Animal Vaccination : निरोगी आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण महत्त्वाचे

Preventive Vaccination : पशुपालन व्यवसायाचे आर्थिक गणित हे जनावरांच्या आरोग्यावर अवलंबून असते. वातावरण बदलामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात. आजाराची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक लसीकरण करणे फायद्याचे ठरते.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon

डॉ. सागर जाधव

----------

Animal Care : विविध आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination ) करणे गरजेचे आहे. जेणेकरून जनावरांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होईल. आणि संभाव्य आर्थिक नुकसान टाळले जाईल.

पशुपालन व्यवसायाचे आर्थिक गणित हे जनावरांच्या आरोग्यावर अवलंबून असते. वातावरण बदलामुळे जनावरे विविध आजारांना बळी पडतात. आजाराची बाधा झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक लसीकरण करणे फायद्याचे ठरते. बदलत्या ऋतुमानानुसार आहार आणि आरोग्य व्यवस्थापन तंत्रात बदल करणे गरजेचे आहे. विविध रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे.

लस म्हणजे जैविक पद्धतीने विशिष्ट आजाराच्या रोगजंतूंपासून किंवा त्याच प्रकारच्या जंतूंच्या पेशींपासून कृत्रिमरीत्या तयार केले जाणारे द्रावण होय. हे द्रावण कृत्रिमरीत्या जनावराला देण्याच्या क्रियेला ‘लसीकरण’ असे म्हणतात. लसीतील जंतूंवर प्रयोगशाळेत काही विशिष्ट प्रक्रिया केलेल्या असतात. यामुळे त्या जंतूंची रोग निर्माण करण्याची क्षमता नाहीशी केली जाते किंवा त्यांना मारले जाते. अशी निरुपद्रवी जंतूंची लस जनावरांना दिल्यानंतर त्या जनावरांमध्ये त्या ठराविक रोगासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते.

Animal Vaccination
Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी करा जनावरांचे लसीकरण

लसीकरणाची गरज   ः
- जेव्हा कोणताही रोगजंतू प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीर त्याला विवध प्रकारे मज्जाव करते. तरीही काही कारणांमुळे जंतू शरीरामध्ये पसरतात. जंतू जेव्हा रक्तामध्ये जातात तेव्हा त्यांना रक्तातील पांढऱ्या पेशी प्रतिरोध करतात. ही शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे.
- शरीरातील अशा काही पांढऱ्या पेशी प्रत्येक वेगळ्या जंतूला अचूक ओळखू शकतात आणि त्याच विशिष्ट जंतूंना प्रतिकार करण्याची पद्धती अवलंबतात. शिवाय एकदा शरीरात घुसलेल्या विशिष्ट रोगाच्या जंतूची कायमस्वरूपी आठवण म्हणजेच मेमरी काही ठराविक कालावधीसाठी या पेशी ठेवत असतात.
- या कालावधीत त्याच रोगाचा जंतू जर दुसऱ्यांदा शरीरात घुसला तर या पेशी अतिशय तत्परतेने त्या आजाराच्या जंतूंचा लगेच खातमा करतात, त्या जंतूला अजिबात वाढ देत नाहीत.
- पांढऱ्या पेशींच्या रोगजंतूंची ओळख ठेवून आठवण ठेवण्याच्या खास वैशिष्ट्यांचा फायदा लसीकरणामध्ये उचलला गेला आहे. म्हणजेच रोग निर्माण करणाऱ्या जंतूंना निष्क्रिय किंवा मृत करून शरीरात टोचायचे जेणेकरून पांढऱ्या पेशी त्या रोगासाठी आधीच तत्पर राहतील. म्हणून एका ठराविक कालावधीनंतर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा पांढऱ्या पेशींना त्या जंतूंचा विसर पडतो आणि रोगजंतू शरीरात वाढून आजार निर्माण करतात.
- बरेचसे रोग आयुष्यात एकदा झाले, की परत होत नाहीत, याचे कारण या पेशींनी ठेवलेली त्या रोगाची आठवण/स्मृती होय. त्या रोगाची स्मृती आयुष्यभर पांढऱ्या पेशी ठेवीत असतात.

Animal Vaccination
Animal Vaccination : नाशिक जिल्ह्यात लाळ खुरकूत लसीकरण मोहीम पुर्ववत

लसीकरणाचा बूस्टर डोस ः
- लसीकरणामध्ये बूस्टर डोस हा शब्ददेखील आपण नेहमीच ऐकतो. बूस्टर म्हणजे काय की एकदा लस दिली की तिचा परिणाम होण्यास साधारण १५ ते २१ दिवसांचा कालावधी लागतो.
- ही पहिली मात्रा तेवढी परिणामकारक नसते; पण हीच लस जर दुसऱ्यांदा पंधरा दिवसांत परत दिली तर मात्र पांढऱ्या पेशी परत दुसऱ्यांदा जागृत होतात आणि दुप्पट क्षमतेने त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि स्मृती कार्यान्वित होते.
- रोग झाल्यावर त्या अधिक जलदगतीने कामाला लागतात. म्हणून प्रथम लसीकरण केल्यानंतर त्याच रोगाच्या लसीची पंधरा दिवसांत दुसरी मात्रा देणे म्हणजेच बूस्टर देणे आवश्यक असते.

लसीकरणापूर्वीचे नियोजन ः
- लसीकरण करण्यापूर्वी किमान एक आठवडा आधी जनावरांना जंतनाशकाची मात्रा द्यावी.
- जनावरांच्या शरीरावरील बाह्य परजीवी (गोचीड, गोमाश्या व पिसवा) यांचे नियंत्रण करावे. जेणेकरून लसीकरणाचा फायदा होईल. तसेच जनावर सक्षम होईल.
- रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी जनावरांना जीवनसत्त्वे व खनिज मिश्रणाचा पुरवठा करावा.

घ्यावयाची काळजी ः
- लसीकरण शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी थंड वेळेत करावे.
- फक्त निरोगी जनावरांनाच लसीकरण करावे.
- आजारी जनावरांना लसीकरण करणे टाळावे.
- यशस्वी लसीकरणासाठी शीत साखळीची योग्य खबरदारी घ्यावी.
- लसीची मात्रा व लस देण्याच्या मार्गदर्शक सूचना या उत्पादन कंपनीच्या सूचनांनुसार कराव्यात. एकदा उघडलेली लसीची बाटली लवकर संपवावी.
- दोन वेगवेगळ्या लसी एकत्र मिसळू नयेत.
- लसीची साठवणूक व वाहतूक ही चांगल्या दर्जाच्या शीतपेट्यांमधून करावी.
- प्रत्येक लसीकरणावेळी नवीन सुई वापरावी किंवा वापरलेल्या सुईचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
- लसीचा स्रोत, बॅच नंबर व वापराची अंतिम तारीख आदी बाबींची नोंद ठेवावी.

लसीकरणाबाबत पशुपालकांमध्ये असणारे संभ्रम ः
- लसीकरण केल्यामुळे काही जनावरांना गाठी येतात. परंतु, गाठी येतात म्हणून लसीकरण न करणे हे जनावरांच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते. लसीकरणानंतर येणारी गाठ ही काही काळापुरतीच राहते. लस दिलेल्या जागी गाठ आल्यास त्याजागी बर्फाने शेकल्यास गाठ जिरून जाते.
- लसीकरण केल्याने जनावरांतील दूध कमी होईल, या भीतीने देखील काही पशुपालक लसीकरण करणे टाळतात. मात्र, लसीकरणानंतर जनावरांना हलकासा ताप व तणाव येऊन काही काळ दूध कमी होऊ शकते. परंतु हे तात्पुरते असून काही काळानंतर दूध उत्पादन पूर्ववत होते.
- गाभण जनावरांमध्ये गर्भपाताच्या भीतीने लसीकरण टाळले जाते. कमकुवत व अशक्त जनावरांमध्ये क्वचित वेळा लसीकरणानंतर गर्भपात होण्याची शक्यता असते. याशिवाय अन्य कारणांमुळेही गर्भपात होण्याची शक्यता असते.


लसीकरण वेळापत्रक ः
अ) गाई, म्हशी ः
रोग---वेळ---प्राथमिक लसीकरणाचे वय---शेरा
फऱ्या---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---दरवर्षी पावसाळ्यापूर्वी
घटसर्प---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---दरवर्षी पावसाळ्यापूर्वी
ॲन्थ्रॅक्स---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---फक्त रोगप्रवण भागात
लाळ्या खुरकूत---मार्च व सप्टेंबर---४ महिने किंवा अधिक वय---वर्षातून २ वेळा
सांसर्गिक गर्भपात---००---४ ते ८ महिने वयोगटातील मादी वासरे---आयुष्यात एकदाच
गोचीडताप लसीकरण---००---३ महिने किंवा अधिक वय---रोगप्रवण भागात ३ वर्षांतून एकदा, आणि इतर भागांत १४ महिन्यातून एकदा
लम्पी त्वचा आजार---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---दरवर्षी

ब) शेळ्या, मेंढ्या ः
रोग---वेळ---प्राथमिक लसीकरणाचे वय---शेरा
आंत्रविषार (इटीव्ही)---मे ते जून आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर---गाभण शेळी किंवा मेंढ्यांना लस दिली असेल तर करडांना ३ महिने किंवा अधिक वय किंवा करडांच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात. त्यानंतर १५ ते २१ दिवसांनी बूस्टर डोस द्यावा.---दरवर्षी
फऱ्या---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---दरवर्षी पावसाळ्यापूर्वी (रोगप्रवण भागात वर्षातून दोन वेळा)
घटसर्प---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---दरवर्षी पावसाळ्यापूर्वी
ॲन्थ्रॅक्स---मे ते जून---३ महिने किंवा अधिक वय---दरवर्षी फक्त रोगप्रवण भागात
पीपीआर---डिसेंबर ते जानेवारी---३ महिने किंवा अधिक वय---३ वर्षातून एकदा
देवी---डिसेंबर---३ महिने किंवा अधिक वय ---दरवर्षी
लाळ्या खुरकूत---मार्च व सप्टेंबर---४ महिने किंवा अधिक वय---वर्षातून २ वेळा
-------------------
लसीकरणाची परिणामकारकता वाढविण्यासाठी ः
- काहीवेळा लसीकरण परिणामकारक होत नाही, त्यालाच ‘व्हॅक्सिनेशन फेल्युर’ असे म्हणतात. तणावाखालील जनावरांमध्ये, आजारात, शारीरिक क्षय झालेल्या अवस्थेत, कमतरतेमध्ये असे होऊ शकते.
- लसीची योग्य मात्रा, त्याची निर्माण कालावधी म्हणजेच वापराची अंतिम तारीख तसेच योग्य साठवण आणि वाहतूक देखभालदेखील तितकीच महत्त्वाची असते.
- लसीची निर्मिती जैविक पदार्थांपासून केली जाते. त्यामुळे त्या सतत थंड जागी आणि किमान तापमानात ठेवणे आवश्यक आहे. नियंत्रित थंड तापमानाची साखळी योग्य राखली न गेल्यास लसीतील जैवजन्य पदार्थांचा नाश होतो आणि लसीकरणाचे अपेक्षित परिणाम मिळत नाही. त्यामुळे लस निर्माण झालेल्या क्षणापासून, स्टॉकीस्टपासून जनावराला देण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बर्फात राहील किंवा निर्देशित तापमानात राहील याची काळजी घेणे आवश्यक असते. यालाच ‘कोल्ड चेन मेन्टेन’ असे म्हणतात.
.................
- डॉ. सागर जाधव, ९००४३६१७८४
(पशुधन विकास अधिकारी, बाचणी, ता. कागल, जि. कोल्हापूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com