Sesame Production Agrowon
ॲग्रो गाईड

Sesame Production : तिळाने उघडले संपन्नतेचे दार...

शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यामध्ये तिळासारखे तेलबियावर्गीय महत्त्वाचे ठरू शकते, हा विश्‍वास रुजविण्यात काजीपूर (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) येथील ओंकार काळमेघ यशस्वी ठरले आहेत.

Vinod Ingole

Indian Agriculture : विविध समस्यांमुळे गांजलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून यवतमाळची नकारात्मक ओळख पुसण्यामध्ये काजीपूरसारख्या गावांचा वाटा मोठा असणार आहे.

या गावातील शेतकरी कलिंगड, कांदा (Onion) आणि केळी (Banana) या सारख्या पिकातून आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत. आता त्याच्या जोडीला तीळ या तेलबिया पिकाखालील क्षेत्रही वाढत १८० एकरावर पोचले आहे.

भुईमूगाकडून वळले तिळाकडे...

२०१५ पूर्वी काजीपूर गावात भुईमूग मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र दरवर्षी सलग लागवडीमुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादन खालावत गेले.

भुईमूगाला पर्याय शोधताना गावातील युवा शेतकरी ओंकार जयवंत काळमेघ (पाटील) यांनी २००९ मध्ये प्रथम तिळाची लागवड केली. त्याला खर्च कमी होऊन चांगले उत्पादन मिळाल्याने हळूहळू तिळाखाली क्षेत्र वाढत गेले.

काळमेघ यांची शेती

ओंकार काळमेघ यांची वडिलोपार्जित अवघी तीन एकर शेती. या शेतीमध्ये सोयाबीन त्यात तुरीचे आंतरपीक घेतात. या पिकांची काढणी झाल्यानंतर तिळाची लागवड करतात. या शेतीसोबतच अन्य शेतकऱ्यांची १५ एकर शेतीही बटईने (भागीदारीत) करतात.

त्यातही सोयाबीन, तूर, कांदा यासोबतच तीळ लागवड करतात. सिंचनासाठी त्यांच्याकडे विहीर असून, अडाण नदीतून उपसा सिंचन योजना केली आहे. या नदीवरील भोपी प्रकल्पामुळे बारमाही पाण्याची उपलब्धता होते.

अशी होते लागवड

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तिळाची लागवड केली जाते. चाळणीतून शेणखत गाळून घेऊन, त्यात तीळ मिसळला जाईल. त्यानंतर सरत्याने मजुरांद्वारे एकरी चार किलो पर्यंत बियाणांची पेरणी केली जाई.

या वर्षी प्रथमच बैलचलित कांदा पेरणी यंत्राद्वारे ओंकार यांनी तीळ लागवडीचा प्रयोग केला. कारण कांदा बियाणेही तिळाप्रमाणे आकाराचे लहान असते. बैलाच्या चालीप्रमाणे बियाणे खाली पडते. कांदा लागवडीत ९ चकत्या असतात. त्यापैकी सहा बंद करून तीन सुरू ठेवल्या.

त्यामुळे सरासरी १५ इंचाच्या ओळीमध्ये प्रत्येक एक इंचावर बियाणे पडत जाते. एकसमान अंतरावर बियाणे पडत गेल्यामुळे एकरी दोन किलो बियाणे पुरेसे ठरले. सध्याची पिकाची वाढ पाहता उत्पादकताही पूर्वीच्या पाच क्विंटलवरून वाढून सहा ते सात क्विंटलपर्यंत जाण्याचा अंदाज ओंकार यांनी वर्तवला आहे.

बाजारपेठ

विदर्भातील बहुतांश बाजारपेठेत तिळाला फारशी मागणी राहत नाही. मात्र नांदेड जिल्ह्यातील भोकर बाजारपेठेत तिळाला चांगला परतावा मिळत असल्यामुळे पूर्वी तिळाची तिथे विक्री करत असे.

मात्र गेल्या हंगामापासून यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी बाजार समितीत विक्री सुरू केली आहे. गेल्या हंगामात तिळाला १२ ते १४ हजार रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला होता. प्रतीनुसार दर थोडा कमी अधिक होतो.

सरासरी १२ हजार रुपये असा दर मिळाला. या प्रमाणे तिळाच्या विक्रीसाठी संगमहिवरा (जि. यवतमाळ) येथेही चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. हळूहळू नवनव्या बाजारपेठेचे पर्याय खुले होतील, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटतो.

कांदा लागवड

ओंकार हे तीन एकरवर लाल कांदा लागवड करतात. व्यवस्थापनावर एकरी ५० हजार रुपये खर्च होतो, तर उत्पादन एकरी १५० क्‍विंटलपेक्षा अधिक मिळते. मात्र गेल्या हंगामात १३० क्‍विंटल इतकेच उत्पादन मिळाले होती.

कांद्याच्या दरामध्ये खूप चढ उतार होते. यवतमाळ भाजी बाजारात प्रति किलो कांद्याला १५ ते २२ रुपये दर मिळाले. सरासरी १८ रुपये प्रति किलो असा दर मिळाला. न्यतः ऑक्‍टोंबर अखेरीला कांदा लागवड करून फेब्रुवारी अखेरीस काढणीचे नियोजन असते.

हरभरा उत्पन्नाचा स्रोत

सहा एकरवर काबुली हरभऱ्याची लागवडही केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड करून फेब्रुवारीच्या पंधरवड्यात काढणीस येतो. हरभऱ्याचा उत्पादन खर्च एकरी २० हजार रुपये इतका राहतो. तर हरभऱ्याचे एकरी दहा क्‍विंटल उत्पादन मिळते.

पीकेव्ही-२ या वाणाला ६५०० रु., तर जाड (डॉलर) हरभऱ्याला ९००० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळतो. हे दोन्ही वाण सरासरी तीन एकरवर घेतले जातात.

सोयाबीन, तूर आंतरपीक पद्धतीही फायद्याची

तुरीची लागवड जून महिन्यात सोयाबीनच्या बरोबरीने केली जाते. सहा एकरावरील सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले जाते. तुरीचा एकरी व्यवस्थापन खर्च १५ हजार रुपयांवर होतो. या वर्षी तुरीचे एकरी दहा क्‍विंटल उत्पादन मिळाले. त्याला प्रति क्विंटल ८२०० रुपये असा दर मिळाला.

सोयाबीनचेही एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन हाती येते. त्याला सरासरी ५५०० रुपये इतका दर मिळतो. एकूणच सोयाबीन आणि तूर ही आंतरपीक पद्धती फायदेशीर ठरत असल्याचे ओंकार काळमेघ सांगतात.

तिळाचा ताळेबंद

एकरी उत्पादन खर्च ...(रुपये)

पंजी : ६००, रोटाव्हेटर : ८००, बियाणे २ किलो : ३००, पेरणी मजुरी व खत देणे : ३००, पीक संरक्षण व फवारणी : ७५०, डीएपी १ पोते : १३५०, युरिया १ पोते : २६६, निंदणी व खुरपणी : २०००, काढणी : २५००, तीळ झटकणे व साफ करणे : १५००, सुतळी : ३०० असे

एकूण -१०,६६६ रुपये

एकरी सरासरी उत्पादन - ५ क्‍विंटल

सरासरी दर - १२,००० रुपये

उत्पन्न - ६०,००० रुपये

खर्च वजा जाता निव्वळ नफा - ४९,३३४ रुपये

(पूर्वी आम्ही घेत असलेल्या भुईमूग पिकातून एकरी केवळ २० हजार रुपयांपर्यंत सरासरी नफा शिल्लक राहत असे. त्या तुलनेत तीळ हे अधिक चांगले वाटते.)

ओंकार काळमेघ (पाटील), ७२१८७२८५०९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management : सुदूर संवेदन माहितीसाठ्याचा प्रत्यक्ष उपयोग

Rajarambapu Sugar Factory : राजारामबापू साखर कारखान्याचे प्रदूषित पाणी कृष्णा नदीत, प्रदूषण मंडळाकडून नोटीस

Bribe News : सिंचन विहिरीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या कनिष्ठ सहायकाला अटक

Pumpkin Seed : भोपळा बियांचे आरोग्यदायी फायदे

Dairy Farming : डोंगराळ, जंगलमय करूळची दुग्ध व्यवसायात आघाडी

SCROLL FOR NEXT