Flower Farming
Flower Farming  Agrowon
ॲग्रो गाईड

ग्लॅडिओलस लागवडीसाठी योग्य वाणांची निवड

टीम ॲग्रोवन

डॉ. मोहन शेटे, शिवाजी गायकवाड, डॉ. सुनील लोहाटे

कंदवर्गीय फुलपिकांपैकी ग्लॅडिओलस (Gladiolus Cultivation) हे एक व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे फुलपीक (Flower Crop) आहे. जगभरात या फुलपिकाची (Floriculture) मोठ्या प्रमाणात लागवड होते. भारतामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई, बंगळूर आणि पुणे या मोठ्या शहरांच्या आजूबाजूच्या परिसरात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. ग्लॅडिओलस फुलांना (Gladiolus Flower) बाजारात चांगले दर मिळत असल्याने दिवसेंदिवस याचे लागवड क्षेत्र वाढत आहे.

हवामान ः

- कडक उन्हाळा आणि सततचा जोरदार पाऊस हा कालावधी वगळता वर्षभर ग्लॅडिओलसची लागवड करता येते. तरीही खरीप आणि रब्बी हेच दोन हंगाम प्रमुख मानले जातात.

- सरासरी २० ते ३० अंश सेल्सिअस तापमानात या पिकाची वाढ चांगली होऊन फुलांचे रंगही चांगले येतात. महाबळेश्‍वरसारख्या ठिकाणी उन्हाळा सौम्य असल्यामुळे हे पीक चांगले येते. या कालावधीत फुलांचा तुटवडा असल्याने बाजारभावदेखील चांगले मिळतात.

- वर्षभरातील बाजारभाव व फुलांची मागणी यांचा विचार करून संपूर्ण पिकाची एकाच वेळी लागवड न करता १५ ते २० दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने केल्यास फुलांना चांगला बाजारभाव मिळू शकतो.

जमीन ः

- मध्यम ते भारी प्रतीची, परंतु पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन या पिकास मानवते.

- चोपण, खारवट तसेच चुनखडीयुक्त जमीन या पिकास मानवत नाही.

- सर्वसाधारणपणे जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.

कंद निवड ः

किफायतशीर उत्पादनासाठी योग्य जातीची निरोगी आणि विश्रांती पूर्ण झालेल्या कंदाची निवड करावी. लागवडीपूर्वी कंद कॅप्टन ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवावेत. लागवडीसाठी ४ सेंमी किंवा त्याहून अधिक व्यास असलेले कंद निवडावेत.

लागवड पद्धती ः

- सरी, वरंबा, सपाट वाफे किंवा गादीवाफे पद्धतीने लागवड करता येते. सपाट अथवा गादी वाफा पद्धतीने लागवड करताना दोन ओळींत ३० सेंमी व दोन कंदांत १५ ते २० सेंमी अंतर ठेवावे.

- लागवडीसाठी सरी वरंबे पद्धती फायदेशीर ठरते. कारण या पद्धतीमुळे पाण्याचा योग्य निचरा होतो, लागवडीनंतर पिकांमध्ये कामे करणे सुलभ होते, तसेच फुलदांडे सरळ येण्यासाठी आणि फुले येऊन गेल्यावर कंदांचे योग्य पोषण होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने लागवड करताना दोन सरींत ४० ते ४५ सेंमी व दोन कंदांत १० ते १५ सेंमी अंतर ठेवावे. हेक्टरी साधारण सव्वा लाख ते दीड लाख कंद पुरेसे होतात.

जाती ः

व्यापारीदृष्ट्या लागवडीसाठी योग्य जातींची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम प्रतीच्या जातीच्या निकषांमध्ये फुलांचा आकर्षक रंग, फुलदांड्यावरील एकूण फुलांची संख्या कमीत कमी चौदा असावी. निवडलेल्या जातीची कीड व रोग प्रतिकारक आणि उत्पादनक्षमता चांगली असावी. विशेषतः लागवडीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील हवामानात चांगली येणारी असावी.

जातीचे नाव---फुले येण्यास लागणारे दिवस---फुलदांड्यावरील फुलांची संख्या---फुलांचा रंग

संसरे---७७---१७-१८---पांढरा

यलोस्टोन---८०---१५-१६---पिवळा

ट्रॉपीकसी---७७---१३-१४---निळा

फुले गणेश---६५---१६-१७---फिक्कट पिवळा

फुले प्रेरणा---८०---१४-१५---फिक्कट गुलाबी

सुचित्रा---७६---१६-१७---फिक्कट गुलाबी

नजराना---८१---१३-१४---गर्द गुलाबी

पुसा सुहागन---८४---१३-१४---लाल

हन्टिंग साँग---८०---१४-१५---केशरी

सपना---५९---१३-१४---पिवळसर सफेद

व्हाइट प्रॉस्पॅरिटी---८१---१५-१६---पांढरा

खत व्यवस्थापन ः

- लागवडीपूर्वी हेक्टरी ८० टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत चांगले मिसळून घ्यावे. माती परीक्षणानुसार ३०० किलो, नत्र, २०० किलो स्फुरद आणि २०० किलो पालाशची मात्रा द्यावी.

- लागवडीवेळी पालाश आणि स्फुरदची संपूर्ण मात्रा द्यावी. तर नत्र तीन समान हप्त्यांमध्ये विभागून लागवडीनंतर ३,५ व ७ आठवड्यांनी (अनुक्रमे २,४ आणि ६ पाने आल्यानंतर) द्यावे.

सिंचन व्यवस्थापन ः

- लागवडीनंतर पिकास आवश्यकतेनुसार नियमित सिंचन करावे. जमिनीच्या मगदुरानुसार दोन पाळ्यांमध्ये ७ ते ८ दिवसांचे अंतर ठेवावे.

- फुले काढल्यानंतरही पुढील काळात कंद वाढीसाठी एक ते दीड महिना नियमित सिंचनाची आवश्यकता असते.

- लागवडीनंतर १ ते २ खुरपण्या व महिन्यातून एकदा हलकीशी खांदणी करून पिकास मातीची भर द्यावी. पिकास मातीची भर दिल्यामुळे फुलदांडे सरळ येण्यास व जमिनीतील कंदाचे पोषण चांगले होण्यास मदत होते.

फुलांची काढणी व उत्पादन ः

- लागवडीनंतर निवडलेल्या जातीनुसार आणि कंदांना दिलेल्या विश्रांतीच्या काळानुसार ६० ते ९० दिवसांत फुले फुलू लागतात. त्यानंतर पुढे महिनाभर फुलांची काढणी चालू राहते. फुलांच्या दांड्यावरील पहिले फुलकळीच्या अवस्थेत असताना रंग दाखवून उमलू लागते. या अवस्थेतील फुलांचे दांडे छाटून घ्यावेत. झाडाच्या खालची पानांची छाटणी करू नये.

- फुलदांड्याच्या लांबीनुसार प्रतवारी करून १२ फुलांच्या दांड्यांची एक याप्रमाणे जुड्या बांधून त्याभोवती वर्तमानपत्राचा कागद बांधावा. अशा जुड्या खोक्यात भरून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवाव्यात.

उत्पादन ः

- एक हेक्टर क्षेत्रातून दीड ते दोन लाख फुलदांडे मिळतात. फुलांच्या दर्जेदार उत्पादनासाठी कंदाची काढणी आणि साठवण या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

- फुलदांडे काढताना झाडांवर चार पाने ठेवलेली असतात. या चार पानांच्या अन्नाशावर जमिनीत कंदांचे पोषण होते. सुमारे दीड ते दोन महिन्यांत झाडांची ही हिरवी पाने पिवळी पडून सुकू लागतात. अशा वेळी पिकास पाणी देणे बंद करावे.

- पाणी देणे बंद केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी जमिनीतील कंद काळजीपूर्वक त्यांना इजा न होता काढावेत.

- काढलेले मोठे कंद व लहान कंद कॅप्टन २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १५ ते २० मिनिटे भिजत ठेवावीत. त्यानंतर ३ ते ४ आठवडे कंद सावलीत सुकवून नंतर पोत्यात भरून शीतगृहात साठवून ठेवावेत. शीतगृहात साठवण केल्यामुळे पुढील पिकाची वाढ एकसमान होऊन फुले येण्याचे प्रमाण देखील वाढते. तसेच साठवणुकीत कंदकुज या रोगापासून कंदाचा बचाव होतो.

---------------------

- डॉ. मोहन शेटे, ९४०३४८९२२९

(विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT