Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Climate Change : हवामान बदलाचा शेतीच्या बरोबरीने पशुपालनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. दूध उत्पादनातील घट, आजारांचे वाढते प्रमाण, चाऱ्याची खालावलेली गुणवत्ता चिंताजनक आहे.
Animal Care
Animal Care Agrowon

Climate Change Effect On Livestock : उन्हाळ्यात गाईमागे तीन लिटर दूध उत्पादन घटतेय, शारीरिक ताण दिसतोय, पावसाळ्यात कासदाहाचे प्रमाण वाढतेय... पशुखाद्य, चारा, औषधोपचाराचा वाढता खर्च, दुसऱ्या बाजूला पडलेला दूध दर आणि सततच्या हवामान बदलामुळे बेचैन असलेली गाय, म्हैस दूध उत्पादनात सातत्य ठेवत नाही...

हे वास्तववादी अनुभव आहेत निंबळक (ता. फलटण, जि. सातारा) येथील प्रयोगशील पशुपालक हिरालाल सस्ते यांचे. बहुतांश पशुपालकांचे हेच अनुभव आहेत. हवामान बदलाचा परिणाम पीक उत्पादन, पाणीटंचाई, मानवी आरोग्यापुरता मर्यादित न राहता पशुपालनावर झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटके बसू लागले आहेत.

गेल्या पंधरा वर्षांपासून पशुपालनात रमलेले हिरालाल सस्ते म्हणाले, की माझ्याकडे ४० होल्स्टिन फ्रिजियन, चार जर्सी, १ साहिवाल, १ थारपारकर गाय आहे. माझी होल्स्टिन फ्रिजियन गाय दररोज २२ ते २५ लिटर दूध देते. वाढत्या तापमानाच्या काळात प्रति गाय किमान तीन लिटर दूध उत्पादनात घट आहे. गाईंना अचानक ताप आल्याने शारीरिक ताण वाढतोय. पावसाळ्यात कासदाह वाढला आहे.

तापमान चढ-उतारामुळे गाई अस्वस्थ होतात. हवामान बदलाला सामोरे जात मी मुक्त संचार गोठा, व्यवस्थापन बदल आणि जातिवंत पैदाशीवर भर दिला आहे. उन्हाळ्यात मी फॉगर्स लावतो. शारीरिक ताण कमी करण्यासाठी क्षार मिश्रणांचा योग्य पुरवठा, गहू, मेथी, गुळाची लापशी देतो.

चाराटंचाईवर मात करण्यासाठी मूरघास, हायड्रोपोनिक्स चारा, ॲझोला पशू आहारात वापरतोय. कृत्रिम रेतनाबरोबरीने भ्रूण प्रत्यारोपणाचा अवलंब केला आहे. हवामान बदलाला तोंड देण्यासाठी दुग्धोत्पादनात सातत्य असणारी सक्षम पिढी गोठ्यामध्येच तयार करणे हाच पर्याय मला योग्य वाटतो आहे.

Animal Care
Animal Care : पाळीव प्राण्यांमधील उष्माघात टाळा

अर्थकारणावर परिणाम

हवामान बदलाचा जनावरांवर परिणाम होत असताना वाढते खाद्य दर, कमी होणारा दूध दर यामुळे पशुपालकांचे अर्थकारण अडचणीत आहे. भेंडा (ता. नेवासा, जि. नगर) येथील प्रयोगशील महिला पशुपालक माधवी रवींद्र नवले म्हणाल्या, की माझ्याकडे १५ होल्स्टिन फ्रिजियन आणि १५ जर्सी गाई आहेत. दररोज २८० लिटर दुग्धोत्पादन होते. परंतु गेल्या दहा वर्षांतील तापमान वाढ, हिवाळ्यातील कडाक्यामुळे गाईंमध्ये ताण दिसतो. प्रति गाय २ ते ३ लिटर दुग्धोत्पादनात घट आहे.

गाभण राहण्यात अडचणी आहेत. मका पेरणीच्या वेळी पाऊस नसतो, तर कापणी, मूरघास तयार करण्याच्या काळात अवकाळी पावसाने नुकसान होते. कडब्याची टंचाई वाढत आहे. पशुखाद्याचे ५० किलोचे पोते १,६५० रुपयांना झाले आहे. यामध्ये दर सहा महिन्यांनी ५० रुपये वाढ आहे. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुधाचा दर. सध्या गाईच्या दुधाला ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफसाठी २५ ते २६ रुपये दर मिळतोय. या दरात उत्पादन खर्च निघणे मुश्कील आहे.

व्यवस्थापनाचा खर्च लक्षात घेता प्रति लिटर दुधाला ४० रुपये दर मिळाला तर कोठे हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होईल. हवामान बदलाने जनावरे, चारा, बाजारपेठ आणि अर्थकारणावर परिणाम झाला आहे. परंतु आहे त्या परिस्थितीमध्ये व्यवस्थापन तंत्रात बदल करत खर्च आटोक्यात ठेवत जनावरांना आरामदायी वातावरण देण्याचा प्रयत्न आहे.

स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब हेच उत्तर

दुभत्या जनावरांमध्ये उष्णतेचा ताण वाढल्याने दूध उत्पादन आणि पुनरुत्पादन कार्यक्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. याबाबत गोविंद डेअरी (फलटण, जि. सातारा) येथील महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड म्हणाले, की तापमान, पर्जन्यमानातील बदलाचा परिणाम चारा उत्पादन आणि त्यातील पोषणमूल्यावर झाला आहे.

उष्ण तापमान आणि वाढत्या आर्द्रतेमुळे माशा, गोचीडांचा प्रादुर्भाव वाढून आजारांचा प्रसार होत आहे. कासदाह आणि परजीवीजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. ज्या वेळेस तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते, त्या वेळी दूध उत्पादनात ३० टक्के आणि तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते, त्या वेळेस ५० टक्क्यांपर्यंत घट होते. दुधातील स्निग्धांश, प्रथिनांचे प्रमाण कमी होते. प्रजनन यंत्रणेवर परिणाम होते. गाय माजावर येत नाही.

Animal Care
Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

हे लक्षात घेता बदलते वातावरण आणि स्थानिक हवामानाच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आणि आजारांना कमी बळी पडणाऱ्या वंशावळीची निर्मिती हेच उत्तर आहे. जनावरांची संख्या लक्षात घेऊन कृषी वनीकरण पद्धतीचा अवलंब, जैवसुरक्षा उपाय, संतुलित आहार, उष्णतेचा ताण कमी करणाऱ्या उपाययोजनांवर भर द्यावा लागेल. याचबरोबरीने प्रत्येक गोठ्यामध्ये हवामान-स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब महत्त्वाचा आहे.

आरोग्य, वर्तन आणि उत्पादकतेचे निरीक्षण

बारामती (जि.पुणे) येथील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जेनेटिक इंप्रूव्हमेंट इन डेअरी ही संशोधन संस्था भारत, नेदरलँड, इस्राईल आणि ब्राझीलमधील पशू संशोधन संस्थांच्या सहकार्याने संशोधन करत आहे. याबाबत संस्थेतील प्रकल्प प्रमुख डॉ.धनंजय भोईटे म्हणाले की, संस्थेमध्ये आधुनिक तंत्राचा वापरकरून दुग्धोत्पादन, गुणवत्ता, प्रजनन क्षमता,उष्णता सहनशीलता, रोग प्रतिकारशक्ती, एकूण मिश्रित रेशन आणि भ्रूण हस्तांतराबाबत संशोधन सुरू आहे.

डेटा ॲनालिटिक्स आणि सेन्सर तंत्रज्ञानातून जनावरांचे आरोग्य, वर्तन आणि उत्पादकता यांचे वास्तविक वेळेचे निरीक्षणकरून योग्य उपाययोजना ठरविली जाते. आमच्या संस्थेने मुऱ्हा आणि पंढरपुरी म्हशींसोबत, गीर, साहिवाल आणि थारपारकर या देशी गोवंशाबाबत विशेष संशोधन हाती घेतले आहे. याचबरोबरीने आपल्या वातावरणात तयार झालेल्या होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी जातींचा विकास सुरू आहे.

‘फुले अमृतकाळ ॲप’ची साथ

तापमान व आर्द्रता हे दोन्ही घटक जनावरांच्या आरोग्यावर परिणाम करतात. ताणामुळे दूध उत्पादनामध्ये घट होऊन आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. हे लक्षात घेऊन पुणे कृषी महाविद्यालयातील पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने डिजिटल तंत्रज्ञानांतर्गत तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशू सल्ला देणारे देशातील पहिले ‘फुले अमृतकाळ’ हे ॲप विकसित केले आहे.

याद्वारे पशुधन व्यवस्थापनाकरीता इंटरनेट ऑफ थिंग्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झाला आहे. या केंद्रामध्ये दुधासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गीर, साहिवाल, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या भारतीय गोवंशावर संशोधन केले जाते.

याबद्दल माहिती देताना केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने म्हणाले, की ॲपच्या माध्यमातून पशुपालकांना गोठ्यातील स्थानिक आणि रोज बदलणाऱ्या दैनंदिन वातावरणीय परिस्थितीत जनावरांमध्ये उष्णता किंवा थंडीमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी सल्ला दिला जातो. हे ॲप शेतकऱ्यांना मोफत वापरता येते. गोठ्यामध्ये फॅन, फॉगर सुरू करण्याबद्दल सूचना किंवा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे या गोष्टी ॲपच्या माध्यमातून करता येतात. तंत्रज्ञान वापराच्या प्रमाणानुसार तीन मॉडेल विकसित झाली आहेत.

कोंबड्यांमध्ये नेकेड नेक, फ्रिझल जनुकाचा वापर

हवामान बदलाच्या झळा पोल्ट्री उद्योगालाही बसल्या आहेत. याबाबत नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मुकुंद कदम म्हणाले, की हवामान बदलामुळे कोंबड्यांचे काही आजार अचानक वाढत आहेत. शेडमधील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेले, की मरतूक होते, हे लक्षात घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे. शेडमधील तापमान कमी करण्यासोबतच पाणी, खाद्य व्यवस्थापन आवश्यक ठरते.

शेडमधील जैवसुरक्षा ही महत्त्वाची बाब आहे. भविष्यातील धोके लक्षात घेऊन प्रजनन नियोजन तसेच आनुवंशिकतेमध्ये बदल करून बदलत्या हवामानात तग धरणाऱ्या कोंबड्यांच्या जातींचा विकास होत आहे. यामध्ये नेकेड नेक, फ्रिझल जीनचा उपयोग करण्यात येत आहे. उष्णकटिबंधीय हवामान सहनशील, चांगली रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्या आणि चिकन, अंडी उत्पादनात सातत्य असणाऱ्या जनुकीयदृष्ट्या सुधारित कोंबड्यांच्या प्रजातीबाबत संशोधन सुरू आहे.

- अमित गद्रे ९८८१०९८२०१

(लेखक ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com