Grape Management : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

Grape Crop : सध्याच्या परिस्थितीतील वातावरणाचा विचार करता बहुतांश ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे.
Grape Management
Grape ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय

Grape Crop Management : सध्याच्या परिस्थितीतील वातावरणाचा विचार करता बहुतांश ठिकाणी कमी अधिक प्रमाणात पाऊस पडताना दिसत आहे. तापमानसुद्धा (३२ ते ३४ अंशांपर्यंत) कमी अधिक होत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे वातावरणातील आर्द्रता (८० ते ९० टक्क्यांपर्यंत) वाढलेली दिसून येईल. या वातावरणामुळे बागेत द्राक्ष वेलीमध्ये होत असलेल्या काही घडामोडी व त्याचे परिणाम आणि त्यावरील संभाव्य उपाययोजना यांची माहिती या लेखात घेऊ.

नवीन फुटी जोमात वाढणे
सध्याचे वातावरण हे वेलीच्या वाढीसाठी पोषक आहे. या वेळी वेलीची शाकीय वाढ जास्त जोमात दिसून येईल. शेंडा थांबविण्यासाठी आपण करत असलेले पिंचिंग जर व्यवस्थित झाले तरच वाढ थांबेल. अन्यथा, हार्ड पिंचिंग (सात - आठ मि.मी. जाड फूट) झाल्यामुळे बगलफुटीही तितक्याच जोमाने निघतील. या बगलफुटीवर घड निघतानाही दिसून येतील. शेंडा वाढ तशीच राहू दिल्यास काडीच्या परिपक्वतेला उशीर लागेल. पुढे जितका शेंडा जास्त चालेल, तितकी काडी मागून कच्ची राहील. या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा राहणार नाही. पुढील काळात फळछाटणी झाल्यानंतर निघालेल्या फुटीमधून एकतर गोळी घड निघेल किंवा निघालेला घड जिरून जाण्याची शक्यता असेल.

बऱ्याचदा बगलफुटीवर निघालेल्या द्राक्षघडांमुळे शेतकरी संभ्रमात पडतात. जर या वेळी इतके घड निघाले तर फळछाटणीनंतर घड निघणार नाहीत, असा समज होतो. संशोधनाअंती असे पाहण्यात आले, की तळातील सुरुवातीचे तीन ते चार डोळ्यांमध्ये सूक्ष्मघड निर्मिती नसते. परंतु त्यापुढील प्रत्येक डोळ्यामध्ये द्राक्षघड दिसून येतो. आपल्याला आवश्यक असलेला द्राक्षघड हा एकतर सबकेन केलेल्या काडीवरील गाठीमध्ये असतो किंवा सरळ काडी ठेवलेल्या परिस्थितीत सहाव्या ते आठव्या डोळ्यामध्ये असतो. दोन्ही प्रकारच्या काडीमधून निघालेल्या द्राक्षघड द्राक्षशेतीच्या माध्यमातून महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा फळछाटणीच्या वेळी बागेत काडी या डोळ्याच्या पुढे चार ते पाच डोळ्यांपर्यंत परिपक्व झालेली असते. याचाच अर्थ या डोळ्यांमध्ये घड चांगल्या प्रतीचा व मजबूत असतो. पावसाळ्यामध्ये वेलीची वाढ जास्त प्रमाणात होत असल्यामुळे आपण शेंडा पिंचिंग सोळा ते सतराव्या डोळ्याच्या पुढेच करतो. म्हणून शेंड्यांकडून निघालेल्या घडांमुळे फळछाटणीनंतर घड निघणार नाही, हा गैरसमज आहे. आपल्याला आवश्यक असलेला द्राक्षघड खालील भागामध्ये असल्यामुळे शेंड्याकडे घड निघाला तर अडचणी येणार नाहीत. असे असले तरी आपण बागेमध्ये काही काळजी घेणे गरजेचे असेल.
- यामध्ये शेंडा पिंचिग करते वेळी हार्ड पिंचिंग करणे टाळून छायाचित्रात दाखवल्या प्रमाणे फक्त टिकली मारावी.
- काड्या तारेवर व्यवस्थितरीत्या बांधून घ्याव्यात. वेलीमध्ये गर्दी होणार नाही, हवा खेळती राहील व काडी लवकर परिपक्व होईल. गर्दीमधील - काडीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण वाढल्यामुळे अशा काड्या जास्त प्रमाणात हिरव्या राहतात.
- काडी परिपक्वता आणण्यासाठी पालाशचा वापर गरजेचा असेल. या वेळी जमीन वाफशामध्ये असल्यामुळे ०-०-५० एक किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे दिल्यास १० ते १२ दिवस या कोरड्या वातावरणात काडी लवकर परिपक्व होऊ शकेल.



Grape Management
Grape Management : पावसाळी स्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

हिरवी व सशक्त पाने महत्त्वाची
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता प्रत्येक बागेत काडीची परिपक्वता एकतर सुरू झाली असेल किंवा शेवटच्या टप्प्यात असेल. या कालावधीत काही ठिकाणी पाऊस पडलेला असतो, तिथे जमीन वाफशामध्ये राहत नाही. परिणामी, वेलीची वाढ जोमात होते. ही वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी बागायतदार वाढविरोधकांचा, बुरशीनाशकांचा आणि खतांचा अधिक प्रमाणात करतात. या वेळी परिपक्व काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा तयार होण्यासाठी पान सशक्त असणे गरजेचे आहे. हिरवेगार पान असल्यास त्यात हरितद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. परिणामी, प्रकाश संश्‍लेषण चांगल्या प्रकारे होऊन अन्नद्रव्याचा साठा निर्माण होतो. काडीची परिपक्वता ही कोणत्याही खताची किंवा वाढविरोधकाची फवारणी करताच दुसऱ्याच दिवशी मिळेल असे नाही, तर त्या प्रक्रियेसाठी काही ठरावीक काळ जाणे आवश्यक असते. या गोष्टीचा विचार शेतकरी फार कमी करतात. आणि एका मागून एक फवारण्या करत राहतात. फवारणी करतेवेळी शिफारस केलेल्या मात्रेकडे दुर्लक्ष करून अधिक प्रमाण व जास्त फवारण्या घेतल्या जातात. त्यामुळे बऱ्याचदा एक फवारणी सकाळी, तर दुसरी फवारणी लगेच दुपारी करत असल्याचे चित्र दिसते. यामुळे पानांमधील पेशींवर दाब निर्माण होऊन त्यावर जखम होते. काही दिवसांत पानावर स्कॉर्चिंग दिसून येते. जास्त प्रमाणात फवारणी केलेल्या परिस्थितीत पाने जळाल्यासारखी दिसून येतात. रंगीत द्राक्षजातीमध्ये कॉपरयुक्त बुरशीनाशकांच्या फवारण्या जास्त प्रमाणात होत असल्यामुळे ‘टॉक्सिसिटी’ दिसून येते. या जळालेल्या पानामध्ये हरितद्रव्य नसल्यामुळे पुढील प्रक्रिया थांबते. अशी पाने अन्नद्रव्यांचा साठा करू शकत नसल्यामुळे पानावर ताण येऊन ती गळून खाली पडतात. या नंतर काडी उघडी पडल्यामुळे डोळेसुद्धा फुगतात. नाइलाजास्तव फळछाटणी लवकर घ्यावी लागते. यावर पुढील उपाययोजना महत्त्वाच्या ठरतील.


- काडी परिपक्वतेच्या कालावधीमध्ये शक्यतो पालाशची उपलब्धता जमिनीतूनच करावी.
- पाऊस कमी अधिक प्रमाणात असल्यास जमीन वाफशामध्ये राहील, असे पाणी नियोजन करावे.
- वाढ विरोधकांची, खतांची व बुरशीनाशकांची फवारणी करायची झाल्यास, ती स्वतंत्रपणे करावी.
- शिफारस केलेल्या घटकांचा शिफारशीत मात्रेमध्ये वापर करावा.
- शक्यतो फवारणी उन्हामध्ये करणे टाळावे.

Grape Management
Grape Crop Management : द्राक्ष बागेत काडी परिपक्वतेच्या अवस्थेतील व्यवस्थापन

वेलीच्या ओलांड्यावर, खोडावर मुळ्या निघणे
काही भागांत द्राक्ष बागेमध्ये जुलै, ऑगस्ट महिन्यांत बऱ्यापैकी पाऊस पडतो. मुळाच्या कक्षेत असलेल्या मातीच्या कणांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे वेलीच्या मुळांस श्‍वासोच्छ्वास करणे कठीण होते. बोदामध्ये जास्त काळ पाणी साचलेल्या स्थितीमध्ये बोदामधील मुळे काळी पडतात. कार्य करणे बंद होते. स्वतःच्या बचावासाठी ही द्राक्षवेल आपल्या वरील भागामध्ये (ओलांडा, खोड इ.) नवीन मुळे तयार करते. यालाच ‘एरियल रूट्स’ असे म्हटले जाते. जशी जमीन वाफशामध्ये येईल, तशी जमिनीतील मुळे कार्य करण्यास सुरू करतील, तसतशी ओलांड्यावरील मुळे काळी पडतात.
दुसऱ्या परिस्थिमध्ये वेलीच्या ओलांड्यावर आणि खोडावर सध्या वेगळ्याच प्रकारची मुळे तयार होताना दिसून येते. वेलीची वाढ थांबविण्यासाठी या वेळी बागेत विशेष प्रकारची वाढविरोधके, खते आणि संजीवके यांचा वापर जास्त प्रमाणात करण्याचे प्रमाण वाढले आहे. ही मुळे नियंत्रणात आणण्यासाठी यावर अजून पूर्णपणे अनुमान लागले तरी बागेत तणनाशकांचा जास्त वापर करणे, वाढविरोधकांच्या दोन पेक्षा जास्त फवारण्या करणे, पालाशचा वापर अतिप्रमाणात करणे इ. गोष्टी जास्त जबाबदार असाव्यात, असा प्राथमिक अंदाज आहे. सद्यस्थितीमध्ये यावर पुढील उपाययोजना करता येतील.
- वाढविरोधकाचा वापर शिफारशीप्रमाणेच करावा.
- शेंडा पिंचिंग करणे टाळावे.
- बागेत नत्राचा वापर थोड्या प्रमाणात वाढ शेंडा वाढ करून घ्यावी.
- चार ते पाच नवीन पाने निघाल्यास मागील फूट निघणे बंद होईल.
- जमिनीत मुळांच्या कक्षेत हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी.


डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com