Animal Care Agrowon
काळजी पशुधनाची

Antibiotic Use : पशू,पक्षांमध्ये प्रतिजैविकाचा वापर, प्रतिरोध अन् मानवी आरोग्य

Antibiotic Use in Livestock : प्रतिजैवकाच्या अनियंत्रित वापरामुळे अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स ही समस्या निर्माण झाली आहे. हे समजून घेण्यासाठी प्रतिजैविक कसे काम करते, जिवाणूंवर त्यांचा काय परिणाम होतो, प्रतिजैविक-प्रतिरोध कसा निर्माण होतो, हे माहिती असणे आवश्यक आहे.

Team Agrowon

डॉ.शीतलकुमार मुकणे,डॉ. सुनील लहाने

Livestock Management : प्रतिजैवकाच्या अनियंत्रित वापरामुळे अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स ही समस्या निर्माण झाली आहे. हे समजून घेण्यासाठी प्रतिजैविक कसे काम करते, जिवाणूंवर त्यांचा काय परिणाम होतो, प्रतिजैविक-प्रतिरोध कसा निर्माण होतो, हे माहिती असणे आवश्यक आहे.

सध्या अनेक गोठ्यांमध्ये असा अनुभव येत आहे की, जनावरास संसर्गजन्य आजार होतो. परंतु एका प्रतिजैवकाला त्याचा आजार दाद देत नाही. त्यामुळे मग दुसरे प्रतिजैविक वापरून पाहिले जाते, पण तेही लागू पडत पडत नसल्याचे दिसून येते. पुढे हा आजार वाढत जातो. काही वेळा तिसरे प्रतिजैविक लागू पडते. पण तोपर्यंत जनावराची शारीरिक शक्ती संपलेली असते. त्यामुळे आजार बरा झाला तरी खाली बसलेले जनावरे पुन्हा उठून बसू शकत नाहीत आणि नंतर मृत्युमुखी पडते. परंतु कुठलेच प्रतिजैविक जर लागू पडले नाही तर मग मात्र कठीण प्रसंग येतो. आपण सगळे जर वेळीच जागरूक झालो नाही, तर असे अनुभव यापुढे वारंवार येऊ लागतात. अशाच प्रकारचे अनुभव मानवांमध्येही दिसून येत असल्याचे डॉक्टर सांगतात.

१९२८ मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने सर्वांत प्रथम पेनिसिलीन या प्रतिजैवकाचा शोध लावला. त्यामुळे, मानव आणि पशू-पक्षांना जिवाणूंमुळे होणाऱ्या बऱ्याचशा आजारापासून बरे होण्यास मदत मिळाली. पुढे अनेक प्रतिजैवकांच्या उपलब्धतेमुळे सगळ्या प्रकारचे संसर्गजन्य आजार सहज नियंत्रणात येऊ लागले. परंतु, नंतरच्या काळात याचा एक परिणाम असाही झाला की, प्रतिजैवकांचा अनिर्बंध वापर सुरु झाला. छोट्या-छोट्या आजारांकरिता मानवास व पशू-पक्षांना सर्रास प्रतिजैविके देण्यास सुरवात झाली. प्रतिजैवकांच्या अति तसेच अनावश्यक वापरामुळे प्रतिजैवकांच्या विरोधात सूक्ष्मजंतूंमध्ये प्रतिकारशक्ती होत गेली त्यांची परिणामकारकता कमी होऊ लागली. यालाच “ड्रग रेझिस्टन्स” म्हणतात. बरेच जिवाणू प्रतिजैविकांना दाद देईनासे झाल्याचे दिसून येऊ लागले. त्यामुळे आजारी पडल्यानंतर पशू-पक्षी एका प्रतिजैवकाला दाद देत नाहीत. मग दुसरे प्रतिजैविक वापरून पाहिले जाऊ लागले, ते पण लागू पडत नाही आणि आजार बळावतो असेही दिसून येऊ लागले. अशातच काही पशू-पक्षी या आजारांना बळी पडू लागले आहेत, यालाच मल्टी ड्रग रेझिस्टन्स असे म्हणतात.

प्रतिजैवकांची परिणामकारकता ः
१) जी औषधे जिवाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यावर आजार बरा करण्यासाठी वापरली जातात, त्यांना प्रतिजैवक (अँटिबायोटिक्स) म्हणतात. जी औषधे जिवाणू, विषाणू, बुरशी, परजीविजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाल्यावर आजार बरा करण्यासाठी वापरली जातात, त्यांना अँटिमायक्रोबियल्स म्हणतात. दोन्ही प्रकारची औषधे ही वैद्यकीय सल्ल्यातून घेतली जाणे अपेक्षित आहे. परंतु, तसे न केल्याने प्रतिजैवकांची परिणामकारकता कमी होऊन बरेच जिवाणू प्रतिजैवकांना दाद देईनासे झाले आहेत. यालाच अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स असे म्हटले जाते.
२) आज जगभरात अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स ही एक अत्यंत महत्त्वाची समस्या बनली आहे. यावर तातडीने उपाय योजना आवश्यक आहे.

पशू,पक्ष्यांमध्ये ‘अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स' वाढण्याची कारणे :
१) पशू वैद्यकीय सल्ल्याशिवाय उपचार.
२) अँटिमायक्रोबियल्सचा सर्रास वापर.
३) अँटिबायोटिक्स आवश्यक मात्रेप्रमाणे न देता कमी किंवा जास्त प्रमाण.
४) कारण नसताना जास्त काळासाठी प्रतिजैवकांचा उपयोग.
५) आजाराचे निदान न करता तसेच आवश्यक नसताना प्रतिजैवक
देणे.
६) मुदतबाह्य किंवा उरलेल्या प्रतिजैवकांची योग्य विल्हेवाट न लावता फेकून देणे.
७) पशू,पक्ष्यांमध्ये वाढ होण्यासाठी वाढीस प्रेरक म्हणून अँटिबायोटिक्सचा वापर.
८) आजाराचे योग्य निदान न करता एकाच उपचार पद्धतीचा अवलंब.
९) पशुखाद्य घटकांच्या साठवणीकरिता अँटिबायोटिक्सचा वापर.
१०) प्रतिरोध आणि होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल अत्यल्प जनजागृती.

गोठ्यामध्ये ‘अँटिमायक्रोबियल' प्रतिरोध कमी करण्यासाठी उपाययोजना :
१) प्रतिजैविक पशुतज्ज्ञाच्या सल्ल्याने वापरावीत.
२) पशुतज्ज्ञाच्या दिलेली औषधे ठरवून दिलेल्या मात्रेत वापरावीत.
३) उरलेल्या/खराब झालेल्या औषधांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी.
४) जनावरांच्या मलमूत्राची योग्यरीत्या विल्हेवाट लावावी. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत प्रतिरोधी जिवाणूंपासून दूषित होणार नाहीत.
५) प्रक्षेत्रावर स्वच्छतेनंतर निर्जंतुकीकरण करावे.
६) जनावरांच्या खाद्यात अँटिबायोटिक्सचा वापर वाढीस प्रेरक म्हणून करू नये.
७) दुभत्या जनावरांमध्ये प्रतिजैवकाचा उपचार सुरू असेल, तर औषध दिल्यानंतर कमीत कमी ७२ तास दुधाचा वापर करू नये.

‘अँटिमायक्रोबियल' प्रतिरोध कमी करण्यासाठी उपाय :
१) जनसंपर्क मोहीम, संशोधनाच्या माध्यमातून जागरूकता वाढविणे.
२) प्रक्षेत्रावर व्यैयक्तिक स्वच्छता ठेवावी, जेणेकरून आजाराचा संसर्ग होणार नाही.
३) अँटिमायक्रोबियल्सचा नियंत्रित वापर करावा.
४) नवीन औषधांवर संशोधन, आजारांचे निदान आणि लसीकरणावर भर द्यावा.
५) आरोग्य विभाग व पशू संवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे.

मानवी आरोग्यावरील परिणाम :
१) अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स (AMR) हा पशुपक्षांमधून मानवामध्ये पसरू शकतो असे जगभरातील संशोधनातून सिद्ध झाले आहे. पशुजन्य खाद्यपदार्थांमधून पसरत असलेला प्रतिजैवकाचे अंश हे यासाठीचे प्रमुख कारण असू शकते. उपचार सुरू असलेल्या आजारी जनावरांचे दूध/मांस प्रतिजैवक औषध दिल्यानंतर कमीत कमी ७२ तास सेवनासाठी वापरू नये, असा सर्वसाधारण मानक असला तरीही तसे होत नसल्याने ‘अँटिमायक्रोबियल रेसिस्टन्स' मानवामध्ये पसरू शकतो.
२) जनावर आणि मानवीय आजारांमध्ये वापरण्यात येणारे बहुतांश अँटिबायोटिक्स आणि अँटिमायक्रोबियल्स हे सारखे असून ते रुग्णांच्या वजनानुसार वापरले जात असल्याने फक्त वापरण्याचे प्रमाण भिन्न आहे. म्हणूनच जनावरांवर केले जाणारे उपचार अत्यंत बारकाईने आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून करावेत. हे लक्षात ठेऊन पशुपालकांनी कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या मनाने पशू-पक्षांवर उपचार करू नयेत, त्यांना सर्रास प्रतिजैविके देऊ नयेत.
३) पशूतज्ज्ञ जनावरांना उपचार करताना प्रतिजैवक तज्ज्ञ देत नसतील तर आपण ती त्यांना द्यायला लावू नयेत. औषध दुकानातून स्वत:च विकत घेऊन वापरू नयेत. औषध दुकानदारांनी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय प्रतिजैविक विकू नयेत. याद्वारेच या समस्येवर खात्रीशीर उपाय होऊ शकतो.

जागतिक पातळीवर समन्वय ः
१) जागतिक आरोग्य संघटना, जागतिक प्राणी आरोग्य संघटना आणि जागतिक अन्न आणि कृषी संघटना यांनी प्रतिजैविकांचा उपयोग आणि त्यांच्या वाढत्या प्रतिरोधाबद्दल एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. ‘वन हेल्थ' या संकल्पनेत सुद्धा या बाबतीत ठोस पावले उचलण्यात येत आहेत. यासाठी ‘त्रिपक्षीय करार' झाला आहे.
२) जागतिक आरोग्य संघटनेनुसार प्रतिजैवकांच्या अयोग्य वापरावर वेळीच निर्बंध घातले नाहीत तर पुढील काही वर्षात जिवाणूंच्या संसर्गाने झालेल्या आजारांनी मरणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढू शकते. कारण जिवाणू प्रतिजैवकांना दाद देईनासे होत आहेत. प्रतिजैविक निष्प्रभ झाल्यामुळे उपचार करणे अवघड होईल.
-----------------------------------------------------------
संपर्क ः डॉ. सुनील लहाने, ८२७५३१९४६५
(लेखक पशुसंवर्धन विभागात सहाय्यक आयुक्त पदावर विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, पुणे येथे कार्यरत आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Advisory : कृषी सल्ला : राहुरी विभाग

Assembly Election Kolhapur : कोल्हापुरातील ८ साखर कारखानदारांनी भरला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षितता

Agricultural Issues : निसर्गाच्या परीक्षेची तयारी करा नीट

Cotton Export : निर्यातीचा पकडा ‘धागा’

SCROLL FOR NEXT