Weed Management
Weed Management Agrowon
ॲग्रो गाईड

Weed Management : तण व्यवस्थापनामधील काही नवीन विचार

प्रताप चिपळूणकर

आज हा लेख मुद्दाम या वेळी देण्यामागे ज्या कोणाला शक्य आहे त्यांनी उन्हाळी पीक (Summar Crop) अवश्य घ्यावे; परंतु येथे एक गोष्ट लक्षात घ्यावयाची आहे ती म्हणजे आपल्याला तण व्यवस्थापनाकडे (Weed Maagement) जायचे आहे. ज्यांच्याकडे जमिनीचे मोठे क्षेत्र आहे, बागायतीची सोय आहे, त्यांनी जमिनीचे तीन भाग करून एका हंगामात एका भागाला विश्रांती द्यावी. ३३ टक्के जमिनीच्या व्यवस्थापनातून सुटका होते. मजूरटंचाई काळात व्यवस्थापन सोपे होते. जमीनही चांगली राहिली.

महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांकडे उन्हाळी पीक घेण्याइतके पाणी उपलब्ध असते तरीही पारंपरिक पद्धतीमध्ये जमिनी उन्हाळ्यात पड ठेवून पावसाळ्यात पिके घेण्याची प्रथा आहे. उसासारखे पीक फेब्रुवारी, मार्चमध्ये तुटते. मग पुढील २ ते ३ महिने जमीन पड टाकली जाते आणि पावसाळ्यात (Rainy Season) पीक घेतले जाते.

आमच्याकडेही गेली कित्येक वर्षे असेच चालू आहे. मागील ३ ते ४ वर्षांत या पद्धतीमध्ये आम्ही काही नवीन प्रयोग केले. आमच्याकडे पाण्याची उपलब्धता चांगली आहे. यामुळे भात किंवा भुईमूग यांसारखे पीक उन्हाळ्यात घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी फेरपालटाचे उसाचे रान जानेवारीच्या सुरवातीस रिकामे होणे गरजेचे असते. तसे रान रिकामे करून घेतले. उन्हाळ्यातील भाताचा पक्वता कालावधी पावसाळ्याच्या तुलनेत एक महिना जास्त लागतो. ऊस तुटल्यानंतर पाचट पेटवून टाकले. उसाचे खोडवे उगवू देऊन त्यावर ग्लायफोसेट तणनाशक फवारून घेतले. हे ग्लायफोसेट पीक पेरणीअगोदर मारता येते, तसे पीक पेरणीनंतरही मारता येते. पेरणीचा कालावधी लवकर असेल तर प्रथम पेरणी उरकावी. पाणी द्यावे व भात उगवण्यास पाच दिवस लागतात. तत्पूर्वी तणनाशकाची मी फवारणी केली. अनेक शेतकऱ्यांच्या मनात शंका येईल, की याचा पिकावर वाईट परिणाम होणार नाही का? तसे का होत नाही.

भात पिकाच्या दोन प्राथमिक गरजा आहेत ः

१) भातासाठी जितकी कडक जमीन असेल तितके चांगले.

२) भात हे उभ्या पाण्यात वाढणारे पीक असले तरीही पहिले २५ ते ३० दिवस त्याला इतर पिकाप्रमाणे वाफशाची गरज असते. नांगरून पोकळ केलेल्या जमिनीत पाऊस जास्त झाला तर भाताची सुरुवातीची वाढ खुंटते. ओलावा जास्त काळ राहिल्यास भात पिवळे पडून मरूनही जाऊ शकते. हा गुणधर्म मुद्दाम नमूद करण्याचे कारण यानुसार भाताच्या पेरणीची पद्धत ठरते.

उसानंतर भात लागवडीचा प्रयोग ः

उसानंतर भात लागवड करत असताना विना नांगरणी पद्धतीने घ्यावे. गहू पेरून केल्यापेक्षा विस्कटून केलेला जास्त चांगला येतो. मग भातही विस्कटून पेरणी करून पाहण्यास काय हरकत आहे? सरी वरंब्यावर आपण फक्त सरीत पाटपाण्याने पाणी देतो. पावसाळा असेल तर उगवण अवस्थेत आणि पहिले २५ ते ३० दिवस पाऊस जास्त झाल्यास भात कुचमते. म्हणून दोनही वरंब्याच्या उताराला दोन ओळींत टोकण पद्धतीने पेरणी करावी. उन्हाळी भाताला अशी काही शक्यता नसल्याने भात सरीत विस्कटून टाकावे. नेहमी पाभरीच्या पेरणीपेक्षा बी २५ टक्के कमी वापरावे. पॉवर टिलरने कोळपा मारल्याप्रमाणे उथळ दातांचा नांगर फिरवून बी मातीआड करावे. वरंबामध्ये ठेऊन एका सरीत दोन बाजूला पॉवर टिलरच्या टायर फिरवाव्यात. सरी रुंद असल्यास मोठ्या ट्रॅक्टरच्या टायरने रान दडपून घ्यावे. ही झाली रासणी. अशा पद्धतीमुळे टोकणीसाठी लागणाऱ्या मजुरीत बचत होते.

भात उगवणीपूर्वी तसेच २५ ते ३० दिवसांनंतर शिफारशीत तणनाशक फवारावे. उन्हाळ्यात तणांचा प्रादुर्भाव खूप कमी असतो, त्याचप्रमाणे विसकटलेल्या भातात आणखी कमी तण येते. फक्त वरंबा रिकामा राहू शकतो. तेथे काही प्रमाणात तण वाढते. उसाचे सरी वरंबे असल्याने सरीने ओलीत करणे खूप सोपे व कमी पाण्यात होते. स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने पिकाची सर्वांगाने चांगली वाढ होते. पावसाळी भाताच्या तुलनेत सहज ५० ते ६० टक्के उत्पादन जास्त मिळते. कीड, रोग प्रादुर्भाव फारसा नसल्याने कीडनाशकाच्या फवारण्या फारशा कराव्या लागत नाहीत. सर्व खर्च कमी व उत्पादन मात्र जास्त मिळू शकते.

उसानंतर भुईमूग ः

उसानंतर भुईमूग घेता येतो. भुईमूग मात्र दोन्ही वरंब्याच्या उताराला ओल कुठपर्यंत पोहोचते आहे तिथपर्यंत प्रथम रान ओलित करून टोकण करणे गरजेचे आहे. भुईमुगासाठी पीक आणि तण उगवण्यापूर्वी आणि २५ ते ३० दिवसांनंतरची शिफारशीत तणनाशके बाजारात उपलब्ध आहेत त्याचा वापर करावा. मानवी भांगलणीची फारशी आवश्यकता पडत नाही. पावसाळ्यात एका वेलाला २० ते २५ शेंगा लागतात, तर उन्हाळ्यात ४० ते ५० शेंगा लागतात. फुले येण्याचे काम शेवटपर्यंत चालूच राहिल्याने शेवटच्या शेंगा काहीशा पोचट होतात. हे प्रमाण एकूण शेंगांच्या ५ ते १० टक्के असते. भुईमुगाचे चांगले उत्पादन उन्हाळ्यात मिळते. शेंगेसारखे पीक वाळविणे पावसाळ्यात खूप अवघड असते. तेच उन्हाळ्यात खूप सोपे काम होते.

तण व्यवस्थापन महत्त्वाचा मुद्दा ः

१) ज्या कोणाला शक्य आहे त्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी पीक अवश्य घ्यावे; परंतु येथे एक गोष्ट लक्षात घ्यावयाची आहे ती म्हणजे आपल्याला परत तण व्यवस्थापनाकडे जावयाचे आहे. उसानंतर ज्या जमिनीत उन्हाळी पिके घेतली त्या शेतीला पारंपरिक पद्धतीप्रमाणे उन्हाळ्यात विश्रांती मिळणे गरजेचे होते. त्या काळात पीक घेतल्याने ही विश्रांती देता आली नाही. आता पावसाळ्यात तेथे कोणतेही पीक न घेता तणे वाढू द्यावयाची. पावसाळा हा तणे वाढविण्यासाठी सर्वांत उत्तम हंगाम आहे. योग्य वेळी तणे मारून परत उसाची लावण करावी अगर कोणतेही पीक घ्यावे. जमिनीला विश्रांती मिळेल, जमिनीला सेंद्रिय कर्ब, जागेलाच सेंद्रिय पदार्थ कुजविण्याचे सर्व फायदे मिळतील.

२) शेतकऱ्यांच्या मनात असे येईल, की जमिनीला विश्रांती देण्याची गरजच काय, योग्य निगराणी केली तर तीनही हंगामांत उत्तम पीक यावयास पाहिजे. वास्तवात तसे होत नाही. सातत्याने पिकावर पीक घेत राहिल्यास पहिल्यासारखे उत्पादन मिळत नाही. फेरपालट साली उसाचे शेतीत ऊस गेल्यानंतर जमीन ३ ते ४ महिने रिकामी ठेवण्यापेक्षा एखादे हंगामी पीक घेऊन घरासाठी, जनावरांसाठी, पैशांसाठी एखादे पीक घेतले जाते. सदर पीक पावसाळ्यापूर्वी थोडे दिवस निघते. पाठोपाठ परत पावसाळी पीक आणि परत २ ते ३ वर्षे ऊस किंवा ऊस काढून ८ ते १५ दिवसांत परत उसाची लावण किंवा ताग, ढेंच्यासारखे हिरवळीचे पीक घेतले जाते. असे केल्यास पुढील खरिपाचे पीक आणि परत २ ते ३ वर्षे ऊस या सर्वच पिकाचे उत्पादन सुमार येते. तेच फेरपालट साली ३ ते ४ महिने अगर पावसाळ्यातील २ ते ३ महिने जमीन पड टाकली अगर पावसाळ्यात तणे वाढवून मारली तर पुढील सर्व पिके चांगली उत्पादन देतात. कमी खर्चात येतात. शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करावा.

२) शेतकऱ्यांच्या मनात असे येईल, की जमिनीला विश्रांती देण्याची गरजच काय, योग्य निगराणी केली तर तीनही हंगामांत उत्तम पीक यावयास पाहिजे. वास्तवात तसे होत नाही. सातत्याने पिकावर पीक घेत राहिल्यास पहिल्यासारखे उत्पादन मिळत नाही. फेरपालट साली उसाचे शेतीत ऊस गेल्यानंतर जमीन ३ ते ४ महिने रिकामी ठेवण्यापेक्षा एखादे हंगामी पीक घेऊन घरासाठी, जनावरांसाठी, पैशांसाठी एखादे पीक घेतले जाते. सदर पीक पावसाळ्यापूर्वी थोडे दिवस निघते. पाठोपाठ परत पावसाळी पीक आणि परत २ ते ३ वर्षे ऊस किंवा ऊस काढून ८ ते १५ दिवसांत परत उसाची लावण किंवा ताग, ढेंच्यासारखे हिरवळीचे पीक घेतले जाते. असे केल्यास पुढील खरिपाचे पीक आणि परत २ ते ३ वर्षे ऊस या सर्वच पिकाचे उत्पादन सुमार येते. तेच फेरपालट साली ३ ते ४ महिने अगर पावसाळ्यातील २ ते ३ महिने जमीन पड टाकली अगर पावसाळ्यात तणे वाढवून मारली तर पुढील सर्व पिके चांगली उत्पादन देतात. कमी खर्चात येतात. शेतकऱ्यांनी याचा अभ्यास करावा.

३) जमीन हे यंत्र नाही. त्यालाही आपल्याप्रमाणेच विश्रांतीची गरज असते. आपण दिवस-रात्र काम करण्याचे ठरविल्यास एखाद्या दिवशी उभे राहू, दुसऱ्या दिवशी आडवे होऊ. म्हणून रात्र आपणास विश्रांतीसाठी दिलेली आहे. तरच दुसरा दिवस मजेत जाईल. फक्त विश्रांतीने सुपीकतेच्या सर्व घटकांत वाढ होते. ज्यांच्याकडे जमिनीचे मोठे क्षेत्र आहे, बागायतीची सोय आहे, त्यांनी जमिनीचे तीन भाग करून एका हंगामात एका भागाला विश्रांती द्यावी. ३३ टक्के जमिनीच्या व्यवस्थापनातून सुटका होते. मजूरटंचाई काळात व्यवस्थापन सोपे होते. जमीनही चांगली राहील. यातही हंगामाचे फेरपालट करून पाळीप्रमाणे प्रत्येक जमिनीला फेरपालटाने तीनही हंगामांत विश्रांती देता येईल. फक्त उत्पादन मिळविण्याचा विचार सोडून द्यावा. समांतर जमिनीची सुपीकता वाढतच गेली पाहिजे हा ध्यास बाळगावा. हा सर्व आपल्या हातातील भाग आहे. दुसऱ्या कोणाची मदतीची गरज नाही.

संपर्क ः

प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

Adulterated Milk : भेसळयुक्त दूध रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात

Water Scarcity : कळंबा परिसरात पाण्याचा प्रश्‍न गंभीर

SCROLL FOR NEXT