Soil
Soil Agrowon
ॲग्रो गाईड

Soil Fertility : जमीन सुपीकता अन्‌ संवर्धन महत्त्वाचे...

प्रताप चिपळूणकर

ने रळ- मालेगाव (ता.कर्जत,जि.रायगड) येथील शेखर भडसावळे यांनी प्रथम आपल्या भात शेती (Paddy Farming) करण्याच्या पद्धतीत फरक केला. क्लिष्ट व जीवघेणी भात लागवडीची (Paddy Cultivation) पारंपारिक पद्धत बंद करून सोपी, जमिनीची सुपीकता (Soil Fertility) वाढवत नेणारी व कमी खर्चाची, कमी मनुष्यबळाची शून्य मशागत (Zero Cultivation), संवर्धित भात शेती पद्धत विकसित केली.

स्वतः प्रथम आपल्या शेतात ही पद्धत यशस्वी केल्यानंतर हजारो इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली. कोकणपट्टीत सर्वत्र अनेक सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. पावसाळ्यानंतर डोंगरावरील हिरवे गवत वाळते आणि पुढे वणवे लागून पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होते, हे दरवर्षी दिसून येते. असे वणवे रोखणारे सगुणा वनसंवर्धन तंत्र त्यांनी विकसित केले. या समस्या निर्मूलनाच्या कामातील मुख्य घटक हा ग्लायफोसेट हे तणनाशक आहे.

भात शेतीमधील प्रयोग

कोकणात अगर जास्त पावसाच्या प्रदेशात राब, रोप, चिखलणी व लावणी या पद्धतीने पिढ्यानपिढ्या भातशेती केली जाते. या पिकाचे क्षेत्र मोठे आहे. या पद्धतीने संपूर्ण भाताची लागवड करणे हे एक डोकेदुखीचे काम होते. आता भडसावळे यांनी सगुणा भात लागवड तंत्रज्ञान असे नवे तंत्र विकसित केले आहे. यात फक्त एकदाच जमीन नांगरून त्याचे गादीवाफे तयार केले जातात. योग्य वेळी या वाफ्यांवर त्यांनी खास विकसित केलेल्या खुणा करण्याच्या यंत्राने खुणा करून भाताची टोकण पद्धतीने पेरणी केली जाते.

गादी वाफ्याचे काम एकदाच करावयाचे, पुढे कोणत्याही मशागतीचे काम न करता सालोसाल भात तसेच इतर हंगामात ही पिके घेत राहायचे. पेरणीपूर्वी आणि कापणीनंतर तण नियंत्रणाचे काम ग्लायफोसेट या तणनाशकाने करायचे. उभ्या भात पिकातील तण नियंत्रणासाठी खास निवडक तणनाशकांचा वापर केला जातो. बैल नको, पावर टिलर, ट्रॅक्टर नको. राबासाठी झाडे तोड नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिखलणीच्या कामात धुपीमुळे होणारी जमिनीच्या सुपीकतेची हानी बंद.

पिकाचे व तणांचे जमिनीखालील अवशेष जागेलाच कुजल्यामुळे जमिनीची सुपीकता सालोसाल वाढतच जाते. यामुळे पारंपरिक पद्धतीपेक्षा ४० ते ५० टक्के जास्त उत्पादन मिळते. सर्व त्रासाला कंटाळून अनेक जण भात शेती सोडून देत आहेत, या तंत्राने भात एक नगदी पीक होऊ शकते. नांगरणी,चिखलणीची पारंपारिक पद्धत विकसित होण्या मागे केवळ तणनियंत्रण करता यावे हेच एकमेव कारण आहे. तणनाशकाच्या शोधामुळे एसआरटी सगुणा भात तंत्र हा कालसापेक्ष केलेला बदल आहे. महाराष्ट्र तसेच इतर राज्यात अनेक शेतकरी या तंत्राचा वापर करीत आहेत.

सगुणा जलसंवर्धनाचा प्रसार

महाराष्ट्रात अनेक तळी, तलाव, नद्या व धरणे जलपर्णीने भरले आहेत. जलपर्णीवर ग्लायफोसेट फवारायचे आणि मृत अवशेष यंत्राच्या साहाय्याने बाहेर काढावयाचे. त्याचे उत्तम दर्जाचे कंपोस्ट खत बनवायचे असे हे तंत्र आहे. यांत्रिक अवजाराने जलपर्णी बाहेर काढत असता जलपर्णीच्या बुडाशी लपलेली त्याची लहान लहान ९ ते १० पिल्ले तशीच तिथे राहतात. मोठी मोठी जलपर्णी बाहेर काढल्यावर जलसाठा स्वच्छ केल्याचे भासते. परंतु पुढे काही दिवसात तो जलसाठा पूर्ववत स्थितीत आपल्याला पुन्हा जलपर्णीने भरून गेल्याचे दिसून येते.

जलपर्णीच्या हा प्रश्न भडसावळे यांना त्यांच्या शेतावरील कमळाच्या तलावात आढळला. त्यावर त्यांनी सखोल अभ्यास केला. ग्लायफोसेटच्या योग्य वापरातून आपण हा प्रश्न सोडवू शकतो याचे प्रात्यक्षिक तिथेच घडले. तलाव जलपर्णी मुक्त झाला. पुढे हे तंत्र औरंगाबाद येथील डॉ. सालीम अली तलावात (४० एकर क्षेत्र) वापरण्यात आले. तेथील जलपर्णी या तंत्राने समूळ नष्ट करून सदर तलाव आजतागायत स्वच्छ व जलपर्णी मुक्त आहे. पुढे कल्याण खाडीच्या अलीकडे ३० किलोमीटर उल्हास नदी जलपर्णीने भरली होती. ती मुक्त करण्याचे आव्हान ‘सगुणा रूरल फाउंडेशन' या टीमने स्वीकारले आहे.

सगुणा वन संवर्धन तंत्रज्ञान

या तंत्रात पावसाळ्याच्या मध्यास डोंगराच्या संपूर्ण तळात आणि डोंगरात योग्य अंतरावर उभ्या आडव्या जाळरेषा मारल्या जातात. पूर्वी पावसाळा संपून गवत वाळल्यानंतर आगपेटीच्या साहाय्याने जाळरेषा मारण्याचे काम वनविभाग व स्थानिकांकडून काही ठिकाणी केले जाई. आजही वणवा विझविण्यासाठी अशाच पद्धती अवलंबल्या जातात. हे काम काहीसे धोकादायक होऊ शकते, याची बरीच उदाहरणे आपल्याला माहिती असतील.

सगुणा वनसंवर्धन तंत्रात पावसाळा मध्यास हिरव्या गवतावर ग्लायफोसेट तणनाशक फवारून उभ्या आडव्या जाळ रेषा तयार केल्या जातात. पुढे या जाळरेषीतील गवत तेथेच मरून जाते. पुढे पडणाऱ्या पावसाने कुजून त्याचे उत्तम सेंद्रिय खत तयार होते.यामुळे जमिनीत विपुल प्रमाणात गांडूळ निर्मिती सुद्धा होते. यामुळे जाळरेषीतील पट्टा स्वच्छ होतो. बाहेरून कितीही मोठा वणवा आला तरी तो आपोआप माणसाच्या अनुपस्थितीतही थांबतो.डोंगरात उभे आडवे पट्टे असेच जाळ रेषा केल्यामुळे अपघाताने अगर हेतुपुरस्सर वणवा लावला/लागला गेल्यास डोंगराचा तितकाच भाग पेटेल. बाकी भाग सुरक्षित राहील.

आजपर्यंतच्या या समस्येवरील इतर मार्गात हा मार्ग सुरक्षित वाटतो. पुढे दरवर्षी पेटणाऱ्या डोंगरांचे संरक्षण करून तेथे वृक्षारोपणही त्यांनी केले. त्या ठिकाणी आता झाडे दिमाखात उभी राहिलेली दिसतात. तेथील जैवविविधतेमध्ये वाढ होऊन पाण्याचे झरे सुद्धा पुनरुज्जीवित झाले आहेत.

वन खात्यातील काही प्रमुख उच्चपदस्थ अधिकारी मंडळींनी या तंत्राची प्रत्यक्ष पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. अशा तंत्राचा व्यवहारात कसा उपयोग होऊ शकतो याचे एक उदाहरण ज्ञात आहे. कसारा घाटात दरवर्षी वणवा लागल्याने रेल्वे बराच काळ थांबून ठेवावी लागे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना या तंत्राची माहिती मिळताच त्यांनी समक्ष भेट देऊन सदर तंत्र कसारा घाटात राबवून देण्याची विनंती भडसावळे यांना मागील वर्षी केली. त्यांनी योग्य पद्धतीने तंत्राचा वापर केला. आता पुढे रेल्वे थांबून ठेवण्याची वेळ आली नाही.

जमिनीच्या धुपीचा अभ्यास

भातशेतीसाठी कराव्या लागणाऱ्या चिखलणी-लावणीमुळे मातीची प्रचंड प्रमाणात धूप होते. ही धूप किती होते हे आजपर्यंत आपणास ठाऊक नव्हते. ही धूप कोणत्याही संशोधन केंद्रांनी मोजण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. या धुपीमुळे जमिनी नापीकतेकडे वळत आहेत. आज आपल्यापुढे जमिनी नापीक होण्याचे कारण रासायनिक खते व तणनाशके यावर लादले जाते.

परंतु ते खरे नाही जमिनी नापीक होण्याचे मुख्य कारण हे सातत्याने केली जाणारी नांगरणी आहे. चिखलणी चालू असताना शेताच्या बांधामधून बाहेर वाहणाऱ्या चिखलयुक्त पाण्याची तपासणी केली असता, त्यामध्ये २० टक्के गाळ सापडला. हा प्रश्न आणखी सविस्तर अभ्यासण्यासाठी मागील वर्षी कोकणातील पाच जिल्ह्यातून १०० असे नमुने प्रत्यक्ष जागेला जाऊन गोळा केले.

धुपीमुळे जमिनीच्या सुपीकतेची नुकसान होते. हे अनेकांना माहीत आहे. परंतु, ते टाळण्याचा उपाय माहीत नाही. सापडत नाही. यामुळे आजही अनेक ठिकाणी चिखलणी चालूच आहे. एसआरटी पद्धतीने बियांची थेट टोकण करून भात शेती उत्तम प्रकारे होऊ शकते. हा त्यांचा गेल्या अकरा वर्षांचा अनुभव आहे. भाताप्रमाणे डोंगर उतारावर मशागत करून नाचणी, वरी, खुरासणी ही पिके घेतली जातात. पारंपारिक चिखलणीपेक्षा या डोंगरउतारावर मातीची जास्त धूप होते. याच एसआरटी तंत्राने नाचणीही उत्तम पिकते.

मातीच्या धुपीचा अभ्यास

अ.

क्र. चिखलणीसाठी वापरलेले अवजार एकूण नमुने धूप

(टक्के)

१. ट्रॅक्टर ५३ १५. २१

२. पॉवर टिलर २० १४. १३

३. लाकडी बैलाचा नांगर २३ ३. ३१

४. एसआरटी शून्य मशागत ४ ०

- प्रताप चिपळूणकर, ८२७५४५००८८,

(लेखक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

Sharad Pawar : केंद्राची नीती शेतकरी विरोधी, तर मोदींना शेतीचे मर्यादित ज्ञान

Water Pollution : हक्क हवेत, पण जबाबदारी कोण घेणार?

Sugarcane Burn Short Circuit : शॉर्ट सर्कीटने दोन एकरातील ऊस व ठिबक जळून खाक, लाखोंचे नुकसान

SCROLL FOR NEXT