Grape Vine Yard Management Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Crop Management : कोरड्या वातावरणातील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Team Agrowon

डॉ. आर. जी सोमकुंवर

Grape Crop : गेल्या आठवड्यातील द्राक्ष बागेतील वातावरणाचा आढावा घेता बऱ्याच ठिकाणी पाऊस नसल्याचेच चित्र दिसून येते. या वेळी तापमानात अपेक्षेपेक्षा जास्त वाढ होत असून, आर्द्रताही कमी होत आहे. हवामानाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यातही पाऊस नसल्याचे बोलले जाते. या वातावरणाचा द्राक्ष बागेमध्ये नेमका कसा परिणाम होईल, याविषयी माहिती घेऊ.

१) फुटीची वाढ नियंत्रणात राहील
या वेळी वातावरणात आर्द्रता कमी असल्यामुळे निश्‍चितच वेलीमधील अंतर्गत जिबरेलिन्सचे प्रमाण कमी राहील, त्या तुलनेमध्ये सायटोकायनीन जास्त राहील. म्हणजेच या परिस्थितीत कोणत्याही अवस्थेतील द्राक्ष वेलीची वाढ नियंत्रणात राहील. या वेळी ढगाळ वातावरणसुद्धा कमी असल्यामुळे तापमानामध्ये पाहिजे तशी घट होत नाही, त्यामुळेच शेंडा वाढ दिसणार नाही. व बगलफुटीही मुळीच वाढणार नाहीत. काडी परिपक्वतेच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या द्राक्ष बागेत ही परिस्थिती अनुकूल असेल. तेव्हा काडीची परिपक्वता व्यवस्थितरीत्या होईल. भारी जमीन असलेल्या बागेत हलक्या जमिनीच्या तुलनेमध्ये पाणी थोडेफार जास्त असेल. त्यामुळे या बागेत थोड्याफार प्रमाणात शेंडा वाढ होताना दिसून येईल. परंतु या बागेत थोड्याफार प्रमाणात पालाशची फवारणी व जमिनीतून उपलब्धता केल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील.

काडी परिपक्व झालेल्या बागेत फळछाटणी घेण्याचा कालावधी जवळ आलेला असल्यास काडी परिपक्व झाली किंवा नाही, याची खात्री करून घेणे गरजेचे असेल. परिपक्व काडीमधील पीथ हा पूर्णपणे तपकिरी रंगाचा असल्यास काडी परिपक्व झालेली आहे व कोणत्याही क्षणी फळछाटणी घेता येईल, असा त्याचा अर्थ होतो. ज्या बागेत एक आठवड्यानंतर फळछाटणीची पूर्वतयारीला सुरुवात होईल, अशा ठिकाणी शेंडा वाढलेला दिसून आल्यास (सहा ते सात पाने) या वेळी फुटी काढण्याची घाई करू नये, त्यापेक्षा पालाश ५ ग्रॅम प्रति लिटर व त्यासोबत एक टक्का बोर्डो मिश्रणाची एक फवारणी करून घ्यावी. पालाश फवारणीमुळे वाढ नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. बोर्डो मिश्रणामुळे शेंड्याकडील कोवळ्या फुटींवर स्कॉर्चिंग येईल, असे झाल्यास शेंड्याकडील वाढ थांबेल. यामुळे मजुराच्या खर्चात बचत होईल. मात्र ज्या बागेमध्ये फळछाटणीला एक महिना उशीर आहे, अशा ठिकाणी शेंड्याकडील फुटी काढून टाकणे फायद्याचे राहील.

हलक्या जमिनीमध्ये कोरड्या वातावरणात फुटींची वाढ जोमात होताना दिसणार नाही. अशा ठिकाणी काडी बऱ्यापैकी परिपक्व झालेली असावी. जिथे एक आठवड्यापूर्वीपासून कोरडे वातावरण होते, तिथे १४ ते १५ व्या डोळ्यापर्यंत काडी परिपक्व झालेली असेल. अशा बागेत पालाशचा वापर करण्याची गरज नाही. रोगनियंत्रणासाठी एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी अवश्य घ्यावी.

२) काडीची परिपक्वता अनियमित असणे
बऱ्याच बागेत खरडछाटणीच्या नंतर सूक्ष्मघड निर्मितीचा कालावधीमध्ये नत्र बंद करून पाणी कमी केले जाते. या वेळी पाण्याचा ताण दिल्यास सूक्ष्मघड निर्मिती चांगली व्हावी, हा उद्देश असतो. आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या द्राक्षजातीनुसार वाढीचा कमी अधिक असतो. जमिनीचे प्रकारही वेगवेगळे असल्यामुळे (हलकी, मध्यम आणि भारी) पाणी धरून ठेवण्याची क्षमताही कमी अधिक असते. यामुळे वेलीला नेमका ताण किती द्यायचा, याचे गणित आपल्याकडे नसते. साधारण परिस्थितीमध्ये पाण्याचा ताण देतो, त्या वेळी फुटींची वाढ नियंत्रणात राहते. जमिनीत दिलेल्या पाण्यानुसार बगलफुटी कमी अधिक प्रमाणात निघतात. मात्र वेलीला पाण्याचा ताण जास्त बसल्यामुळे काडीच्या परिपक्वतेमध्ये अनियमितता दिसून येईल. काडी परिपक्वतेच्या कालावधीत साधारण जून, जुलै महिन्यांमध्ये झालेल्या पावसामुळे वेलीमध्ये वेगळे काही बदल दिसून येतात. या वेळी एक वेगळ्या प्रकारचा दाब वेलीवर निर्माण होतो, कॅनॉपीमध्ये वरील बाजूस पानांच्या वाट्या झालेल्या दिसून येतात. काही पानांवर स्कॉर्चिंगची स्थितीही दिसून येईल. काडीची परिपक्वता पाहता एक पेरा परिपक्व होऊन पुढील पेरा हिरवा दिसतो व पुन्हा त्यानंतर पेरा परिपक्व झालेला दिसतो. किंवा काही परिस्थितीत पेरा परिपक्व होताना दिसून येतो. ही स्थिती मुख्यतः वेलीमध्ये बोट्रिडिप्लोडियामुळे दिसून येईल. या वेळी यासाठी फार काही करता येत नसले तरी वेलीला ताण बसणार नाही, यासाठी उपाययोजना महत्त्वाच्या ठरू शकतात.

-जमीन नेहमी वाफशात राहील, अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करावे.
- ज्या बागेत काडी अपरिपक्व असून, परिपक्वतेला नुकतीच सुरुवात झालेली आहे, अशा ठिकाणी बोर्डो मिश्रण किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशकाची फवारणी किंवा ड्रेचिंग फायद्याचे ठरेल.
- या बागेत वाढ एकदम नियंत्रणात न ठेवता दोन ते तीन पाने पुन्हा वाढतील, अशा हिशेबाने नत्रयुक्त खतांचा वापर कमी प्रमाणात पण एक ते दोन वेळा करता येईल. उदा. युरिया अर्धा ते पाऊस किलो प्रति एकर प्रमाणे ठिबकद्वारे एक किंवा दोन दिवसाआड दिल्यास वेलीची वाढ थोडीफार होऊन वेलीवर ताण थोडा कमी होईल.
- ताम्रयुक्त बुरशीनाशक किंवा ट्राय अझोल गटातील बुरशीनाशक (उदा. प्रोपीकोनॅझोल) दीड ते दोन मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

३) लवकर छाटणी झालेली बाग
काळ्या द्राक्षजातीखालील बागेमध्ये फळछाटणी लवकर घेतली जाते. जिथे फळछाटणी झालेली आहे, तिथे घड प्री ब्लूम अवस्थेत आहे. अशा बागेत घडाच्या विकासासाठी सध्याचे वातावरण पोषक आहे. सुटसुटीत घड होण्याच्या दृष्टीने घडाच्या पाकळीची लांबी व दोन पाकळ्यांतील अंतर वाढलेले असावे लागते. याकरिता जीए ३ चा वापर महत्त्वाचा असतो. जीए ३ च्या वापरामुळे प्री ब्लूम अवस्थेतील घडांमध्ये पेशींचे विभाजन होऊन पेशींची संख्या व आकार वाढण्यास मदत होते. यासाठी पोपटी रंगाच्या अवस्थेतील घडावर १० पीपीएम जीए ३ ची फवारणी करून घ्यावी. ही अवस्था कोरड्या वातावरणात साधारणतः १७ व्या दिवशी येईल, तर पावसाळी दिवसामध्ये १८ ते १९ व्या दिवशी येऊ शकते. जीएची कार्यक्षमता वाढण्याची दृष्टीने त्यामध्ये सायट्रिक अॅसिड किंवा युरिया फॉस्फेट मिसळणे फायद्याचे ठरेल. घडाची लांबी चांगली मिळण्यासाठी संजीवकाच्या द्रावणाचा सामू ५.५ ते ६ असावा. फवारणीकरिता वापरण्यात आलेले पाणीही चांगल्या दर्जाचे असावे. परिणाम, चांगला मिळण्याच्या दृष्टीने फवारणीचा कालावधीही महत्त्वाचा असतो. तापमान साधारणतः ३५ अंशापर्यंत व आर्द्रता ५० ते ६० टक्के असल्यास परिणाम चांगले मिळतात. ही स्थिती साधारणतः सकाळी १० वाजेपर्यंत किंवा सायंकाळी चारनंतर दिसून येईल. संजीवकांची फवारणी करण्याच्या पाच ते सहा तास आधी किंवा एक दिवस आधी चिलेटेड झिंक आणि बोरॉनची फवारणी प्रत्येकी अर्धा ग्रॅम या प्रमाणे किंवा झिंक सल्फेट एक ग्रॅम आणि बोरॉन अर्धा या प्रमाणात करता येईल. असे केल्यास जीएची कार्यक्षमता वाढेल. दुसरी फवारणी १५ पीपीएम जीएची पाच दिवसांनी करावी.

प्री ब्लूम अवस्थेच्या आधीच्या बागेत फेलफुटी काढण्याची अवस्था असेल. फेलफूट काढण्याची अवस्था साधारणतः १४ ते १७ व्या दिवशी येते. एका काडीवर आपण चार ते पाच डोळ्यांवर हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग केले होते. त्यामुळे प्रत्येक डोळा फुटलेला दिसेल. फळछाटणीनंतर चौदाव्या दिवसापासून प्रत्येक फुटीवर पाच ते सहा पाने दिसून येतील. असे असले तरी ही कॅनॉपी रोगाचा प्रादुर्भाव किंवा दमट वातावरण तयार करण्यात मदत करते. या छोट्याशा कॅनॉपीमध्ये तयार झालेले वातावरण व अचानक आलेला एखादा पाऊस यामुळे घडावर विपरीत परिणाम होऊन घड कुजण्याची समस्या निर्माण होते. त्यासाठी फेलफुटी वेळीच काढणे गरजेचे असते.

डॉ. आर. जी सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT