Farmer Literature Agrowon
ॲग्रो गाईड

Farmers Literature : शेतकऱ्यांचे साहित्य का नाही?

कृषिजीवन ही आदर्श जीवनपद्धती आहे. कृषी ही संस्कृती आहे. ती सर्वश्रेष्ठ आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला.

अमर हबीब

शेतीचा शोध (Agriculture) लागण्यापूर्वी माणसाला फक्त अन्नाची (Food Need) भ्रांत होती. रानावनांत भटकायचे. कंदमुळे शोधायची, शिकार (Hunting) करायची आणि भूक (Hunger) भागवायची, यात तो व्यग्र असे. शेतीचा शोध (Agriculture Invention) लागला.

अन्नाची भ्रांत मिटली. मानवी जीवनाला (Human Life) स्थैर्य प्राप्त झाले. शेतीच्या शोधामुळे मानवजातीची जगण्याची पद्धत बदलून गेली.

रानावनांत भटकणारी माणसे वसाहती करू लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकांशी देवणघेवाण सुरू झाली.

या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आले. अन्नाची भ्रांत मिटल्यानंतरच भाषा, साहित्य, कला आदींच्या विकासाला चालना मिळाली.

सर्व कला व साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारे अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळले तर कोणत्याच प्रकारचे साहित्य निर्माण होऊ शकत नाही.

शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे बहुतांश साहित्याची निर्मिती करू शकलात.

याविषयी साहित्यिकांनी शेतकऱ्यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता तो ठेवला नाही. उलट, ‘राबणे त्याचा धर्म आहे व त्याने पिकविलेले फुकट खाणे आमचा अधिकार आहे,’ अशी समजूत करून घेतली.

साहित्यिकांनी शेतकऱ्यांशी नाळ जोडण्याऐवजी शेतकऱ्यांना लुटणाऱ्या राजेरजवाड्यांत वावरणे पसंत केले.

राजे आणि त्यांच्या दरबाऱ्यांना रिझविण्यासाठी आपली सारी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनशीलतादेखील कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिले की लक्षात येते.

साहित्यात शेतकऱ्यांचे जे चित्रण आले आहे, ते ढोबळ मानाने तीन गटांत विभागता येईल.

1) कृषी जीवनाचे उदात्तीकरण करणारे

2) शेतकऱ्यांचे विदूषकीकरण करणारे आणि

3) शेतकऱ्यांना खलनायक म्हणून रेखाटणारे.

कृषिजीवन ही आदर्श जीवनपद्धती आहे. कृषी ही संस्कृती आहे. ती सर्वश्रेष्ठ आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्गवर्णने केली.

‘जोंधळ्याला लटकलेले चांदणे’ दिसणे काय किंवा ‘हिरवे सपान पाहणे’ काय सारखेच. शेतकऱ्यांचे दु:ख या वर्गाला उमगले नाही.

या वर्गातील साहित्यिकांनी केलेले चित्रण कैद्याने तुरुंगाचे बहारदार वर्णन करावे, तसे हास्यास्पद झाले आहे. एखादा कैदी म्हणाला, ‘‘पाहा त्या उंच भिंती, आकाशाला भिडणारे मनोरे, बलदंड गज, साखळदंड गजालाही वाकविता न येणारे.

घोर अंधार, खोलीतील एकांत कोण्या साधूला ना मिळे, आमचे जेवण असे, राजाच्याही नशिबी नसणारे.’’ वगैरे. ही जशी आत्मवंचना आहे तशीच ग्रामीण जीवनाविषयी करण्यात आली.

अनिच्छेने शेती करावी लागणे म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिच्छेने शेती करतात; इलाज नाही म्हणून करतात. ‘आदर्श जीवनशैली’ वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करीत राहिलो.

स्वामीनाथन समितीने ‘‘40 टक्के लोक नाइलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील.’’ असा निष्कर्ष काढला आहे.

कृषिजीवनाचे उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकऱ्यांना शेतीत नादावून ठेवण्याचे पाप केले आहे. मी त्यांना म्हणालो, ‘‘कृषिजीवनाचे तुम्ही एवढे उदात्तीकरण करता, तर तुम्ही शेती का करीत नाही?’’ तर ते पळ काढतात!

कृषी ही जीवनशैली मानली की, ती परवडते का नाही, हे पाहता येत नाही. शेती हा एक व्यवसाय आहे, असे मानले तरच ती परवडते का नाही, हे पाहता येईल.

शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केलेले उदात्तीकरण हे एक कारण मानावे लागेल.

सवर्णांनी शेतकऱ्याला शूद्र मानले. चतुवर्णांत शेतकऱ्यांचे स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय असे नाही. मातीशी ज्यांचा संबंध येतो, ते सगळे शूद्र. या नात्याने शेतकरी शूद्र ठरले.

महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा असूड’ मध्ये या बाबत स्पष्टीकरण केले आहे. शेतकऱ्याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले.

अनेक कादंबऱ्यांमध्ये शेतकरी हे एक विनोदी पात्र बनविले आहे. हे सर्व साहित्य शेतकऱ्यांना एके काळी शूद्र मानणाऱ्या सवर्ण लेखकांनी लिहिले आहे.

सवर्णांनी शेतकरी विदूषक रंगविला तसे डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगविला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो व तेथे दिसेल त्या सुंदर मुलीवर बलात्कार करतो, अशी वर्णने डाव्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अनेक लेखकांनी केली आहेत.

शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचे चित्र रंगविताना भडकपणे त्याला खलनायक रंगविले.

म. जोतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई आदी काही सन्मानीय अपवाद वगळले तर शेतकऱ्यांचे वास्तव चित्र अभावानेच रेखाटले गेले.

आजचे ग्रामीण लेखक नोकरदार आहेत. ते आज शेतकरी नाहीत. दलित साहित्य व ग्रामीण साहित्य यांच्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे.

शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडले, व्यवसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही.

काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातून आलेला प्राध्यापक आणि दलित जातीतून आलेला प्राध्यापक यांमध्ये जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो.

जात जाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतरजातीय विवाह केला तरी काही पिढ्यांनंतर फरक पडतो.

मात्र एका आर्थिक गटातून दुसऱ्या आर्थिक गटात स्थलांतर करणाऱ्यांच्या हितसंबंधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात.

(बीड जिल्ह्यातील, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे संपादित अध्यक्षीय भाषण.)

सौजन्यः साप्ताहिक साधना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीत ८ निर्णयांना मान्यता; राज्यात १० उमेद मॉल उभारण्यात येणार

Manikrao Kokate : कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तूर्तास टळला?

Crop Insurance : मराठवाड्यात केवळ १२ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Agricultural Scheme: शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टरसह कृषी अवजारांसाठी सरकारकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान

Soybean Pest Control : सोयाबीन पिकावरील चक्रीभुंग्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT