डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. प्राजक्ता देठे
Animal Husbandry: तिवा हा गाई, म्हशींमध्ये होणारा महत्वाचा आजार आहे. आजारामुळे तापामध्ये चढ-उतार होतो, स्नायूंमध्ये थरथर तसेच कडकपणा, लंगडणे व लसिका गाठी सुजणे इत्यादी प्रमुख लक्षणे आढळतात. वासरांमध्ये या आजाराचा प्रसार होण्याचे प्रमाण कमी असते. सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या वासरांमध्ये आजाराची कोणतेही लक्षण दिसत नाही.
धष्टपुष्ट जनावरांमध्ये तीव्र स्वरूपाची लक्षणे आढळतात. गाईपेक्षा बैलामध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. अधिक दूध देणाऱ्या गाईंमध्ये हा आजार जास्त प्रमाणात दिसतो. रॅबडोवायरस कुळातील ऐफिमिरो या विषाणूमुळे हा आजार होतो.
प्रसार
विषाणूचा प्रसार प्रामुख्याने कुलिक्वायडस प्रजातीच्या चावणाऱ्या माशा तसेच डासांमुळे होतो.
पावसाळा, हिवाळा किंवा वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलामुळे माशांचा प्रादुर्भाव वाढतो.
आजाराचा प्रसार वातावरण आणि माशांचा प्रादुर्भाव यावर अवलंबून असतो. आजाराचा प्रादुर्भाव गावातील एका जनावरास झाल्यास त्याचा प्रसार माश्या, डासांमार्फत होतो. त्यामुळे अचानक हा आजार इतर ठिकाणी पसरतो.
लक्षणे
जनावरे आजाराची लक्षणे साधारणपणे तीन दिवस दाखवतात, त्यानंतर आपोपाप बरी होतात.
आजारात आपोआप बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी निश्चित निदान करून लक्षणांची तीव्रता कमी करणे, आजारातून लवकर बरे होणे आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी औषधोपचार आवश्यक आहे.
जनावरांना अचानक सडकून ताप येतो.अशक्तपणा वाढतो
श्वासोच्छ्वासाचा दर वाढतो, श्वास घेण्यास त्रास होतो.
श्लेष्म किंवा पुमिश्रित अनुनासिक स्राव.
स्नायूंमध्ये थरथर तसेच कडकपणा. जनावर लंगडते. लसिका गाठी सुजतात.
रवंथ करणे पूर्णपणे थांबते. अतिसार किंवा बद्धकोष्ठता होते.
दूध उत्पादनात लक्षणीय घट होते.
काही जनावांमध्ये पक्षाघाताचीही लक्षणे आढळतात. उदा. चेहऱ्याचा अर्धांगवायू किंवा पक्षाघात. यामध्ये चेहऱ्याच्या एका किंवा दोन्ही बाजूंच्या स्नायूंना हालचाल करणे कठीण किंवा अशक्य होते.
प्रतिबंध
जैवसुरक्षा व लसीकरणामुळे व इतर उपयांनी या आजारास प्रतिबंध करता येतो. वासरांना योग्य प्रमाणात चीक पाजणे योग्य ठरते.
भारतामध्ये या आजाराच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नसल्याने इतर प्रतिबंधात्मक उपाय खूप महत्त्वाचे आहेत.
माश्या, डासांचा प्रादुर्भाव कमी करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी गोठा नेहमी कोरडा ठेवावा. गोठा आणि आजूबाजूच्या परिसरात डबके किंवा पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
माश्या, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गोठ्यामध्ये वेळोवेळी फवारणी करावी किंवा चावणाऱ्या माश्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एकात्मिक माशी व्यवस्थापन कार्यक्रमही राबवला जाऊ शकतो.
आजारी जनावरास ताबडतोब उपचार करून घ्यावेत.
उपचार
तिवा आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, पण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविके, सलाइन, कॅल्शिअम, ब जीवनसत्त्व, ताप निवारक आणि वेदनाशामक औषधे दिली जातात.
आजारात आपोआप बरे होण्याचे प्रमाण जास्त असले तरी निश्चित निदान करून लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी, आजारातून लवकर बरे होण्यासाठी आणि पुढील गुंतागुंत टाळण्यासाठी औषधोपचार करणे आवश्यक असते.
- डॉ. विठ्ठल धायगुडे, ९८६०५३४४८२
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.