) पशूंच्या सभोवती वातावरणातील हवेचे तापमान किंवा आर्द्रता किंवा दोन्ही वाढल्याने तापमान आर्द्रता निर्देशांक ७५ किंवा त्यापुढील होऊन उष्णतेच्या ताणाची लक्षणे दिसायला लागतात आणि तापमान आर्द्रता निर्देशांक ९८ च्या पुढे असल्यास पशूंना तीव्र स्वरूपाचा उष्माघात होतो.

गाई, म्हशींतील लक्षणे ः

१) दिवसातील जास्त तापमानामुळे (२७ ते ३२ अंश सेल्सिअसच्या पुढे) गाई, म्हशींचे शारीरिक तापमान वाढायला सुरुवात होते. जर सभोवती तापमान ३२ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यावर शारीरिक तापमान नियंत्रित करण्यासाठी श्‍वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. जीभ बाहेर काढून तोंडावाटे श्‍वास घेतात, हृदयाची स्पंदने वाढतात

२) उन्हाळ्यात शरिरद्रव्यांचे प्रमाण असमतोल होते, शरीरातील पाणी कमी होते, क्षार कमी झाल्याने आम्लता वाढते. कॅल्शिअमची पातळी कमी होते, दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते.

३) शारीरिक तापमान स्वनियंत्रित करताना शारीरिक ऊर्जा अपुरी पडते. दैनंदिन दुग्ध उत्पादन कमी होण्यास सुरुवात होते आणि काही कालावधीनंतर एकूण दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट होते.

४) प्रजननासंबंधित क्रिया खोळंबतात, ऋतुचक्र विस्कळते. भाकड राहण्याची शक्यता असते. कालवडींची शारीरिक वाढ खुंटते आणि गाभण कालवडींची उन्हाळ्यात योग्य काळजी घेतली गेली नाहीतर गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते.

५) म्हशींचा रंग काळा आणि घाम ग्रंथी कमी असल्यामुळे शरीरातील उष्णता उत्सर्जित करता येत नसल्याने शारीरिक तापमान म्हशी स्वनियंत्रित करू शकत नाहीत. म्हशींना उष्णतेचा ताणाचा त्रास होत राहिल्याने म्हशींचे ऋतुचक्र विस्कळते, माजावर येत नाहीत.

६) म्हशींच्या जैविक / शारीरिक क्रियांमध्ये महत्त्वाचे बदल होतात. म्हशींनी खाद्य कमी खाल्ल्याने शरीरात कमी ऊर्जा तयार होते. पाणी, खनिजे, प्रथिने आणि इतर पोषक घटकांची पातळी असंतुलित झाल्याने रक्तामधील संप्रेरके आणि विकर यांचे कार्यशैलीत बदल होते. दुधाचे उत्पादन कमी होते, गुणवत्ता ढासळते.

७) रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने सांसर्गिक, असांसर्गिक आजार होतात.

गाई, म्हशींचे दैनंदिन व्यवस्थापन ः

१) सकाळी लवकर चरायला सोडून ११ वाजेपर्यंत परत आणावे. दुपारी ४ वाजेनंतर परत बाहेर चरायला सोडावे.

२) पाणी सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यास पशूंचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. शारीरिक पाण्याची पातळी निश्‍चित चांगली राहते. म्हशींच्या शरीरावर काही वेळेच्या फरकाने थंड पाणी शिंपडावे.

३) म्हशींच्या शरीरावर पाण्याचे तुषार पडतील अशी व्यवस्था करावी. गायींच्या गोठ्यात थंड हवेकरिता पंखे किंवा शक्य असल्यास कूलरची व्यवस्था करावी.

४) नियमित हिरवा चारा पुरविल्याने पशूंची शारीरिक पाण्याची पातळी कायम राखली जात असल्याने दैनंदिन दुग्ध उत्पादनात घट होत नाही आणि पशूंच्या शारिरीकक्रिया उत्तम राहतात.

५) बारमाही सिंचनाची सोय असल्यास शेतात विविध चारा पिकांची लागवड करावी.

६) शारीरिक क्रिया उत्तम राहण्यासाठी खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणे पुरवावीत. जीवनसत्त्वे आणि खनिजांमुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते.

७) खाद्यात ऊस मळी, मीठ यांचे मिश्रण द्यावे. जेणेकरून शरीरातील पाणी आणि क्षारांची पातळी संतुलित राहते.

८) शेवगा पाने, साल, फुले पशूंना पूरक खाद्य म्हणून द्यावीत. यामुळे पशूंची उष्णतेच्या ताणास प्रतिरोध करण्याची शारीरिक क्षमता वाढते. शेवग्याच्या पानांमधील रासायनिक घटक शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करतात. ताण कमी करण्यास मदत करतात.

९) वयात येत असलेल्या कालवडींची वाढ योग्य रीतीने होत नसल्यामुळे सहसा माजावर येत नाहीत. गाभण कालवडींना उन्हाळ्यात अतिरिक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्त्वे नियमित खाद्यात पुरविल्याने योग्य शारीरिक वाढ होते. गर्भपात होण्याची शक्यता फार कमी होते.

१०) उष्माघाताची लक्षणे (तोंडाला फेस येणे, तोंडावाटे श्‍वास घेणे, जीभ बाहेर काढणे, शरीर थरथरणे, तडकाफडकी खाली कोसळणे, सतत तडफडणे इ.) आढळल्यास, थंड आणि शांत ठिकाणी बांधावेत. थंड पाणी पाजावे, शरीरावर थंड पाणी शिंपडावे. पशुवैद्यकीय उपचार करावेत.

शेळी-मेंढी ः

साधारणपणे तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यावर उष्णतेचा त्रास जाणवायला सुरुवात होते. बाह्य वातावरणातील किमान व कमाल तापमान सहन करण्याची शेळ्यांची क्षमता इतर पशुधनापेक्षा अधिक आहे. तरीही अप्रत्यक्षपणे तापमान व आर्द्रता वाढीचा उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो. उच्च तापमान बदलाचा आघात सहन करू शकत नाहीत. त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.

१) मोकळ्या कुरणांवर चरताना सावली शोधत फिरतात. पाणी पिणे वाढते. धापायला लागतात आणि तोंडाला फेस येतो.

२) शारीरिक तापमान वाढते, श्‍वसन क्रियेचा वेग वाढतो. प्रखर ऊन असल्यास तडफडून जमिनीवर कोसळतात.

३) प्रजोत्पादन क्रिया खोळंबते. करडांची वाढ मंदावते.

व्यवस्थापन ः

१) गोठ्यात नेहमी हवा खेळती आणि थंड राहणे गरजेचे आहे. छत टीन पत्राचे असेल तर वरील भागास पांढरा रंग किंवा चुना लावावा. आतील भागाला हिरवा रंग द्यावा.

२) गोठ्याच्या बाहेरील भागाला पोती किंवा गोणपाट बांधावे.

३) कोरड्या चाऱ्याचे प्रमाण कमी करून हिरवा चारा अधिक प्रमाणात द्यावा.

४) खाद्यात सोयाबीन अवशेष, गहू, तांदूळ भरडा आणि खनिज मिश्रणांचा समावेश करावा. पिण्याचे थंड पाणी पाजावे.

५) गोठ्यात क्षमतेपेक्षा जास्त शेळ्या, मेंढ्या बांधू नयेत. हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी.

६) सकाळी आणि सायंकाळी चरण्यास सोडावे. कुरणाची सोय नसल्यास चारा गोठ्यात द्यावा.

७) चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी २ टक्के मिठाचे पाणी शिंपडावे. यामुळे चाऱ्या‍ची चव वाढते, पोटात थंडावा निर्माण होतो. पाणी जास्त पितात, खाल्लेल्या खाद्याची पाचकता वाढते. शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.

८) शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलीत राहाण्यासाठी गूळ व मीठ मिश्रित पाणी पाजावे. गुळाच्या पाण्याने पोटात गारवा तयार होतो. शरीरातील साखरेची गरज भागविली जाते.

संपर्क ः डॉ. संदीप ढेंगे, ९९६०८६७५३६

(सहायक प्राध्यापक व प्रभारी विभाग प्रमुख, पशू शरिरक्रियाशास्त्र, विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात महाडिक पॅटर्न; मुश्रीफ, यड्रावकरांनी गड राखला, महाविकास आघाडीचा सुफडासाफ

Chana Wilt Disease : हरभरा पिकातील ‘मर रोग’

Animal Care : म्हशींच्या प्रजननासाठी हिवाळा ठरतो लाभदायक

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT