Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin : लम्पी आजाराचा दूध उत्पादकांना फटका ?

टीम ॲग्रोवन

जुलैच्या पहिल्या आठवड्यात लालरीच्या पायांवर सूज आल्याचं लक्ष्मी देवींना दिसलं. लालरी म्हणजे लक्ष्मी देवींची गाय. दुसऱ्या दिवशी लालरीच्या अंगावर गाठी दिसायला लागल्या. हे बघून लक्ष्मी देवींनी स्थानिक पशुवैद्यकांना फोन केला. राजस्थानमध्ये (Rajsthan Lumpy) हजारो गायींना विळख्यात आणणारा हा लम्पी स्किन डिसीज (एलएसडी) (Lumpy Skin Disease) नावाचा विषाणूजन्य आजार होता. डॉक्टर लक्ष्मी देवींना (Lakshmi Devi) म्हणाले की, लालरीला इतर गायींपासून अलग ठेवा. मात्र घरात जागाच नसल्याने त्यांनी गोठ्यातच 20 फुटांवर लालरीला बांधली. आणि पुढच्या पाच दिवसांत तर इतर दोन गायींना याचा संसर्ग झाला.

राजस्थानच्या लुंकरनसार दूधउत्पादक एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगतात की, "हे सगळं अचानक घडत असल्यामुळे आम्ही खूप तणावात होतो. गाठी दिसायच्या आधी एक दिवस तर गायी ठीक होत्या. आता त्या आजारी पडल्यात आणि त्यांनी दूध देणं बंद केलंय. त्यामुळे आमचं दुधउत्पादन बंद पडलंय. आम्हाला नंतर समजलं की गावात इतर गायींच्या अंगावर सुद्धा अशाच गाठी दिसून आल्यात."

लक्ष्मीदेवी यांचं पाच जणांचं कुटुंब गायींच्या दुधावर अवलंबून आहे. पण आता लम्पीमुळे दुधातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गंभीर परिणाम झाला आहे. या कुटुंबाकडे कोणतीही शेतजमीनही नाही. त्यांनी दुसऱ्यांची जमीन कसायला घेतली आहे. पण दूध उत्पादन हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे.

हे कुटुंब स्थानिक डेअरीला दूध घालतात. पण लम्पी आल्यापासून दुधाचा पुरवठा 33 लिटरने कमी झालाय. यामुळे दिवसाचं 1,155 रुपयांचे थेट उत्पन्न आता मिळेनास झालंय. या कुटुंबाकडे 13 गायी आहेत. लम्पी येण्यापूर्वी त्या मिळून 40 लिटर दुध द्यायच्या. ज्यातून दिवसाला 1400 रुपयांचं उत्पन्न मिळायचं. पण आता दोनच गायी  7 लिटर दुध देतात.

लालरीचं नाव तिच्या रंगावरून ठेवलं होतं. जुलैमध्ये आजारी पडलेली लालरी सप्टेंबरचा दुसरा आठवडा उजाडूनही बरी झाली नाही. आता तिने तिचा रंग आणि चमक दोन्हीही गमावलं. लम्पीला बळी पडण्यापूर्वी ती 250 किलो वजनाची धष्टपुष्ट गाय होती.

ती दररोज सरासरी 10 लिटर दुध द्यायची. पण लम्पीनंतर तिचं वजन 100 किलोने कमी झालं. आता तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठीही मदतीची गरज असते. हे फक्त लालरी किंवा मग लक्ष्मीदेवीची व्यथा आहे असं नाही तर संपूर्ण राजस्थानमध्ये लम्पीची महामारी आली. कित्येकांच्या गायी मृत्यूमुखी पडल्या. यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहच साधनचं विस्कळीत झालं.

भारतातील बहुतांश गरीब शेतकऱ्यांसाठी, विशेषतः वाळवंटी भागातल्या शेतकऱ्यांसाठी पशुधन हा मुख्य आधार आहे. 2019-20 च्या GDP मध्ये या भागाचं 4.35 योगदान आहे. जेव्हा पर्यावरणीय गोष्टी हातात नसतात तेव्हा एखादी विमा योजना म्हणून पशुधन काम करत असतं. शेतातल्या पिकांपेक्षाही पशुधनाची विश्वासार्हता अधिक जास्त असते.

एखादे वेळेस अल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांच शेतीत नुकसान झालं तर त्यांना पशुधनाची मदत होते. तिथून त्यांचा उदरनिर्वाह सुरूच असतो.लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांच्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे, त्यांचा पशुधन सांभाळण्यात मोठा वाटा आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने 2019 मध्ये कृषी कुटुंबांकडे असणारी जमीन आणि पशुधन यांचा आढावा घेतला होता. त्यानुसार, 0.01 हेक्टर जमीन असलेल्यांपैकी 10.9 टक्के शेतकरी पशुधन उत्पादनात गुंतलेले आहेत. तर ज्यांच्याकडे 4 ते 10 हेक्टर जमीन आहे असे 1.2 टक्के पशुधन सांभाळतात. आणि ज्यांच्याकडे 10 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे असे 0.8 टक्के लोक पशुधन सांभाळतात.

या सर्वेक्षणाच्या आकडेवारीमध्ये असं दिसून आलं की, अल्पभूधारक शेतकरी त्यांच्या उत्पन्नासाठी पशुधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. अल्पभूधारकांमध्ये शेतीच्या एकूण उत्पन्नात पशुधनाचा वाटा सर्वाधिक आहे.

राजस्थानमध्ये देशातील सर्वाधिक पशुधन (56 दशलक्ष) आहे. मात्र लम्पीमुळे या सर्वच पशुधनाला गंभीर धोका निर्माण झालाय. पर्यायाने शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंडांतर आलं आहे. गाभण गुरांमध्ये याचा फैलाव जास्त मोठ्या प्रमाणावर झाला असून सर्वाधिक मृत्यू हे गाभण गुरांचेच झालेत. त्यामुळे भविष्यात मिळणारी वासर आणि दूध उत्पादन या दोन्ही गोष्टींना राजस्थानचे शेतकरी मुकलेत.

इक्बाल सिंग आणि त्यांची पत्नी हरपिंदर कौर यांनी ऑगस्टमध्ये त्यांची होल्स्टीन -फ्रीजियन गाय गमावली. त्यांच्याकडे ही एकमेव गाय होती आणि तिलाही लम्पी हा आजार झाला. होल्स्टीन -फ्रीजियन गाय सर्वाधिक दुधासाठी ओळखली जाते.

सिंग सांगतात, "आम्ही 55 हजारांना ही गाय विकत घेतली होती. आज रोजी बाजारात तिची किंमत 80 हजारांच्या घरात आहे. ती दिवसातून दोन वेळा 10 ते 12 लिटर दुध द्यायची. आणि ती गाभण होती."भारतात लम्पीमुळे जवळपास 100,000 गुरं मरण पावली आहेत. एक ढोबळ हिशेब केल्यास आतापर्यंत 300 कोटी रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झालं आहे.

यामध्ये गुरांच्या मृत्यूमुळे दुग्धोत्पादनात होणारे नुकसान, बरे झालेल्या गुरांच्या दुग्धोत्पादनातील तोटा, पुढील गर्भधारणेला उशीर, वजन कमी होणे, गरोदर गुरांमधील गर्भपात आणि वंध्यत्व यासारखे संधी खर्च वगळले जाते.अन्न आणि कृषी संघटनेच्या म्हणण्यानुसार, तोंडाला झालेल्या जखमांमुळे जनावरांचं खाद्य कमी होऊन दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. आणि ही परिस्थिती किमान सहा महिने अशीच असणार आहे.

देशी गुरांमध्ये 26 ते 42 टक्के आणि विदेशी जातींमध्ये 50 टक्क्यांपर्यंत दूध उत्पादन घटू शकते.जानेवारी 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका पशुवैद्यकीय जर्नलनुसार, लम्पी स्किन डिसीजमुळे प्रभावित झालेल्या आशियाई देशांच प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकतं. हे नुकसान 1.46 अब्ज युएस डॉलर इतकं असू शकतं.

मात्र जिवंत प्राणी, मांस आणि मांसल उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ आणि चामड्याची निर्यात या गोष्टींमुळे अप्रत्यक्षपणे होणार नुकसान प्रत्यक्ष नुकसानापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. कदाचित ते 5. 51 अब्ज युएस डॉलर इतकं प्रचंड असू शकतं.

गुराढोरांच्या मालकांमध्ये अजून एक चिंतेची बाब सतावते आहे ती म्हणजे जनावरं जरी बरी झाली तरी त्यांच्या अंगावर जखमेच्या खुणा कायम राहतील. त्यामुळे गाय जर विकायची तर कोण घेणार ? आणि जरी घेतली तरी किती पैशात विकत घेणार हा मोठा मुद्दा आहे. सोबतच जनावरांच्या चामड्यांचे मूल्यही कमी होणार.

( स्रोतः डाऊन टू अर्थ नियतकालिकात प्रकाशित झालेली बातमी.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT