Goat Farming
Goat FarmingAgrowon

Goat Farming : जातिवंत शेळ्यासाठी पैदास धोरण

Goat Management : पैदाशीसाठी निरोगी, पूर्ण वाढ झालेली, शारीरिक आणि आनुवंशिक व्यंग नसलेल्या जातिवंत नर, मादीची निवड करावी. कातडी चमकदार, प्रमाणात केस असलेली, कोणताही रोग किंवा जखमा नसलेली असावी. डोके रुंद, भव्य चेहरेपट्टी व प्रमाणबद्ध असावी.

डॉ. संजय  धावारे, डॉ. प्राजक्ता जाधव

Goat Rearing : प्रजोत्पादनाचा कमी कालावधी, स्थानिक वातावरणातील तीव्र चढ-उतारामध्ये टिकाव धरू शकण्याची नैसर्गिक क्षमता, व्यवस्थापनातील सुलभता आणि निकृष्ट दर्जाच्या अन्न घटकांवर जगण्याची क्षमता या एकत्रित गुणधर्मामुळे शेळीपालन व्यवसाय लोकप्रिय झाला आहे.

सर्व साधारणतः ठरावीक संख्येमध्ये शेळी आणि बोकड यांचा कळप जोपासला जातो, त्यासाठी स्वतंत्र निवारा उभारला जातो. हिरवा चारा, खुराकाचा मुबलक पुरवठा केला जातो. काही ठिकाणी नैसर्गिक संसाधनांच्या उपलब्धतेनुसार शेळ्यांना चरावयास सोडले जाते.

परंपरागत शेळीपालनापेक्षा बंदिस्त पद्धतीत शेळीपालनाचा खर्च जास्त असतो, परंतु त्या सोबतच उत्पन्न व आरोग्याची हमी देखील जास्त असते. साधारणपणे असे गृहीत धरले जाते, की एक शेळी वर्षातून दोन वेळा विते.

जुळे होण्याची शक्यता ५० टक्के असते, म्हणूनच एका शेळीपासून वर्षाकाठी तीन करडे मिळतात. यानुसार नफ्याचा अंदाज बांधला जातो, मात्र प्रत्यक्षात या व्यवसायात वरीलप्रमाणे अपेक्षित पैदाशीचे समीकरण चुकते. परंतु जर योग्य व्यवस्थापनाने शेळीपालनात पैदासीचे वेळापत्रक जपता आले तर हा व्यवसाय इतर कोणत्याही पशुपालन व्यवसायापेक्षा कित्येक पटीने आर्थिक सुबत्ता देणारा ठरतो.

पैदाशीचे प्रकार

प्रामुख्याने नर व मादी यांची जनुकीय रचना हा महत्त्वाचा घटक आहे. त्याची शुद्धता व सक्षमता पैदास घडवू शकते.

अ) अपग्रेडिंग

पैदाशीच्या या प्रकारात कमी दर्जाची जनुकीय रचना असलेल्या देशी प्रजातीच्या अवर्गीकृत शेळ्यांच्या जनुकीय रचनेत वाढ घडवून आणली जाते.

यामध्ये सहसा उत्तम गुणधर्म असलेल्या शुद्ध प्रजातीच्या बोकडाचा वापर करून देशी प्रजातीच्या अवर्गीकृत शेळ्यांची पैदास केली जाते.

अनुवंशशास्त्राच्या गुणधर्मानुसार वरील प्रकारात निर्माण होणाऱ्या पहिल्या पिढीत शुद्ध प्रजातीच्या बोकडाचे ५० टक्के गुणधर्म येतात. त्यामुळे कमी प्रतीच्या देशी गावरान शेळ्यांच्या जनुकीय संरचनेत अपेक्षित बदल घडून येतो.

ब) क्रॉस ब्रीडिंग

या प्रकारात शेळ्यांच्या दोन वेगवेगळ्या शुद्ध प्रजातींच्या नर आणि मादीचा वापर करून पैदास केली जाते. यामुळे या प्रकारात निर्माण होणाऱ्या पहिल्या पिढीतील करडे त्यांच्या आई, वडिलांचे ५०-५० टक्के गुणधर्म एकत्रित घेऊन जन्माला येतात.

या पद्धतीच्या पैदाशीत निर्माण होणारी करडांची पिढी ही त्यांच्या आई, वडिलांपेक्षा दर्जात्मकदृष्ट्या उत्तम तयार होते. याचप्रमाणे दोन वेगवेगळ्या प्रजातीचा संकर घडवून चांगल्या दर्जाची करडे निर्माण केली जातात.

Goat Farming
Goat Farming : ऋतुनिहाय व्यवस्थापन बदलावर भर

पैदास पद्धती

सर्व साधारणपणे मादी माजावर आल्यानंतर तिच्या शरीरात वाढ झालेल्या स्त्रीबीजाचा जेव्हा संपर्क नर जनावरांच्या वीर्यातील पुंबीजासोबत होतो, तेव्हा फलनाची क्रिया घडून येते.कोणत्याही सजीवमात्रेच्या पैदासीकरिता ही फलनाची क्रिया अंतर्भूत असते. फलनाकरिता आवश्यक तत्त्वाचा विचार केल्यास शेळ्यामध्ये पैदासीच्या दोन प्रमुख पद्धती आहेत.

अ) नैसर्गिक पैदास

माजावर आलेले मादी जनावर आणि कळपातील नर यांचे नैसर्गिक मिलन घडून येते, त्यामुळे मादीच्या गर्भाशयात नराचे वीर्य नैसर्गिकरीत्या सोडले जाऊन फलनाची क्रिया पूर्ण होते.

शेळ्यामध्ये या पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सहसा ६ ते १० शेळ्यांकरिता एक नर या प्रमाणे कळपात नर सोडले जातात.

व्यवस्थापनाच्या इतर कोणत्याही खास तरतुदीशिवाय या पद्धतीचा वापर करता येतो. ही पद्धत पूर्णत: किफायतशीर असून, त्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. परंतु या पद्धतीत एक बोकड दर तीन दिवसाला ३ ते ४ शेळ्या यशस्वीरीत्या फळवू शकतो. त्यापेक्षा जास्त शेळ्या माजावर आल्यास त्यांचे फलन घडून येत नाही. शेळ्यांचा माज वाया जातो.

बोकडाला एखाद्या आजाराची लागण झाल्यास त्याचा प्रसार शेळ्यांमध्ये होऊन उत्पादनात घट येते. त्याप्रमाणे एकाच बोकडाचा वारंवार वापर केल्याने कळपात एकाच पद्धतीची संतती निपजण्याची शक्यता असते. त्यामुळे मर्यादित शेळ्यांच्या पालनात सर्वाधिक यशस्वी असलेली पैदासीची ही पद्धत व्यावसायिकरित्या मोठ्या कळपाच्या व्यवस्थापनात गैरसोयीची वाटते.

Goat Farming
Goat Farming : शेळ्यांना पौष्टिक खाद्यासाठी विविध चारा पिकांचे नियोजन

ब) कृत्रिम रेतन

या पद्धतीत शुद्ध वंशाच्या सिद्ध नराचे वीर्य कृत्रिमरीत्या काढले जाते. त्याच्या आवश्यक मात्रा योग्य पद्धतीने गोठवून साठविल्या जातात.

मादी जनावर माजावर आल्यास योग्य वेळी त्या गोठविलेल्या वीर्याची मात्रा एका विशिष्ट यंत्राच्या साह्याने तिच्या गर्भाशयात सोडली जाते. मादीचे प्रत्यक्ष नराच्या मिलनाशिवाय फलन केले जाते.

या पद्धतीत शुद्ध वंशाच्या दुर्मीळ प्रजातीच्या सिद्ध नराचे वीर्य वर्षानुवर्षे जपून ठेवता येते. एका वेळी जमा केलेल्या वीर्याचा प्रमाणित मात्रेच्या माध्यमामध्ये एकापेक्षा जास्त मादीचे फलन घडवून आणता येते. त्यामुळे ही पद्धत किफायतशीर आहे.

शेळीपालनात कृत्रिम रेतनाचा वापर मर्यादित स्वरूपात आहे. शेळीच्या गर्भाशयाचा आकारमान माज ओळखण्यातील अडचणी, वीर्य साठवणुकीची कालमर्यादा इत्यादी अडचणीमुळे शेळ्यामध्ये कृत्रिम रेतन सरसकट करता येत नाही.

व्यावसायिक शेळीपालनाच्या यशस्वी उद्योगाकरिता कृत्रिम रेतन फायदेशीर आहे. म्हणजे रामबाण उपाय आहे, यासाठी शास्त्रोक्त कृत्रिम रेतन प्रशिक्षणाची गरज आहे. योग्य प्रशिक्षित उमेदवार आपल्या शेळ्यांच्या कळपात कृत्रिम रेतन प्रभावीपणे राबवू शकतो.

कृत्रिम रेतनाद्वारे पैदास करावयाची असल्यास स्वतंत्र कार्यक्रम आखावा लागतो. त्याच्या विहित वेळापत्रकाची कसून अंमलबजावणी करावी लागेल. अशारीतीने कळपातील संपूर्ण शेळ्यांचा माज नियंत्रणात आणून दोन ते तीन दिवसांच्या फरकाने सर्व माद्या माजावर आणाव्या लागतात.

त्यासाठीच्या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. त्यानंतर माजावर आलेल्या सर्व शेळ्या कृत्रिम रेतनाच्या साह्याने २ ते ३ दिवसांच्या फरकाने फळवाव्या लागतील. यातून शेळीपालन व्यवसायात एकाच वेळी सर्व शेळ्या करडांना जन्म देतील.

पैदाशीसाठी नर, मादीची निवड

शरीर रेखीव प्रमाणबद्ध, नरोगी, पूर्ण वाढ झालेली, शारीरिक आणि आनुवंशिक व्यंग नसलेल्या नर व मादीची निवड करावी.

नर व मादी संबंधित जातीचे गुणधर्म दाखविणारे असावेत.

कातडी चमकदार, केस असलेली, कोणताही रोग किंवा जखमा नसलेली असावी.

डोके रुंद, भव्य चेहरेपट्टी व प्रमाणबद्ध असावी.

जबडे, नाकपुड्या रुंद व डोळे मोठे, चमकदार व पाणीदार असावेत.

मान पातळ दोन्ही बाजूंस व्यवस्थित जोडलेली असावी.

समोरील पाय सरळ, समांतर व त्यातील हाडाची वाढ पूर्ण झालेली असावी.

छाती रुंद, भारदार असावी. छातीच्या फासळ्या एकमेकांपासून अंतरावर व मजबूत असाव्यात. पाठ सरळ, लांब असावी.

कंबर रुंद, टोपरांचे हाडे एकमेकांपासून योग्य अंतरावर, सारख्या उंचीचे असावेत.

मागील पाय सरळ, लांब व मजबूत समांतर व हाडांची वाढ पूर्ण झालेली असावी.

शेपटी जवळील हाडात योग्य अंतर असावे, आकर्षक शेपटी असावी.

कासेचा आकार मोठा व लवचिक कातडी युक्त असावा. सड खूप लांब किंवा आखूड नसावेत.

मादीच्या जननेंद्रियांना कोणतेही इजा किंवा आजार असू नये.

नराच्या जननेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली असावी. दोन्ही वृषण लोंबकळणारे असावेत.

ज्या माद्या दोन किंवा जास्त पिले देतात, दोन वेतांतील अंतर कमी व लवकर वयात येणारी असावी.

दुधाचे उत्पादन भरपूर असावे.

विताना, दोन महिन्यांनंतर पिलांचे वजन योग्य असावे.

दर दोन वर्षांनंतर पैदाशीसाठीचा नर बदलावा.

डॉ. संजय धावारे, ८७८८०९१६४४

(पशू अनुवंश व पशू प्रजनन शास्त्र विभाग, पशू वैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com