डॉ. विवेक चिमोटे, डॉ. मिलिंद देशमुख
Soybean Production: सोयाबीन हे मूळचे थंड व समशीतोष्ण प्रदेशातील पीक आहे. त्या तुलनेने भारतातील अधिक उष्ण कटिबंधीय हवामानात जुळवून घेऊन अधिक उत्पादन देण्याचे आव्हान या पिकासमोर असते.
सोयाबीन पीक हे दिवसाची लांबीसाठी (प्रकाशाचा कालावधी, फोटो पिरीयड) अत्यंत संवेदनशील असून, त्याचा उत्पादनावर मोठा प्रभाव पडतो. चीन, अमेरिका, अर्जेंटिना अशा थंड प्रदेशात मार्च एप्रिलच्या दरम्यान सुरवातीला सौम्य हवामानात पेरणी होते.
त्या दरम्यान दिवस मोठे असल्यामुळे सूर्यप्रकाश जास्त मिळतो. त्यामुळे पिकाची चांगली जोपासना होऊन भरघोस उत्पादन मिळते. याउलट भारतात मॉन्सून आगमनानंतर जून-जुलैमध्ये लागवड केली जात असल्याने उष्णतेपासून दिलासा मिळतो.
मात्र या काळात दिवस तुलनेने लहान असतात. परिणामी सूर्यप्रकाश कमी मिळून वाढ व उत्पादकता कमी होते. भारतीय सोयाबीनची उत्पादकता (१०५१ किलो/हेक्टर) ही जागतिक सरासरीपेक्षा (२६७० किलो/हेक्टर) खूपच कमी आहे. ती वाढविण्यासाठी भारतीय हवामानासाठी अनुकूल वाण विकसित करण्यासाठी शास्त्रज्ञांचे प्रयत्न चालू आहेत.
सोयाबीनच्या अनेकविध उपयोग आणि अमर्याद फायद्यांमुळे त्याला मोल्डन बीन, मिरॅकल बीन किंवा वंडर क्रॉप असे म्हटले जाते. सोयाबीनच्या बियांमध्ये तेलाचे प्रमाण १८ ते २०% पर्यंत आणि प्रथिनांचे प्रमाण ४०% असते. प्रथिनांचा समृद्ध स्रोत असून, त्याचे वर्गीकरण कडधान्य पिकापेक्षा तेलबिया पिकामध्ये केले जाते.
भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या एकूण खाद्यतेलापैकी ६५% खाद्य तेल आपल्याला आयात करावे लागते. त्यासाठी तब्बल ७५ हजार कोटी रुपये प्रति वर्ष परकीय चलनामध्ये खर्च होतात. अशा वेळी सोयाबीनपासून केवळ तेलच नाही, तर त्यापासून विविध पदार्थ ही तयार केले जातात.
उदा. सोयामिल्क, टोफू, नट्टो, टेम्पेह, डौची, हमानाट्टो, मिसो, शोयू, सोयापीठ, हिरवे बीन्स, भाजलेले सोयानटस् आणि मोड आलेले सोयाबीन इ. पूर्व आशियायी देशात शतकानुशतके सोयाबीनचे अनेक पदार्थ आहारात आहेत, अशा वेळी सोयाबीन नक्की आले कुठून, त्याचा प्रवास कसा होता, याचा माहिती घेऊ.
सोयाबीन उत्पत्ती
सोयाबीनची उत्पत्ती नेमकी कधी झाली हे स्पष्ट नसले तरी ५००० ते ८००० वर्षांपूर्वी चीनमधील रानटी सोयाबीनपासून लागवडयोग्य सोयाबीनचे पीक उत्क्रांत झाल्याचे मानले जाते. सोयाबीनच्या रानटी प्रकारापासून वेगळी वैशिष्ट्ये असणाऱ्या सुधारित जातींची निवड मानव वेळोवेळी करत गेला.
त्यातही त्याचा ताठ वाढणे, शेंगा फुटल्यामुळे बियाणे कमी विखुरणे, मोठ्या आकाराचे दाणे, बियाणे जास्त काळ टिकण्याची क्षमता, सुप्तावस्थेतील कमी नुकसान आणि जास्त उत्पादन इ. वैशिष्ट्यांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला असावा.
पूर्व आशियातील वेगवेगळ्या ठिकाणी रानटी सोयाबीनचे संवर्धन करण्यासाठी अनेक स्वतंत्र प्रयत्न झाले असावेत. ईशान्य चीनमध्ये सोयाबीनमुळे कृषी क्रांती झाल्याचे काही ऐतिहासिक दाखले मिळतात.
चीन, जपान, आणि कोरियामध्ये हजारो वर्षांपासून सोयाबीनचा वापर अन्नामध्ये केला जात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत चीन हा सोयाबीन उत्पादनात आघाडीवर होता आणि सर्वात मोठा ग्राहक होता.
मात्र सोयाबीन पिकाचा जागतिक प्रसार होऊन, तो ५.७% योगदानासह तो चौथ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे.
अमेरिकेत सोयाबीनचा प्रसार
‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA)’ मधील सुरवातीस प्रायोगिक लागवडीपासून सुरू झालेला सोयाबीनचा प्रवास प्रमुख निर्यातक्षम शेतीमालापर्यंत पोचला आहे. इ.स. १८५१ नंतर मध्य- पश्चिम USAच्या कॉर्न- बेल्ट मधील शेतकऱ्यांना सोयाबीनचे बियाणे वितरित केले गेले.
हे बियाणे प्रशांत महासागरातील जपानी मासेमारी बोटीतून सुटका करण्यात आलेल्या चालकदलाने दिलेली भेट होती. इ.स. १८७० च्या दशकात अमेरिकेत सोयाबीनची चारापीक म्हणून लोकप्रियता शेतकऱ्यांमध्ये वाढली. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेच्या कृषी विभागाने सोयाबीनच्या
प्रायोगिक चाचण्याला सुरवात केली. शेतकऱ्यांना पशुखाद्य म्हणून लागवड करण्यात प्रोत्साहित केले. अमेरिकन शास्त्रज्ञ जॉर्ज कार्व्हर यांनी १९०४ मध्ये सोयाबीन हे प्रथिने आणि तेलाचा एक मौल्यवान स्रोत असल्याचे सिद्ध केले. या पिकामुळे मातीची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत होत असल्याचे एव्हाना लक्षात आले.
इ.स. १९२० पर्यंत अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या फक्त २० जातींची लागवड होत होती. विल्यम मोर्सने इ.स. १९२९ पर्यंत चीनमधून सोयाबीनचे दहा हजारापेक्षा अधिक स्थानिक वाण संकलित केले. अमेरिकन कृषी शास्त्रज्ञांना नवीन जातींच्या विकासासाठी वितरित केले.
इ.स. १९३० च्या दशकात सततच्या दुष्काळामुळे अमेरिकेत सोयाबीन पिकाची लोकप्रियता वाढण्यास मदत झाली. इ.स. १९४०-५० च्या दशकात अमेरिकेमध्ये अनुवंशशास्त्राचे पद्धतशीर प्रयोगातून चारा पिकापासून तेलबिया पिकापर्यंत सोयाबीनचे रूपांतर केले गेले.
इथूनच अमेरिकेत सोयाबीनची शेती खऱ्या अर्थाने सुरू झाली. त्याकाळी प्रमुख उत्पादक असणाऱ्या चीनमधील सोयाबीनचे उत्पादन दुसरे महायुद्ध आणि अंतर्गत सामाजिक क्रांतीमुळे थांबले होते. जेव्हा अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली तोपर्यंत सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती.
अमेरिकेमध्येही समृद्धीचा काळ सुरू झाल्याने लोकांकडून मांसाची मागणी व पर्यायाने पशुपक्षी पालनाकडे कल वाढला होता. अशा वेळी सोयाबीनची पेंड हा प्रथिनांचा चांगला व जनावरांच्या आवडीचा स्रोत असल्याचे पशुपालकांच्या लक्षात आले.
सोबतच सोयाबीन तेलाची वाढती मागणी होतीच. इ.स. १९९० च्या दशकापासून सोयाबीनच्या मागणीत प्रचंड वाढ झाली. १९९० च्या दशकात तणनाशकांना सहनशील किंवा प्रतिरोधक अशा जनुकीय परिवर्तित (GM) सोयाबीनचा विकास झाला.
तणांवर नियंत्रण ठेवणे सोपे झाल्याने हे वाण इतके लोकप्रिय आहेत की उत्तर आणि लॅटीन या दोन्ही अमेरिकन खंडांमध्ये संपूर्ण सोयाबीन क्षेत्र अशा जीएम सोयाबीन लागवडीखाली आहे. इ.स. २०१८ पर्यंत अमेरिका हा सर्वांत मोठा सोयाबीन उत्पादक देश होता.
मात्र सध्या ब्राझील ३४ टक्के उत्पादनासह पहिल्या क्रमांकावर असून, ३२ टक्के उत्पादनासाठी अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अर्जेंटिना (१४%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
इ.स. १९७० च्या दशकात सोयाबीन हे ब्राझिलियन कृषी व्यवसायात मुख्य पीक म्हणून स्थापित झाले होते. इ.स. १९९० पासून दक्षिण अमेरिकेमध्ये (ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे, बोलिव्हिया आणि उरुग्वे ) सोयाबीनचे क्षेत्र प्रचंड प्रमाणात (३०० पटीने) वाढले आहे.
एकूण जागतिक उत्पादनात त्यांचे ७४% योगदान आहे. दक्षिण ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रचलित प्रकाशाचा कालावधी आणि तापमान यांना जुळवून घेणाऱ्या नव्या वाणांची निर्मिती होय.
पुढे दक्षिणेतून मध्य आणि उत्तरी समशितोष्ण / उष्ण कटिबंधीय ब्राझीलमध्ये सोयाबीनचा प्रसार झाला. कारण या क्षेत्रांसाठी जनुकीय संशोधनाने फोटोपिरियड आणि तपमान यांना काही अंशी असंवेदनशील आणि फुलोऱ्यापूर्वी दीर्घकाळ असणाऱ्या वाणांचा विकास झाला. असे वाण मध्य आणि इतर ब्राझीलच्या लहान प्रकाश कालावधीशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतात.
पुढील भागामध्ये आपण या पिकाचा भारतात कसा प्रसार झाला, हे पाहू.
डॉ. विवेक चिमोटे, सहयोगी प्राध्यापक, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
डॉ. मिलिंद देशमुख, ९४२३१८५६०३, सोयाबीन पैदासकार, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.