Animal Care : जनावरांतील ताण कमी करण्याचे उपाय

Animal Health : तापमान वाढल्याने जनावरांना ऊर्जा बाहेर टाकणे जिकिरीचे होते. जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर तसेच हार्मोन्स निर्मितीत बदल होतो. यामुळे जनावराचे उत्पादन, आरोग्य, आहार आणि प्रजनन यावर विपरीत परिणाम होतो.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

Animal Husbandry : पशुपालन करताना कायम आपल्या वातावरणाचा अभ्यास करून व्यवस्थापन तंत्रज्ञानात आपल्या पद्धतीने बदल करणे फायदेशीर ठरते. आपल्याकडे उन्हाळ्यात काही वेळा तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते. यामुळे जनावरांवर उष्णतेचा ताण येतो. या काळात जनावरांना योग्य वातावरण, योग्य प्रमाणात आहार तसेच इतर व्यवस्थापन चांगले ठेवल्यास संकरित गाई, म्हशींच्या दूध उत्पादनात सातत्य राहाते.

वाढत्या तापमानाचा परिणाम

तापमान वाढल्याने जनावर त्याच्या शरीराचे तापमान वाढू नये आणि ते सर्वसाधारण राहावे यासाठी प्रयत्न करते. पहिल्यांदा शरीरात तयार होणारी ऊर्जा शरीराबाहेर ढकलली जाते. तसेच शरीरात कमीत कमी ऊर्जा तयार होण्यासाठी दैनिक व्यवस्थापनात बदल करतात.

सर्वसाधारणपणे जनावरासाठी १० ते २६अंश सेल्सिअस (२४ ते २६ अंश सेल्सिअस तापमान संकरित गाय आणि ३३ अंश सेल्सिअस भारतीय देशी व म्हशींसाठी ३६ अंश सेल्सिअस) तापमान योग्य समजले जाते. वातावरणातील तापमान ज्या वेळेस जास्त जाते, त्या वेळेस जनावरे शरीराचे तापमान धर्मग्रंथी किंवा धापण्याच्या प्राक्रियेमार्फत नियंत्रित करतात. ज्या वेळी वातावरणातील तापमान या कक्षेबाहेर जाते, म्हणजे कमी किंवा जास्त होते अशा वेळी जनावराला शरीरावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा ताण सहन करावा लागतो.

Animal Care
Animal Care : जनावरांतील उष्माघाताची कारणे, काळजी, उपाय

जनावराच्या शरीरात तयार होणारी ऊर्जा जनावर बाहेर टाकत असते, परंतु अशा वेळेस बाहेरील तापमान वाढल्याने ऊर्जा बाहेर टाकणे जिकिरीचे होते. त्यातच बाहेरील ऊर्जेचा अधिक भार वाढल्याने जनावराच्या ऊर्जा निस्सारण यंत्रणेवर परिणाम होतो. जनावराच्या हार्मोन्स निर्मितीत बदल होतो, त्यामुळे जनावराचे उत्पादन, आरोग्य, आहार आणि प्रजनन यावर विपरीत परिणाम होतो.

शरीरातील अन्नघटक हे तापमान नियंत्रण करण्यासाठी वापरल्याने जनावर अस्वस्थ होते, जनावराचा आहार कमी होऊन तहान-भूक मंद होते.

जनावर तापमान नियंत्रण करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरण्यास सुरुवात करते. यामध्ये श्‍वासोच्छ्वासाचा दर वाढून धाप लागल्या सारखे करते. तोंडाने श्‍वासोच्छ्वास करते. श्‍वासोच्छ्वास उथळ आणि जास्त वेगाने होतो, नाडीचा वेग वाढतो.

जनावर स्वत: तापमान नियंत्रण करण्यापलीकडे जाऊन नंतर जनावराचे शरीराचे तापमान १०४ ते १०६ अंश फॅरनहाइट इतके वाढून कातडी कोरडी पडते.

जनावरांचे डोळे, लालसर होऊन डोळ्यांतून पाणी गळते. पित्ताचा त्रास होऊन अतिसार होण्याची शक्यता असते. लघवीचे प्रमाण कमी होते. जनावरे बसतात. गायी गाभडण्याचे प्रमाण वाढते.

शरीर तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी येणाऱ्या अडचणी

देशी गोवंशामध्ये वातावरणातील बदल सहन करण्याची जास्त ताकद असते. मात्र संकरित आणि विदेशी जातीत हवामान बदल सहन करण्याची ताकद फारच कमी असते. वातावरणातील तापमान वाढल्यानंतर शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यास अडचणी निर्माण होतात. त्याचा परिणाम जनावरांचे दूध उत्पादन आणि आरोग्यावर होताना दिसतो.

जनावरांत असणाऱ्या ऊर्जेचा वापर दूध उत्पादन, वासराच्या वाढीसाठी वापरली जाते. याबरोबरच चालणे, श्‍वास घेणे, खाण्यासाठीसुद्धा ऊर्जेची गरज असते. अशावेळेस वातावरणात बदल झाला तर ताण येतो. त्यावर मात करण्यासाठी जनावराला ऊर्जेची गरज असते.

ज्या वेळेस तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त जाते, अशा वेळेस दूध उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. जेव्हा हेच तापमान ४० अंशांपेक्षा जास्त जाते, त्या वेळेस दूध उत्पादनामध्ये ५० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. जनावराचा आहार कमी होतो.

Animal Care
Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

उष्णतेच्या वाढीचा परिणाम वासरे आणि कालवडींच्या वाढीवर होतो.

दुधातील स्निग्धांश, प्रथिनांचे प्रमाण कमी होते.

उष्णतेची ताण असणारी गाय माजावर येत नाही. गाभण राहण्यास अडचणीची ठरते. गाभण गाईंना उष्णतेचा ताण बसल्यास त्यांचा गर्भपात होऊ शकतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते.

ताण सहन करण्यासाठी आणि उष्णतेचे निस्सारण करण्यासाठी जनावर धापा टाकते.

पोटातील हालचाली मंदावतात, पचन क्रिया बाधित होते.

शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे आम्ल पित्ताचा त्रास होऊन पातळ जुलाब होतात.

कासेच्या आरोग्यावर परिणाम होतो. दूध उत्पादन नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो.

खुरांचे आजार तसेच लंगडेपणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.

उष्णतेपासून संरक्षणाचे उपाय

जनावरांना जास्तीत जास्त सावली पुरवावी. उन्हाळ्यात जनावरांना गोठ्यात बसण्यासाठी सरासरीपेक्षा जास्त जागा द्यावी. एकाच जागेवर जास्त गर्दी असल्यास उष्णतेचे निस्सारण होण्यास वेळ लागतो.

गोठ्याच्या आजूबाजून झाडे लावावीत. आपला गोठा हवेशीर असावा.

छताची उंची जास्त असावी. छताच्या पत्र्याला पांढरा रंग दिला तर उष्णतेचे परावर्तन होऊन जनावरांना उष्णतेचा त्रास कमी होतो. छतावर पालापाचोळा किंवा पाचट टाकल्यास उष्णतेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत. उन्हाळ्याच्या कालावधीत छतावर स्पिंकलर्स लावल्याने तापमान नियंत्रणात राहते.

गोठ्यामध्ये स्प्रिंकलर, फॉगर्स लावावेत. त्यामुळे संकरित गाईंचे शरीर थंड राहण्यास मदत होते.

मुक्त संचार गोठ्यामध्ये जनावरांना जास्तीत जास्त वेळ पाणी पिण्यास उपलब्ध असावे.

जनावरांना जास्त चावावा लागणारा चारा ज्या वेळी उन्हाचा तडाखा असेल अशा वेळेस देऊ नये. कारण असा चारा चावण्यासाठी जनावराच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होते.

ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेला क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात क्षार मिश्रण द्यावे.

डॉ. एस. पी. गायकवाड, ९८८१६६८०९९, (लेखक गोविंद मिल्स ॲण्ड मिल्क प्रॉडक्ट्‍स प्रा.लि, फलटण, जि. सातारा येथे महाव्यवस्थापक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com