Buffalo Farming Agrowon
काळजी पशुधनाची

Buffalo Farming: म्हैसपालनात योग्य नियोजन, व्यवस्थापनावर भर

Buffalo Breeding Business: लातूर जिल्ह्यातील किशन जाधव यांनी काटेकोर नियोजन, अचूक व्यवस्थापन आणि घरपोच विक्री यामुळे दुग्ध व्यवसायात आपला ठसा उमठवला आहे. कमी भांडवलात सुरू झालेला म्हैसपालन व्यवसाय आज त्यांच्यासाठी शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरत आहे.

विकास गाढवे

Livestock Management:

शेतकरी नियोजन । म्हैसपालन

शेतकरी : किसन बळिराम जाधव

गाव : बनसावरगाव, ता. चाकूर, जि. लातूर

एकूण शेती : ५ एकर

एकूण जनावरे : १६ म्हशी, १० वगार, ४ संकरित गाय, १ कालवड

लातूर जिल्ह्यातील बनसावरगाव (ता. चाकूर) येथील किसन जाधव यांची पाच एकर शेती आहे. शेतामध्ये भाजीपाला, ऊस व हंगामी पिकांची लागवड केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून सुरवातीला कुक्कुटपालन केले. मात्र, त्यात अपेक्षित यश न आल्यामुळे म्हैसपालन करण्याचे ठरविले. मागील दीड वर्षापासून म्हैसपालन व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसवला आहे. दोन म्हशींपासून सुरु केलेला व्यवसाय आज दहा म्हशींपर्यंत पोचला आहे. याशिवाय गोठ्यात चार वगार, एक संकरित गाय व एक वासरू अशी एकूण १६ जनावरे आहेत. योग्य नियोजन आणि दैनंदिन व्यवस्थापनात सातत्य राखल्यामुळे दुग्ध व्यवसाय यशस्वी झाल्याचे किसन जाधव सांगतात.

म्हैसपालनास सुरुवात

शेतीला पूरक म्हणून सुरुवातीला कुक्कुटपालन त्यानंतर संकरित गोपालन व्यवसाय केला. मात्र त्यातून दोन्ही व्यवसायात आर्थिक ताळेबंद जुळत नव्हता. त्यामुळे म्हैसपालनाविषयी माहिती घेतली. सुरुवातीला दोन म्हशींची खरेदी करून नव्याने व्यवसायास सुरुवात केली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जनावरांसाठी गोठ्याची उभारणी केली. गावापासून अडीच किमी अंतरावर असलेल्या चाकूर शहरात म्हशीच्या दुधास चांगली मागणी आहे. तिथे मुलगी आणि मुले वास्तव्यास असतात. त्यामुळे दूध विक्रीसाठी ग्राहक सहज जोडले गेले. आता उत्पादित दुधाची चाकूर शहरात नातू प्रशांत आणि महेश आलट यांच्या मदतीने विक्री होते. हळूहळू दुधाची मागणी वाढल्याने गोठ्यातील म्हशीची संख्या वाढवीत व्यवसायाचा विस्तार केला.

व्यवस्थापनातील बाबी

म्हशींचे संगोपन २२ फूट बाय ५५ फुटांच्या बंदिस्त शेडमध्ये केले जाते. दुसरा जनावराचा गोठा १५ बाय ५५ फुटाचा आहे. गुळी व अन्य साहित्यासाठी स्वतंत्र शेड उभारणी केली आहे.

म्हशीसाठी ‘हेड टू हेड’ प्रकारच्या सिमेंटची गव्हाण आहेत. त्यातच खाद्य आणि पाणी पिण्यासाठी सोडले जाते. पाणी पिऊन झाल्यानंतर गव्हाणीच्या तोट्यातून पाणी सोडून गोठा स्वच्छ केला जातो. गव्हाणी वाळल्यानंतर चारा टाकला जातो.

दररोज सकाळी पाच वाजता शेडमधील कामांस सुरुवात होते. सुरुवातीला गोठ्यातील शेण ओढून म्हशींना खुराक ठेवला जातो.

त्यानंतर हाताने दूध काढणी केली जाते. उत्पादित दूध चाकूर येथे खासगी डेअरीला व रतिबावरील ग्राहकांना पाठविले जाते.

गोठ्यातील शेणाची खड्ड्यामध्ये साठवणूक केली जाते. दरवर्षी साधारण २० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. दरवर्षी शेणखताची विक्री केली जाते. यावर्षी सर्व खत ऊस पिकामध्ये वापरले जाणार आहे.

चारा, पाणी व्यवस्थापन

दर्जेदार दूध उत्पादन मिळविण्यासाठी खाद्य व्यवस्थापनावर विशेष भर दिला जातो. आहारात ओला व सुक्या चाऱ्याचा योग्य प्रमाणात समावेश केला जातो. यात पन्नास टक्के ओला व पन्नास टक्के सुका चारा दिला जातो.

दररोज सकाळी म्हशींना घास व सायंकाळी गुळी दिले जाते. संपूर्ण चारा कुट्टी करूनच दिला जातो. यासोबत पशुखाद्य व मळी दिली जाते.

गोठ्यात म्हशींना पिण्यासाठी स्वच्छ आणि पुरेसे पाणी उपलब्ध केले जाते. त्यासाठी शेडच्या बाजूला उंचावर १ हजार लिटर क्षमतेचे दोन बॅरल ठेवले आहेत. तेथून नळाद्वारे पाणी गव्हाणीत सोडले जाते.

दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी २० गुंठे क्षेत्रात घास गवत, दहा गुंठ्यात मका पिकाची लागवड केली आहे. या माध्यमातून वर्षभर ओला चारा उपलब्ध होतो.

गोठ्यामध्येच दर्जेदार चारा आणि खाद्य उपलब्ध केल्यामुळे म्हशी बाहेर चरायला सोडल्या जात नाहीत.

दररोज म्हशींना स्वच्छ पाण्याने अंघोळ घातली जाते. शिवाय गोठा आणि म्हशींची नियमित स्वच्छता केली जाते.

आरोग्य व्यवस्थापन

दुग्ध व्यवसाय यशस्वी होण्यासाठी जनावरांचे आरोग्य उत्तम राहणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी पशुसंवर्धन अधिकारी व खासगी पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार म्हशींना वेळोवेळी लसीकरण केले जाते. गोठा स्वच्छतेवर भर दिला जातो. नियमित स्वच्छतेमुळे म्हशींना रोगाची लागण होत नाही, असा जाधव यांचा अनुभव आहे.

दूध काढताना म्हशीची लक्षणे थोडी जरी वेगळी दिसून आल्यास, त्वरित पशुवैद्यकांना माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार योग्य उपचार केले जातात. जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विविध साथीच्या आजारांचे प्रतिबंधात्मक लसीकरण केले जाते. जंतनाशकाच्या नियमित मात्रा दिल्या जातात.

दूध उत्पादन व विक्री

प्रतिदिन गोठ्यातून सुमारे चाळीस लिटरपर्यंत दूध उत्पादन मिळते. उत्पादित दुधाची चाकूर येथील खासगी डेअरीला विक्री केली जाते. तसेच नातवांकडून दुचाकीवरून ग्राहकांना घरोघरी दूध विक्री केली जाते. घरपोच विक्रीमुळे चांगले दर मिळण्यास मदत होते. येत्या काळात म्हशीची संख्या वाढवीत दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी चारा पिकांच्या लागवडीचे क्षेत्रही वाढवणार असल्याचे किशन जाधव यांनी सांगितले.

- किशन जाधव, ७५१७५७४२०१

(शब्दांकन : विकास गाढवे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

Rainfall Deficit : पावसाची तूट; दुष्काळाचे सावट गडद

New Municipal Corporations: पुण्यात तीन नवीन महानगरपालिकांची गरज; अजित पवार

SCROLL FOR NEXT