Animal Fodder Agrowon
काळजी पशुधनाची

Animal Fodder : दुधाळ जनावरांसाठी ज्वारी, मका पौष्टिक चारा

Green Fodder : दुधाळ जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी दैनंदिन आहारामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या एकदल व द्विदल हिरव्या चाऱ्याचा समावेश गरजेचा असतो.

Team Agrowon

डॉ. संदीप लांडगे, डॉ. शिवाजी दमामे

दुधाळ जनावरांचे आरोग्य आणि दूध उत्पादनासाठी दैनंदिन आहारामध्ये चांगल्या गुणवत्तेच्या एकदल व द्विदल हिरव्या चाऱ्याचा समावेश गरजेचा असतो. एकदल चाऱ्यामध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात, द्विदल चाऱ्यातून शरीर वाढीसाठी आवश्यक प्रथिनांचा पुरवठा होतो.

द्विदल चाऱ्यापासून तुलनात्मकदृष्ट्या एकदल चाऱ्यापेक्षा कमी चारा उत्पादन मिळते. परंतु यामध्ये प्रथिनांचा पुरवठा द्विदल चाऱ्यामार्फत झाल्यामुळे पशुखाद्यावरील खर्चात बचत होते. दुधातील एसएनएफ वाढण्यास मदत होते.

ज्वारी ः

  • हे महत्त्वाचे चारा पीक आहे. अवर्षणप्रवण भागात, हलक्या जमिनीत देखील तग धरून राहण्याची क्षमता असल्याने निश्‍चित चारा उत्पादन देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. ज्वारीचा कडबादेखील जनावरांना खाद्य म्हणून देता येतो.

  • चाऱ्याकरिता विकसित केलेल्या जाती सुमारे ३ ते ४ मीटर उंच वाढतात. त्याची ताटे हिरवीगार, पालेदार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. ज्वारीच्या चाऱ्यात ८ ते १० टक्के प्रथिने असतात.

  • या पिकांसाठी मध्यम ते भारी व चांगली निचरा होणारी जमीन लागते. पूर्वमशागतीच्या वेळी हेक्टरी ५ टन भरखत म्हणून शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे.

  • ऑक्टोबर महिन्यात पेरणी पूर्ण करावी. पेरणीसाठी रुचिरा, फुले अमृता, मालदांडी ३५-१, फुले गोधन या जातींची ३० सेंमी अंतरावर पाभरीने पेरणी करावी. खोड माशी नियंत्रणासाठी पेरणीच्या वेळी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम थायामेथोक्झामची प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी हेक्टरी ४० किलो बियाणे लागते.

  • हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. त्यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाश पेरणीच्या वेळी व उर्वरित ५० किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी द्यावे.

  • पिकाची वाढ झपाट्याने होत असल्याने सुरुवातीला पहिली खुरपणी लवकर करून शेत तणविरहित ठेवावे.

  • १० ते १२ दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

  • पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना पिकाची कापणी करावी.

  • हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५५० क्विंटल उत्पादन मिळते.

मका

  • हे जलद वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक तसेच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे चारा पीक आहे. मक्याच्या चाऱ्यापासून उत्तम दर्जाचा मुरघास तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात ९ ते ११ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

  • लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन निवडावी. एक नांगरट व कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे.

  • पेरणीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी.

  • पेरणीसाठी हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर या जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी.

  • नोव्हेंबर महिन्यात पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी.

  • प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित ५० किलो नत्राचा दुसरा हप्ता पेरणीनंतर एक महिन्याने द्यावा.

  • पीकवाढीच्या सुरुवातीच्या काळात एक कोळपणी आणि एक खुरपणी करावी.

  • पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना पिकाची कापणी करावी.

  • हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ६०० क्विंटल उत्पादन मिळते.

- डॉ. शिवाजी दमामे, ८२७५५९२२६२

(अखिल भारतीय सम‍न्वित चारा पिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

Rain Update : सिंधुदुर्गात अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

Ethanol Pump Station : महाराष्ट्रासह चार राज्यांत इथेनॉलचे पंप उभारण्यात येणार

Indian Agriculture : ‘वाघबारसे’च्या निमित्ताने शेतकऱ्यांची निसर्गाला प्रार्थना

SCROLL FOR NEXT