डॉ. प्रियंका तोंडे, डॉ. अतुल ढोक
Animal Feed Management : जनावरांच्या आहारावर जवळपास ७० टक्के खर्च होतो. आहाराकडे विशेष लक्ष दिले तर दूध उत्पादन किफायतशीर होते, आरोग्य व प्रजनन उत्तम राहते. संतुलित पशुखाद्य तयार करावयाचे असल्यास त्यातील खाद्य घटक चांगल्या प्रतीचे असतील याची खात्री करून घ्यावी.
प्र त्येक जनावराची शुष्क पदार्थ खाण्याची गरज त्याच्या शरीर वजनावर अवलंबून असते. साधारणपणे जनावराला शरीर वजनाच्या २.५ ते ३ टक्के शुष्क पदार्थ त्याच्या आहारातून पुरविणे गरजेचे आहे. रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट मोठे असते. ते संपूर्ण भरल्यानंतरच त्यास भूक मिटल्याची जाणीव होते. यासाठी जनावरांच्या आहारात प्रामुख्याने वाळलेला चारा असणे आवश्यक ठरते. जनावरांना हिरवा चारा, खुराक देणेसुद्धा आवश्यक आहे.
हिरव्या चाऱ्यातून जनावरांना पोषणमूल्ये ताज्या स्वरुपात मिळतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले टिकून राहते. हिरव्या चाऱ्यातून जनावरांना अ जीवनसत्त्वाचा पुरवठा होऊन त्यांचे डोळे, कातडी व त्वचा सतेज होते. रोगप्रतिकारशक्ती वाढून उत्पादनाची पातळी टिकविण्यास मदत हाते. जनावरांना साधारणत: ४ ते ६ किलो कुटार, १० ते १५ किलो हिरवा चारा आणि कमीत कमी दीड किलो खुराक द्यावा. दूध उत्पादनासाठी प्रत्येकी अडीच लिटर दुधामागे एक किलो खुराक द्यावा. म्हशींना दोन लिटर दुधामागे एक किलो खुराक द्यावा. गाभण काळाच्या सातव्या महिन्यापासून शरीर पोषणाव्यतिरिक्त गाईसाठी १.२५ किलो आणि म्हशीसाठी १.७५ किलो अतिरिक्त संतुलित पशुखाद्य द्यावे. यामुळे गर्भाची योग्य प्रकारे वाढ होते. वासरू चांगल्या वजनाचे होते. दूध उत्पादन टिकण्यास मदत होते.
जनावरांना हिरवा चारा कमी असल्यास कुटाराचे प्रमाण वाढवून द्यावे. सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचे कुटार, चण्याचे कुटार, गव्हांडा, भाताचे कुटार, ज्वारीचा कडबा यांचा वापर करावा. हिरव्या चाऱ्यामध्ये वैरणीचा मका, ज्वारी, बाजरी, बरसीम, लुसर्न, संकरित नेपियर गवताचा वापर करावा. तयार पशुखाद्य वासरे, भाकड जनावरे आणि दुधाळ जनावरे यांच्या गरजेनुसार बनविलेले असते. घरच्याघरी सुद्धा संतुलित पशुखाद्य तयार करता येते. यासाठी पेंड किंवा ढेप (सरकी / शेंगदाणा / सोयाबीन) २५ ते ३५ टक्के, ज्वारी, बाजरी, मका २५ ते ३५ टक्के, गहू किंवा तांदळाचा कोंडा १० ते २५ टक्के, डाळ चुनी १० ते २५ टक्के या मिश्रणातील घटकांचे प्रमाण जनावराच्या आवश्यकतेनुसार आणि खाद्य पदार्थाच्या उपलब्धेनुसार बदलावे. या खुराकात २ टक्के खनिज मिश्रण पावडर आणि १ टक्का खाण्याचे मीठ मिसळावे. संतुलित पशुखाद्य तयार करावयाचे असल्यास त्यातील खाद्य घटक चांगल्या प्रतीचे असावेत. बुरशीजन्य खाद्य पदार्थ खुराकात वापरू नयेत. अलप तयार करत असताना भरडलेला मका, सरकी ढेप, तुरीची चुनी व तांदळाचा कोंडा या खाद्य घटकांना प्राधान्य द्यावे.
द्विदल, कडधान्य चाऱ्याचे मिश्रण
चांगल्या प्रतीची प्रथिने, इतर पोषक द्रव्ये मिळण्यासाठी हिरवा चारा देताना, त्यामध्ये द्विदल चारा जसे की, लुसर्न, बरसीम, मूग, भुईमूग, उडीद यासोबत मका, ज्वारी इत्यादीचे १:३ प्रमाण असावे.
केवळ एकदल किंवा द्विदल चारा पोटभर खाऊ घातल्याने अपचन, पोटफुगीचा त्रास होऊ शकतो. जनावरांना चारा देतेवेळी कुट्टी करून द्यावा. कुट्टी केलेल्या चाऱ्याची पाचकता जास्त असते.
खनिज, क्षार मिश्रणाचा वापर
चांगल्या दर्जाचे खनीज, क्षार मिश्रण निवडावे. खनिजाच्या आहारातील अभावामुळे जनावरास बरेच आजार होतात, दूध उत्पादन कमी होते, वंधत्व येते, जनावर माजावर येत नाही.
जनावराच्या एक किलो खाद्यात २० ग्रॅम खनिज, क्षार मिश्रण पावडर मिसळावी. जनावरांच्या गोठ्यात चाटण वीट टांगून ठेवावी. चाटण विटेमुळे जनावरास त्वरित ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्वे मिळतात. भूकसुद्धा जास्त लागते.
खाद्यातील बदल, देण्याची वेळ
पशुखाद्य किंवा चाऱ्यात एकदम बदल केल्यास, जनावरे पाहिजे त्या प्रमाणात चारा खात नाहीत. कमी चारा खाल्ल्यास अपचनाचा त्रास होऊ शकतो.
चारा किंवा पशुखाद्य देण्याची वेळ आणि त्यामधील अंतरामध्ये वारंवार बदल करू नये. चारा, पाणी देण्याच्या वेळेतील अनियमितपणा खाद्याच्या पाचकतेवर परिणाम करू शकतात.
चाऱ्यामध्ये बदल करावयाचा असल्यास जनावरांना १० ते १२ दिवसांचा अवधी द्यावा. जेणेकरून ते नवीन चाऱ्याशी अवगत होतील, पचनाचा त्रास होणार नाही.
चारा प्रक्रिया
कोरडा चारा पाण्यामध्ये भिजवून नंतर खाण्यास द्यावा.
चाऱ्याची कुट्टी करून द्यावी. निकृष्ट चाऱ्यावर तज्ञांच्या मार्गदर्शनाने प्रक्रिया करावी.
ज्वारी, मका आणि बाजरी इत्यादी प्रकारच्या हिरव्या चाऱ्याची कुट्टी करून मुरघास तयार करावा.
पिंपळ, सुबाभूळ, शेवरीचा पाला, स्टायलो, नेपिअर, दशरथ गवत तसेच उसाचे चिपाड, गव्हांडा, भात काडावर प्रक्रिया करून जनावरांच्या आहारात वापर करावा.
जंतनाशकाचा वापर
जंताच्या प्रादुर्भावामुळे वासरू खंगत जाऊन वाढ खुंटते, पोटाचे आकारमान वाढते, त्वचा खरखरीत होऊन केस गळतात.
जंत झाल्यानंतर वासराचा आहार वाढलेला असतो. मात्र त्यातून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त लाभ पोटातील जंत आपल्या स्वत:च्या वाढीसाठी करतात. त्यामुळे वासराच्या शरीरास त्याचा फायदा फार कमी होतो. खाद्यावरील खर्चसुद्धा वाया जातो.
वासराला सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याला तर मोठ्या जनावरांना वर्षातून २ ते ३ वेळा जंतनाशक द्यावे.
महत्त्वाच्या बाबी
गाई, म्हशीचे दूध आटविल्यानंतर खुराक बंद न करता वासरांच्या वाढीकरिता किमान अडीच किलो खुराक सुरू ठेवावा. जेणेकरून गर्भात वासराची योग्य वाढ होऊन प्रजननातील अडथळे दूर होतात. वासरे सुदृढ जन्माला येतात.
प्रसूती पश्चात माज वेळेवर येऊन वेळेत गर्भधारणा आणि वर्षाला एक वासरू ही संकल्पना साकारता येते.
जनावरांना नेहमी संतुलित खाद्य द्यावे, एकाच प्रकारचे खाद्य घटक वारंवार देऊ नयेत. खाद्याची वेळ निश्चित असावी, दोन खाद्यांमध्ये ८ ते १० तासांचे अंतर असावे. खाद्यामध्ये अचानक बदल करू नये, जनावरांना कमी अथवा अधिक खाद्य देऊ नये.
जनावरांच्या शरीर अवस्थेनुसार खाद्य मिश्रणांची मात्रा द्यावी. खाद्य घटक उत्तम प्रतीचे असावेत, बुरशीयुक्त खाद्य देऊ नये, खाद्यामध्ये हिरवा चारा, वाळला चारा व संतुलित खाद्यमिश्रणाचा समतोल ठेवावा. शक्यतोवर जनावरांच्या आवडीनुसार खाद्य घटकांची निवड करावी. जनावरांना दिवसातून चार ते पाच वेळेस पाणी पिण्यास द्यावे.
वासराचा आहार
चिकामध्ये असलेल्या रोग प्रतिबंधक घटकांमुळे वासरांचे बालवयात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण होते. जन्मल्यानंतर सहा तासांच्या आत चीक अन्ननलिकेत शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. त्याचप्रमाणे वासरांची अन्ननलिका स्वच्छ होण्यास मदत होते.
वासरास किमान एक महिन्यापर्यंत गायीचे दूध पाजावे. दूध पाजण्याचे प्रतिदिन प्रमाण त्याच्या वजनाच्या अंदाजे १/१० एवढे असावे. दूध एकाच वेळेस न देता दिवसातून २ ते ३ वेळा विभागून पाजावे. दूध पाजण्याच्या वेळेतील अंतर सारखे ठेवावे. या काळात वासराला गायीचे दूध मिळाल्यास त्याची वाढ झपाट्याने होते.
गाईचे दूध नसल्यास मिल्क रिप्लेसरचा वापर करावा. मिल्क रिप्लेसर हे पावडर स्वरूपात बाजारात उपलब्ध आहे. त्यापासून पाहिजे तेव्हा दूध तयार करता येते.
वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून वासराला प्रथिनयुक्त आहार (काफ स्टार्टर) देण्यास हळूहळू सुरुवात करावी. हा आहार वासरास ६ महिने देता येतो. वासरू २ ते ३ आठवड्यांचे झाल्यानंतर त्याला कोवळे लुसलुशीत गवत द्यावे. सोबतच पचायला हलका, सुका चारा द्यावा. यामुळे त्याच्या रवंथ करणाऱ्या पोटाची वाढ लवकर होते.
बाजारात काफ स्टार्टर उपलब्ध आहे. याचबरोबरीने घरगुती स्तरावर खुराक तयार करता येतो. यासाठी ३५ ते ४० टक्के, भुईमूग / सोयाबीन पेंड, ३५ ते ४० टक्के, गहू, तांदळाचा कोंडा २० टक्के, क्षार, खनिज मिश्रण २ टक्के, खाण्याचे मीठ १ टक्का या प्रमाणात वापर करावा. तसेच प्रती १०० किलो खाद्यात २० ग्रॅम जीवनसत्त्व पावडर मिसळावी.
- डॉ. प्रियंका तोंडे, ९०७५८०३९१८
(प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र,
पडेगाव, जि. छत्रपती संभाजीनगर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.