sheep Goat Agrowon
काळजी पशुधनाची

Goat Health Management : शेळी, मेंढ्यांचे आरोग्य व्यवस्थापन

Team Agrowon

मंगेश वैद्य, विलास डोंगरे

शेळी आणि मेंढी विविध प्रकारच्या पर्यावरणीय परिस्थितीत शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतात. मात्र वाढलेले तापमान आणि उच्च सापेक्ष आर्द्रतेमुळे त्यांच्या शरीरावर उष्माघाताचा परिणाम होतो. यामुळे शारीरिक वाढ, दूध आणि मांस उत्पादनात घट दिसून येते.

शेळ्या, मेंढ्या जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्‌भवण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा, पाणी पिण्याचे थांबतात. शेळ्यांना चक्कर येते. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.

उष्माघाताची लक्षणे

शेळ्या, मेंढ्या अस्वस्थ होतात, त्यांची तहान-भूक मंदावते. शरीराचे तापमान १०६ अंश सेल्सिअस इतके वाढून त्यांची कातडी कोरडी पडते. डोळे लालसर होऊन डोळ्यातून पाणी गळते. ८ ते१० तासांनंतर अतिसार होतो. लघवीचे प्रमाण कमी होते.

शेळ्या, मेंढ्या बसूनच राहतात. गाभण शेळ्या, मेंढ्या गाभडण्याचे प्रमाण वाढते. उष्माघातामुळे पिले दगावू शकतात.

जास्त तापमानाचा परिणाम झाल्यास जास्त प्रमाणात श्‍वासोच्छ्वास करतात. जास्त लाळ गाळतात. त्यांना उभे राहण्याची ताकद राहत नाही. त्यांना जास्त थकवा जाणवतो. खाद्य कमी खातात.

उष्णतेचा ताण मांस उत्पादनावर परिणाम होतो. उष्णतेने त्रस्त असलेल्या उस्मानाबादी शेळ्यांच्या मांसामध्ये सामू बदलतो.

करडांचे व्यवस्थापन

करडांना आवश्‍यकतेपेक्षा जास्त दूध पाजू नये, नाही तर अपचन होऊन हगवण वाढते. हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश असतो.

हगवणीची बाधा झाल्यास शरीरातील पाणी, इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे जनावर अशक्त होते, जमिनीवर पडून राहतात.

हाताळणी आणि वाहतूक

उन्हाळ्यात शेळ्या, मेंढ्यांची जास्त हाताळणी करणे टाळावे. अत्यंत आवश्यक व गरजेचे असेल तरच सकाळी लवकर आणि दुपारी उशिरा हाताळणी करावी.

शरीराच्या जास्त हालचालीमुळे शरीराचे तापमान वाढून त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. हाताळणी करण्यापूर्वी त्यांना थंड पाणी पिण्यास द्यावे.

शेळ्या, मेंढ्यांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक टाळावी. कडक उन्हातील प्रवासामुळे जनावरावर ताण येतो शरीरावर विपरीत परिणाम होऊन वजनात घट होते. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा जेव्हा वातावरण थंड असेल तेव्हा शेळ्या मेंढ्यांची वाहतूक करावी.

व्यवस्थापनातील बदल

हिरवा चारा नसल्यास खुराक देणे गरजेचे आहे, त्यामध्ये दूध वाढीसाठी पशू खाद्य तसेच मका, तुरीचा भरडा यासारखा खुराक द्यावा.

गोठ्यातील हवा खेळती ठेवावी. आंत्रविषार, लाळ्या खुरकूत आणि घटसर्प व अन्य रोगाचे लसीकरण करून घ्यावे. लसीकरण करण्याच्या दोन दिवस आधी व लसीकरण केल्यानंतर इलेक्ट्रोलाइट पावडर, बी कॉम्प्लेक्स द्यावे, यामुळे लसीकरणाचा ताण येणार नाही. शेळ्यांना सकाळी लवकर ६ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत चरण्यासाठी सोडावे.

पशुतज्ज्ञांकडून करडे, कोकरांची नियमित तपासणी करून घ्यावी. करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण ३ टप्पे असतात. यामध्ये जन्मापासून २ महिने, २ ते ४ महिने आणि ४ ते ६ महिने या काळात काळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या ६ महिन्यांत दर १५ दिवसांनी करडे सांभाळण्याच्या व्यवस्थापन गरजेनुसार बदलावे लागते. जन्मानंतर लगेच शरीर वजनांच्या नोंदीवरून करडे, कोकरू सशक्त आहेत का, याचा अंदाज बांधता येतो. अशक्त करडे, कोकरू पहिल्या १५ दिवस विशेष सांभाळावी लागतात.

सर्वसाधारणपणे शेळ्या, मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरुवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

उन्हाच्या ताणामुळे ताप येणे, नाकातून पाणी गळणे, चारा व पाणी कमी खाणे, दूध कमी देणे, वजन घटणे अशी लक्षणे दिसतात. पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन योग्य उपचार करावेत. आजारी शेळ्यांना वेगळे करून उपचार करावेत. जंतांचे औषध आवश्यक असेल तरच द्यावे.

शेळ्यांची दाटीवाटी किंवा गर्दी कमी करावी. तज्ज्ञांकडून औषधोपचार करून घ्यावेत. खाद्यातून शेळ्यांना क्षार मिश्रण, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके द्यावीत. लहान करडांची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. कारण करडांची उष्माघातामुळे जास्त प्रमाणात मरतूक होते.

गोठ्यातील कप्प्यात खनिज क्षार विटा टांगून ठेवाव्यात. वाढीस लागलेल्या करडांना क्षाराची कमतरता असल्यास ते माती चाटतात आणि यातून पोटात जंतही वाढतात. प्रत्येक करडास जन्मानंतर १५ दिवसांत, तर पुढे दर महिन्यास एकदा जंतनाशन करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT