
Paddy Crop : भात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी येण्याच्या अनेक कारणांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अभाव होय. अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना फक्त पिकांची अन्नद्रव्यांची गरज भागवण्याइतपत मर्यादित विचार न करता जमिनीची सुपीकता टिकवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. भात पिकामध्ये नत्र स्थिरीकरणासाठी अॅझोलाचा वापर केला जातो. अॅझोला ही नेचेवर्गीय पाणवनस्पती असून, हवेतील नत्र स्वत:मध्ये साठवून ठेवते.
ही वनस्पती नत्र स्थिर करणाऱ्या निळ्या-हिरव्या शेवाळाच्या सहाय्याने नत्र स्थिर करते. भात शेतीमध्ये पाण्यामध्ये अॅझोल्याची वाढ चांगल्या प्रकारे होऊ शकते. सर्वसाधारणपणे भाताच्या एका हंगामात अॅझोलाची पाच पिके घेतल्यास हेक्टरी एकूण १२० किलो नत्र स्थिर केला जातो. हेक्टरी २५ ते ३० किलो नत्राची बचत होते. भातशेतीमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे अनेकवेळा अॅझेटोबॅक्टर योग्यरीत्या काम करू शकत नाही. अशा ठिकाणी अझोला नत्र स्थिरीकरणाचे कार्य उत्तम करते.
भात शेतामध्ये अॅझोलाचा वापर कसा करावा?
चिखलण पद्धत : या पद्धतीमध्ये अॅझोला कायमस्वरुपी तळ्यात किंवा डबक्यात वाढवून साठवून ठेवतात. भाताची पुनर्लागवड केल्यानंतर दोन दिवसांत सर्व शेतभर पसरतो. तो चिखलण पद्धतीने किंवा माणसांच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकतात. त्या जमिनीत पुन्हा पाणी साठवल्यास अॅझोला वाढतो. अशा प्रकारे अॅझोल्याचा भात शेतीमध्ये उपयोग होतो. अॅझोला हिरवळीचे खत म्हणून वापरल्यास हेक्टरी १० टन लागतो. शेतात अॅझोलाची वाढ केल्यास हेक्टरी १ टन पुरेसा होतो.
नांगरण पद्धत : या पद्धतीमध्ये शेतात अॅझोला भरपूर वाढवल्यानंतर त्यातील पाणी सोडून देतात. त्यामधील अॅझोला जमिनीवर बसल्यानंतर नांगरट करतात. शेतात पाणी पुन्हा अडवून धरतात. त्यामुळे आणखी अॅझोल्याची वाढ होते. तो अॅझोला नांगरट करून जमिनीत गाडतात, नंतर नेहमीप्रमाणे भाताची लागवड करतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.