Mathura Labhan Cattle Breed : मराठवाड्यातील देखणा गोवंश ः मथुरा लभाण

Desi Cow : निमुळत्या आकाराच्या चेहऱ्यावर रुंद व सपाट कपाळ आणि जोडीला मध्यम आकाराचे कान, काळेभोर, पाणीदार डोळे मथुरा लभाण गोवंशाला अधिक देखणे करतात.
Mathura Lbhan Cattle Breed
Mathura Lbhan Cattle BreedAgrowon
Published on
Updated on

Indian Indigenous Cattle Breed : जंगलसंपन्न उंचसखल प्रदेश किंवा डोंगरदऱ्यांचे भूप्रदेश शेतीसाठी तुलनेने कमी उपयुक्त ठरतात, अशावेळी स्थानिक आदिवासी आणि रहिवासी आपले लक्ष पशुपालनावर केंद्रित करतात.

फारशी दळणवळणाची साधने पोहोचत नसल्याने अनेकदा अशा भागातील पशुधन जरी दुर्लक्षित राहिले, तरी आंतरपैदाशीने एकसंध राहते आणि इतर देशी पशुधनांशी संकर न झाल्याने आपले स्वतंत्र जनुकीय अस्तित्वदेखील अबाधित राखण्यास यशस्वी ठरते.

नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात देखणा असा ‘मथुरा लभाण’ गोवंश निपजलेला आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांची भौगोलिक सीमा म्हणून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या खोऱ्यात मथुरा लभाण गोवंशाचे पैदास क्षेत्र आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट, हिमायतनगर, भोकर तालुक्यांमध्ये तसेच लगतच्या यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्यामध्ये मथुरा लभाण गोवंश दिसून येतो.

मथुरा लभाण गोवंश हा स्थानिक मथुरा लमाणी/लभानी समुदायाकडे गेल्या दोन शतकांपासून असल्याचे समजते. मथुरा लभाण समाज हा बंजारा समुदायाचा उपघटक असून महाराष्ट्रातील प्रमुख भटके पशुपालक म्हणून सर्वपरिचित आहे.

सोलापूर जिल्ह्यात खिल्लार आणि माळवी गोवंशासह लमाणांची लमाणी (बोलीभाषेत अपभ्रंशाने लभाण किंवा लभाणी) गुरे बाजारपेठेत आणली जात असल्याचे ब्रिटिशकालीन दस्तऐवजात (१८८४) नमूद केले आहे.

Mathura Lbhan Cattle Breed
Desi Cow Breed : खामगाव गोवंश ः विदर्भातील वातावरणास अनुकूल

सुमारे ८ ते १० वेत झालेल्या गाई कळपात दिसून येतात. गाई आटवण्यावर पशुपालकांचा भर नसतो. गोवंश सूर्योदयापूर्वी शेजारच्या जंगलात चराईसाठी एकत्र कळपाने सोडली जातात. सूर्यास्तापूर्वी तांड्यावर परत आणली जातात. उन्हाळ्यामध्ये चारा व पाणी यांच्या अभावामुळे हे गोवंश स्थलांतरित करून जून महिन्यात माघारी आणली जातात.

हिवाळ्यात रानमाळावर गवत फुलोऱ्यावर आले, की दिवाळी नंतर पुन्हा चराईसाठी स्थलांतर केले जाते. दिवाळीत वसुबारसेला मथुरा लभाण पशुपालक आपल्या गाईंना सुंदरपणे सजवतात. पारंपरिक पद्धतीने घरी बनवलेला मोरपिसांचा साज गाईंच्या गळ्यात, शिंगात घालतात.

याप्रसंगी आपल्या कळपातील जनावरांना ओळख म्हणून कमरेजवळ एका बाजूला एकसारख्या खुणा दिल्या जातात. मथुरा लभाण गोवंशाचे शारीरिक गुणधर्म, उत्पादनक्षमता, जनुकीय वेगळेपण शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यासण्याचे काम महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. पंडित नांदेडकर, डॉ. साजिद अली आणि सहकारी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने करत आहे.

उमरडा आणि मथुरा लभाण गोवंशात फरक

नांदेडलगतच्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरडा या बंजारा पशुपालकाकडून संगोपन केले जाणाऱ्या देशी गोवंशाशी मथुरा लभाण गोवंश रंगरूपाने काहीसे साधर्म्य दर्शवीत असले तरी आपापले भिन्न पैदासक्षेत्र राखून आहेत. त्यामुळे उत्क्रांत होताना गतकाळात एकाच गोसमूहापासून काही शतकांपूर्वी वेगवेगळे गोधन निपजले जाण्याची शक्यता आहे.

तथापि, चेहरेपट्टीत उमरडा आणि मथुरा लभाण गोवंशात कमालीचे वेगळेपण दिसून येते. मथुरा लभाण गोवंशाचे पैदासक्षेत्र नदी आणि डोंगररांगा यांमुळे भौगोलिकदृष्ट्या सीमित झालेले आहे.

मथुरा लभाणीचे पारंपरिक पद्धतीने संगोपन करणाऱ्या गोपालकांचा कृत्रिम रेतनापेक्षा नैसर्गिक पद्धतीने फळवण्यावर अधिक कल आहे . त्यामुळे मथुरा लभाणच्या कळपातील वळूद्वारे आंतरपैदाशीने जनुकीय एकसंधता राखली गेली असल्याचे दिसून येते.

Mathura Lbhan Cattle Breed
Umarda Cattle Breed : उष्ण वातावरणात तग धरणारा ‘उमरडा गोवंश’

गाई बहुतांशी पांढऱ्या रंगाच्या असून क्वचितच हलक्या राखाडी रंगामध्ये पाहावयास मिळतात. त्वचा चमकदार व शरीराला घट्ट चिकटलेली असते.

निमुळत्या आकाराच्या चेहऱ्यावर रुंद व सपाट कपाळ आणि जोडीला मध्यम आकाराचे कान, काळेभोर, पाणीदार डोळे मथुरा लभाण गोवंशाला अधिक देखणे करतात.

गाई मध्यम बांध्याच्या असून वरच्या दिशेने झेपावणारी शिंगे पुन्हा आतल्या बाजूने वळलेले असतात. समोरील दोन्ही पायांमधील छातीचा भाग अरुंद असतो. मानेची पोळी मध्यम आकाराची आणि लोंबती असते. शेपटी पायाच्या घोट्यापर्यंत लांब असून शेपटीचा गोंडा काळा व झुपकेदार असतो.

दुभत्या गाईमध्ये शरीरास घट्ट चिकटलेली कास मध्यम आकाराची आणि बोटांसारखे सड असून दुग्धशिरा ठळकपणे दिसते.

गाई साधारणतः दिवसाकाठी १.५ ते २ लिटर दूध देतात. स्थानिक दूध संकलन केंद्रावर रतीब लावण्यावर युवकांचा कल असून घरातील महिला दुधापासून तूप काढण्याचे काम करतात. शुद्ध रुचकर तुपाची चढया भावाने विक्री होते.

बैल प्रामुख्याने शेतीत औत आणि वाहतुकीसाठी वापरले जातात. शेणाचा वापर इंधन म्हणून गोवऱ्या बनवायला केला जातो. उमद्या बैलजोड्यांना बाजारात लाखांच्यावर किंमत मिळते.

डॉ. प्रविण बनकर, ९०६०९८६४२९

(पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवेद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com