Lumpi Disease in Cows Agrowon
काळजी पशुधनाची

Lumpy Skin Disease: लम्पी नियंत्रणाची त्रिसूत्री- आहार, स्वच्छता आणि औषधोपचार

Livestock Care: लम्पीच्या नियंत्रणासाठी ८० टक्के जनावरांची काळजी घ्यायची, सुश्रुशा करायची तर २० टक्के औषधोपचार, हे तत्त्व प्रभावी ठरते. पौष्टिक आहार, स्वच्छता, औषधोपचार या त्रिसुत्रीने लम्पीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.

Swarali Pawar

थोडक्यात माहिती...

१. लम्पीवर नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण, स्वच्छता आणि जंतुनाशक फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे.

२. बाधित आणि निरोगी जनावरांना वेगळं ठेवून व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

३. गोठ्याची स्वच्छता, आजार पसरवणाऱ्या डास- माशी यांचं नियंत्रण आणि सकस आहारामुळे आजार नियंत्रणात येतो.

४. जनावरांची नियमित तपासणी, गरजेनुसार औषधोपचार आणि योग्य निगा राखावी.

५. लक्षणे दिसताच पशुवैद्यकीय सल्ला घेऊन उपचार तात्काळ सुरू करावेत.

Lumpi Disease Control: राज्यात लम्पीचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. लम्पी हा साथीचा आजार असल्याने त्यावर सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत. या आजाराच्या नियंत्रणासाठी ८० टक्के त्यांची काळजी घ्यायची, सुश्रुशा करायची तर २० टक्के औषधोपचार, हे तत्त्व प्रभावी ठरते. पौष्टिक आहार, स्वच्छता, जंतुनाशक फवारणी या त्रिसुत्रीने लम्पीवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. तसेच बाधित जनावरावर पशुवैद्यकांच्या सल्ल्यानेच उपचार करावा.

लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण तसेच जनावरांचे व्यवस्थापन करणे, हे महत्त्वाचे मार्ग आहेत. या उपायांच्या मदतीने लम्पीचा विळखा नक्कीच कमी होऊ शकतो. हा आजार गोवंश जनावरांमध्ये म्हणजेच वासरू, गाय, बैल यांच्यात आढळतो. आजवर तो म्हैस, शेळी-मेंढी आणि इतर प्राण्यांमध्ये आढळलेला दिसत नाही.

लम्पीचे नियंत्रण करण्यासाठी त्याचा प्रसार कसा होतो हे समजून घेऊया,

लम्पी साथीचा आजार आहे. विषाणूवाहक डास, माश्या, गोचिड, चिलटे यांसारख्या किटकांच्या माध्यमातून तो पसरतो. त्यासोबत जनावरांच्या संपर्कातील वस्तू, जखमा आणि नाकातील स्त्राव यामुळे आजाराचा प्रसार होतो.

लम्पीची लक्षणे

जनावरांना १०४ ते १०५ अंश फॅरनहाइटपर्यंत ताप येतो. पायावर सूज येते आणि त्यामुळे जनावर लंगडू लागते. ताप उतरल्यावर संपूर्ण शरीरावर त्वचेखाली २ ते ५ सेंटीमीटरच्या गाठी दिसतात. गळा आणि मागील पायाजवळील लसिका ग्रंथी सुजतात. जनावराची हालचाल मंदावते, भूक कमी होते आणि दूधही कमी येते. नाक आणि डोळ्यांतून स्रावही निघतो.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

गाई, बैल, वासरे यांचे लम्पीपासून संरक्षणासाठी वेळेवर लसीकरण करा. गोठा रोज साफ करावा. निर्जंतुकीकरणासाठी सोडियम हायपोक्लोराईड किंवा १% फॉर्म्यालिनचे पाणी वापरावे. गोठ्यातील माशी, डास, गोचिड कमी करा. यासाठी १ लिटर पाण्यात १० मि.लि. करंज तेल, १० मि.लि. कडुलिंब तेल आणि ४० ग्रॅम अंगाचा साबण मिसळा. हे मिश्रण जनावरांवर आणि गोठ्यात फवारा. तीन दिवसांच्या अंतराने अशा तीन फवारण्या या प्रमाणानुसार त्याची फवारणी करा. आजारी आणि निरोगी जनावरांना वेगवेगळं ठेवा, दोघांना चारा-पाणीसुद्धा वेगळं द्या.

लम्पीचा विळखा संपेपर्यंत नवीन जनावरांची खरेदी करणे टाळा. जनावरांची विविध ठिकाणी ने-आण करणे टाळा. यात्रा, बाजार, मेळे या अति गर्दीच्या ठिकाणी जनावरांना घेऊन जाऊ नका. अशा ठिकाणी साथ लवकर पसरते. गोठ्यात बाहेरच्यांना प्रवेश देताना खबरदारी घ्या. शिवाय जे गोठ्यात जाणार आहेत त्यांनी हात, कपडे स्वच्छ केले आहेत का याची खात्री करून घ्या. शक्य असल्यास अशा व्यक्तींना गोठ्यात येऊ देऊ नका. एक गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीने दुसऱ्या गोठ्यात जाऊ नये कारण त्यामुळे लम्पीचा प्रसार होऊ शकतो.

या काळात जनावरांना मोकळं सोडू नका. सोबतच त्यांना सार्वजनिक पाणवठ्यावरही पाणी पिण्यासाठी घेऊन जाऊ नका. दररोज निरोगी जनावरांमध्ये आजाराची लक्षणं आहेत का याकडे लक्ष ठेवा. निरोगी जनावरांना आयव्हरमेक्टिन इंजेक्शन दिल्यास आजाराचा प्रसार कमी होण्यास मदत होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरातल्या जनावराला लम्पी झाला असेल तर लपवून ठेवू नका. तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांचा सल्ला घ्या. जनावरांना वेगवेगळं करून त्वरित उपचार सुरू करा.

जनावरांचे व्यवस्थापन

आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगवेगळं ठेवा. ऊन, पाऊस, वारा यापासून त्यांचे संरक्षण करा. बाधित जनावरांना संतुलित आहार द्यावा. हिरव्या चाऱ्याबरोबरच पेंड, खनिज मिश्रण, लिव्हर टॉनिक आणि पाचनासाठी उपयोगी प्री-प्रोबायोटिक औषध द्या. जनावरांची खाण्याची इच्छा नसल्यास त्यांना हाताने खाऊ घाला. औषधे देताना सरळ तोंडात जबरदस्तीने देऊ नका. त्याऐवजी पाण्यात, भरड्यामध्ये मिसळा आणि लाडूसारखे करून द्यावे.

बाधित जनावरांचे पाय सुजतात त्यासाठी मीठ टाकून गरम पाण्याचा शेक सकाळ-संध्याकाळ द्यावा. सोबतच मॅग्नेशियम सल्फेट आणि ग्लिसरीनचा लेप लावावा. दोन्ही पाय सुजल्यास कपडा बांधा आणि शेक दिल्यानंतर जागा कोरडी करुन घ्या. जनावरांच्या अंगावर गाठी आल्यावर मिठाच्या पाण्याने दिवसातून दोन वेळा अंग पुसा. गोठा रोजच्या रोज स्वच्छ ठेवत जा. जनावर खाली बसत नसल्यास त्याच्या खाली गवत किंवा पोते टाकावे. अॅनिमल लिफ्टरचा वापर करावा. एकाच ठिकाणी बराच वेळ बसल्याने गाठींवर जखमा होतात त्यामुळे वारंवार त्यांची बाजू बदलत रहावी.

बाधित जनावरांना त्वचेवर बऱ्याच गाठी आणि जखमा होतात. या जखमांसाठी कापूर आणि खोबरेल तेल एकत्र करुन लावावे. तोंड व कास हे संवेदनशील अवयव असल्याने त्यावरील जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटने धुऊन बोरोग्लिसरीन लावावे. जनावराचे नाक बंद झाल्यास कोमट पाण्याने पुसा आणि बोरोग्लिसरीन टाका यासोबतच सर्दी असल्यास निलगिरी तेल टाकून पाण्याची वाफ द्या.

लम्पीने बाधित गाभण गाईंची काळजी सर्वाधिक घ्या. कारण लम्पीमुळे गर्भपात होण्याचा धोका असतो. आजारी गाईचे दूध वासरांना सडावाटे देणे टाळा. दूध उकळून थंड करून किंवा दुसऱ्या निरोगी गाईचे दूध बाटलीतून द्यावे. जनावरांच्या गाठी, खपल्या आणि औषधांमध्ये वापरलेले जैविक साहित्य जाळून टाका. पूर्ण बरे झाल्यावरच पशुवैद्यकांच्या सल्ल्याने जनावर समावेश निरोगी जनावरांच्या गोठ्यात करावा.

दक्षता-

लम्पी बाधित जनावरांना लसीकरण करु नये. मृत जनावराची माहिती शासकीय डॉक्टरांना कळवावी. कुठल्याही प्रकारच्या पाण्याच्या स्त्रोतांपासून दूर ८ फूट खोल खड्डा करून चुना टाकून पुरावे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१.लम्पी आजार कसा ओळखायचा?
जनावरांना ताप, सूज, अंगावर गाठी आणि दूध उत्पादनात घट दिसते.

२.लम्पीचा प्रसार कसा होतो?
डास, माशी, गोचिड आणि संसर्गजन्य वस्तूंमुळे लम्पीचा फैलाव होतो.

३. लम्पीवर कोणती लस प्रभावी आहे?
गोवंश जनावरांसाठी प्रतिबंधात्मक लसीकरण प्रभावी ठरते (सरकारी लसी उपलब्ध).

४. बाधित जनावरांना काय खाऊ घालावे?
हिरवा चारा, पेंड, लिव्हर टॉनिक, मिनरल मिक्स आणि प्री/प्रोबायोटिक औषध द्यावे.

५. लम्पीचा धोका टाळण्यासाठी काय करू नये?
जनावरांना एकत्र न ठेवणे, सार्वजनिक पाणी वापरणे आणि गोठ्यात बाहेरच्यांचा प्रवेश टाळावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT