डॉ. सिद्दीकी एम. एफ. एम. एफ., डॉ. समीक्षा लोखंडे
Veterinary Care : पावसाळा हा शेती व पशुपालन व्यवसायात अत्यंत महत्त्वाचा ऋतू मानला जातो. उन्हाळ्यातील उष्ण व कोरडे वातावरण कमी होऊन पावसाळ्यात हवेतील आर्द्रता वाढून वातावरण दमट उष्ण होते. जास्त काळ पाऊस लागून राहिल्यास थंड वातावरण आढळून येते.
पावसाळ्यामधील हवामान हे संसर्गजन्य आजार पसरविणाऱ्या रोगकारक घटकांच्या वाढीसाठी अत्यंत अनुकूल असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये जनावरांनी संतुलित आहार, आवश्यक निवारा आणि रोगवाहक कीटकांपासून संरक्षण या बाबीवर लक्ष न दिल्यास जनावरे विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात.
योग्य निवाऱ्याअभावी पावसाळ्यात जनावरे पावसात भिजल्यास किंवा उष्ण व दमट वातावरणात जास्त काळ राहिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच पावसाळ्यात जनावरांत प्रामुख्याने घटसर्प, फऱ्या, फुफ्फुसदाह (निमोनिया), सरा, स्तनदाह, गोचीडताप इ. आजार आढळून येतात.
फऱ्या / एक टांग्या
हा संसर्गजन्य रोग असून गाई, म्हैस, शेळी, मेंढी या जनावरात आढळतो. हा रोग मुख्यतः लहान वयाच्या जनावरांमध्ये आढळतो. हा रोग क्लोस्ट्रिडियम चोव्हिया नावाच्या जिवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार दूषित अन्न व दूषित जखमांतून होतो. जिथे पाणी साचते, दलदल असते, अशा ठिकाणी चरणाऱ्या जनावरांमध्ये हा रोग आढळतो.
लक्षणे
आजारी जनावराला खूप ताप येतो. जनावराच्या मागच्या पुठ्ठ्यावर व खांद्यावर सूज येते. या ठिकाणी दाबले असता ‘कर..कर’ असा आवाज येतो. जनावराचे पाय लुळे होऊन चालताना जनावर लंगडते. वेळीच उपाय न केल्यास जनावर दगावते.
प्रतिबंधक उपाय
बाधित जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
बाधित क्षेत्रामध्ये जनावरांना चरायला सोडू नये.
बाधित मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी.
पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधक लसीकरण करावे.
स्वच्छता ठेवावी.
बसलेल्या जनावरांना उभे करून त्यांना चालविण्याचा प्रयत्न करावा किंवा त्यांची कूस बदलावी
जनावरातील हगवण
हा रोग गाई-म्हशींना टोगाव्हायरिडी या गटाच्या विषाणूमुळे होतो. प्रामुख्याने ६ ते २४ महिने वयाची जनावरे या रोगाला मुख्यतः बळी पडत असतात. या विषाणूबाधित जनावराच्या डोळे, नाक व तोंडातील स्रावाच्या संपर्कात आल्यामुळे निरोगी जनावरात हा रोग पसरतो.
लक्षणे
या रोगामध्ये जनावराला ४ ते ७ दिवस खूप ताप राहतो. सुरुवातीला जनावरांच्या नाकातून घट्ट स्राव वाहतो, नंतर कोरडा खोकला येतो. जनावराला हगवण लागते, त्यामध्ये चिकट द्रव व रक्त दिसून येते. जिभेवर, टाळूवर व हिरड्यांवर क्षती दिसून येतात, त्यामुळे जनावरे लाळ गाळतात.
प्रतिबंधक उपाय
गोठ्याची स्वच्छता व निर्जंतुकीकरण केल्यास या रोगाचा प्रसार थांबवता येतो.
बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
पिपऱ्या/पी.पी.आर.
हा एक शेळ्यांमधील महत्त्वाचा विषाणूजन्य साथीचा रोग असून, मॉरबिली गटाच्या विषाणूंमुळे होतो. या रोगाला ‘शेळ्यांचा प्लेग’ असेही म्हणतात.
लक्षणे
शेळ्यांना अचानक ताप येतो. नाकातून व डोळ्यातून पातळ स्राव वाहतो. जनावर सतत शिंकत राहते. तोंडाच्या आतील भागाला जीभेला, हिरड्यांना व खालच्या ओठांवर पुरळे येतात, त्यामुळे बाधित शेळ्यांना खाता येत नाही. बाधित शेळ्यांना काळ्या रंगाची हगवण लागते. गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो. मरतुकीचे प्रमाण ३० टक्के असून, ५ ते ६ दिवसांत रोगग्रस्त शेळी मरण पावते.
प्रतिबंधक उपाय
या रोगास प्रतिबंध घालण्याकरिता सर्व शेळ्यांना प्रतिबंधात्मक लस टोचून घ्यावी.
सरा
पावसाळ्याच्या दिवसात हवामान दमट झाल्यामुळे डास, माश्या व इतर कीटक यांची संख्या वाढते. यांच्या चावल्यामुळे या रोगाचा प्रसार निरोगी जनावरांमध्ये होतो. हा रोग गाय, म्हैस, घोडा व उंट यामध्ये आढळते. ट्रीपॅनोसोमा इव्हान्साय या एकपेशीय सूक्ष्मजीवांमुळे हा रोग होतो. या जंतूचा प्रसार मुख्यतः टॅबनस जातीच्या माश्या चावल्यामुळे होतो.
लक्षणे
खूप ताप येतो. जनावरे गोल गोल फिरतात. कठीण वस्तूवर डोके घासतात. भूक मंदावते. दूध उत्पादन कमी होते. वजन कमी होते. वेळेवर उपचार न केल्यास जनावर मृत्यू पावते.
प्रतिबंधक उपाय
हा रोग उपचार केल्यास पूर्णपणे बरा होतो. या रोगाचा प्रसार करणाऱ्या कीटकांच्या वाढीवर कीटकनाशकाची फवारणी करून प्रतिबंधक करावा. बाधित जनावरांना वेगळे बांधावे. गोठ्यामध्ये स्वच्छता राखावी.
घटसर्प
हा विशेषतः दुधाळ जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे. विशेषतः म्हशींमध्ये हा रोग जास्त प्रमाणात आढळतो. हा रोग ‘पाश्चरेला मल्टोसिडा’ या विषाणूंमुळे होतो.
लक्षणे
या रोगामुळे जनावरास फार ताप येतो. घशास सूज येते. श्वासोच्छ्वास जलदरीतीने होतो. जनावराचे डोळे लाल होतात. ते सतत वाहतात. जीभ बाहेर येते. लाळ वाहते. नाकातून शेंबडासारखा स्राव बाहेर पडतो. काही जनावरांना काही वेळेस रक्ताची हगवण होते. अंगावर सूज येते.
उपचार
घटसर्पाची लक्षणे आढळून आल्यास लागलीच पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य ती उपाययोजना करावी. त्वरित उपचार न झाल्यास जनावराचा मृत्यूही होऊ शकतो.
दरवर्षी मॉन्सूनपूर्व गॅलिक आजाराची लस जवळच्या पशुवैद्यक संस्थेकडून घेऊन पावसाळ्यापूर्वी लसीकरण करणे गरजेचे आहे.
जनावरांना घटसर्प आजाराची क दिसताच इतर निरोगी जनावरांपासून वेगळे करावे.
न्यूमोनिया
हा रोग मुख्यतः जंतुसंसर्गामुळे होतो. श्वासोच्छ्वासात अनियमितता दिसून येते. त्यामुळे जनावरे ठसकताना दिसून येतात.
लक्षणे
थंडी व ताप इ. लक्षणांसह फुफ्फुसात पाणी साठून फुफ्फुसांना सूज येते. त्यामुळे श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो. शेणावर चिकट आवरण दिसून येते. डोळ्यांतून पाणी वाहते. वजनात लक्षणीय घट येते. ताप, थंडी अधिक वाढते. वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलांमुळे किंवा सभोवतालच्या ओलसर जागेमुळे हा आजार बळावतो.
उपाय
जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरड्या व उंच ठिकाणी असावी.
गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या साधन सामग्रीचा योग्य तो वापर करावा.
गोठ्याची नियमित स्वच्छता हा एक न्यूमोनिया टाळण्याचा मुख्य उपाय आहे.
आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
प्रतिजैविके केवळ वैद्यकीय सल्ल्यानेच द्यावीत.
कोमट पाण्यात पोटॅशिअम मिसळून त्याने वेळोवेळी जनावरांचे नाक स्वच्छ करावे.
जनावरांना कृत्रिम ऊब उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ गोणपाटाचा वापर करावा.
शारीरिक झीज भरून काढण्यासाठी जनावरांना पौष्टिक आहार द्यावा.
डॉ. सिद्दीकी एम.एफ.एम.एफ., ९९६०१४७१७१
(चिकित्सालयीन पशुवैद्यकीय औषध नीती व न्यायवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.