Soybean Market : अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटीचा कोणत्या देशाला फायदा?

अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटल्यानं वायदे बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत होते. दरात आणखी वाढ होईल असा अंदाही व्यक्त केला जात होता.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Rate : सोयाबीन केवळ देशापुरतीच नाही तर जागितक कमोडिटी आहे. सोयाबीन बाजारावर अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीनाचा दबदबा असतो. सोयाबीन उत्पादनात ब्राझील आणि अमेरिका आघाडीवर आहेत.

तर सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत (Soyaoil export) अर्जेंटीना शिखरावर असतो. त्यामुळं या तीन देशांच्या उत्पादनानुसार आंतरराष्ट्रीय बाजार फिरत असतो.

यंदा अर्जेंटीनातील दुष्काळामुळे उत्पादनात मोठा खड्डा पडला. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात तेजीही दिसली. तर अर्जेंटीनातील उत्पादन घटीचा ब्राझालला फायदा होत आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादनात अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीना या देशांचा वाटा तब्बल ८२ टक्के आहे. त्यामुळं या देशांमध्ये उत्पादनात घट किंवा वाढ झाली तरी जागतिक बाजारावर त्याचे पडसाद उमटतात.

Soybean Market
Soybean Market : ब्राझीलच्या जैवइंधन धोरणामुळे सोयाबीन सुधारण्याचे संकेत

ब्राझील उत्पादनात आघाडीवर तर अमेरिका दुसऱ्या आणि अर्जेंटीना तिसऱ्या स्थानवर असतो. अमेरिकेचा सोयाबीन हंगाम सर्वात आधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात सुरु होतो. तर ब्राझील आणि अर्जेंटीनाचे सोयाबीन मार्च महिन्यात बाजारात येते.

यंदा अमेरिकेत सोयाबीन उत्पादनात घट झाली. त्यामुळं ब्राझील आणि अर्जेंटीनाकडे लक्ष होतं. मात्र अर्जेंटीनाला अमेरिकेपेक्षा जास्त फटका बसला. अर्जेंटीना सोयाबीन उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर असला तरी सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर आहे.

अर्जेंटीनातील उत्पादन घटल्याचा सर्वाधिक फायदा ब्राझीलला होताना दिसत आहे. यंदा ब्राझीलचं सोयाबीन गाळप, सोयापेंड आणि सोयातेल निर्यात वाढण्याचा अंदाज आहे.

अर्जेंटीनातील उत्पादनाची स्थिती

अर्जेंटीनाचं सोयाबीन उत्पादन (Soybean Production) यंदा निचांकी २५० लाख टनांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळं यंदा अर्जेंटीनाची सोयाबीन आयात वाढेल. मागील हंगामात अर्जेंटीनाने ३७ लाख टन आयात केली होती. ती यंदा १०० लाख टनांपर्यंत वाढू शकते.

निर्यात मात्र ८३ टक्क्यांनी कमी होऊन १० लाख टनांवर स्थिरावेल. तर सोयाबीन गाळप ९ टक्क्यांनी कमी होऊन ३४५ लाख होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

ब्राझील पोकळी भरणार

अर्जेंटीनामुळे जागतिक सोयाबीन बाजारात निर्माण झालेली पोकळी ब्राझील भरून काढणार आहे. अमेरिकेत सध्या सोयाबीन साठा कमी आहे.

तर नवा माल सप्टेंबर २०२३ पासून बाजारात येईल. ब्राझीलचं उत्पादन यंदा १८ टक्क्यांनी वाढून १ हजार ५२४ लाख टनांवर पोचेल. म्हणजेच ब्राझीलमध्ये उत्पादन वाढले तरी येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळाला.

Soybean Market
Soybean Market : ब्राझीलच्या जैवइंधन धोरणामुळे सोयाबीन बाजार सुधारणार ?

ब्राझीलचा सोयाबीन बाजार

ब्राझीलची सोयाबीन निर्यात गेल्यावर्षीच्या ७८० लाख टनांवरून यंदा ९४० लाख टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज काही संस्थांनी व्यक्त केला. ब्राझीलचं सोयाबीन गाळपही विक्रमी पातळीवर होणार आहे. सोयापेंड उत्पादन यंदा ६ टक्क्यांनी वाढून ४०८ लाख टनांवर पोचेल.

तर सोयापेंड निर्यात ८ टक्क्यांनी वाढून २२० लाख टनांचा टप्पा गाठेल. पण ब्राझीलने जैवइंधनाचा वापर २ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला.

ब्राझीलच्या एकूण जैवइंधन उत्पादनापैकी ७० टक्के सोयातेलापासून मिळते. त्यामुळं इथं सोयातेलाचा वापर वाढेल. परिणामी सोयातेलाची निर्यात कमीच राहील.

बाजार का नरमला?

अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन घटल्यानं वायदे बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर तेजीत होते. दरात आणखी वाढ होईल असा अंदाही व्यक्त केला जात होता. पण अमेरिकेतील महत्वाच्या दोन बॅंकांनी नांगी टाकली आणि शेतीमाल वायदे बाजारात पडझड सुरु झाली.

सोयाबीन दरात क्विंटलमागं ३०० ते ४०० रुपयांची नरमाई आली. तर सोयापेंडचे भाव टनामागं साडेतीन हजार रुपयाने कमी झाले. याचा फटका, अमेरिका, ब्राझील आणि भारतातील शेतकऱ्यांना बसत आहे.

बाजार उभारी घेईल का?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंडचे दर कमी झाल्यानं देशातही दरावर दबाव आला. भारतीय सोयापेंडची कमी दरात मागणी केली जात असल्याचं निर्यातदार सांगत आहेत. पण देशातील बाजारात सोयाबीनची आवक हंगामाच्या सुरुवातीपासूनच मर्यादीत आहे.

त्यामुळं उद्योगांकडे मोठा साठा नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले तरी देशातील बाजारभाव टिकून आहेत. मार्च महिन्यात सोयाबीनची आवक सरासरीपेक्षा जास्त होतेय. त्याचा दबाव दरावर आहे.

पण आंतरराष्ट्रीय आणि देशातील बाजाराची दिशा बघता दरावर जास्त काळ दबाव राहणार नाही. सोयाबीन बाजार उभारी घेईल. देशातील बाजारातही दर सुधारतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासक आणि काही संस्थांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com