Proso Millet
Proso Millet Agrowon
ॲग्रो गाईड

Proso Millet : आरोग्यदायी भगर

Team Agrowon

शुभांगी वाटाणे
पौष्टिक भगरीचा नवरात्रातील नऊ दिवसांच्या उपवासामध्ये (Fasting) लोकांनी नक्की वापर करावा. यासोबतच भगरीसारखे (Proso Millet) सकस अन्न फक्त उपवासासाठी न वापरता त्याचा रोजच्या आहारातही वापर वाढवला पाहिजे. भगरीपासून भगर डोसा, वरई (भगर) भात, वरई (भगर) भाकरी, भगर -शिंगाडा थालीपीठ, वरई (भगर) खीर असे अनेक पौष्टिक पदार्थ होऊ शकतात. यामुळे आपल्या शरीराला पोषक आहार (Healthy Diet) मिळून ऊर्जा टिकून राहील.

भगर किंवा वरई अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी ही वनस्पती ‘मिलेट्स’ प्रकारात मोडते. प्रोसो मिलेट हे वरईचे नाव आहे. आपल्या पारंपरिक खाद्यामध्ये उपवासाचे खाद्य म्हणून वरई परिचित आहे. त्यात बहुतांश सर्व पोषक घटकांची पूर्तता होत असल्याने अल्पोपहाराचा उत्तम पर्याय मानला जातो.
महाराष्ट्रामध्ये भगरीचे पीक प्रामुख्याने घाट व उपपर्वतीय विभागातील नाशिक, अकोले (जि. नगर), नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा, धुळे या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण विभागातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये घेतले जाते. हे पीक प्रामुख्याने उपवासाकरिता खाल्ले जात असले, तरी अनेक दुर्गम प्रदेशातील लोकांचे वरई हे प्रमुख अन्नही आहे.

भगरीचे आहारातील महत्त्व
भगर धान्यात स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिज व लोह या मूलद्रव्यांचे प्रमाण गहू आणि भात पिकापेक्षा चांगले आहे. यापासून भात, भाकरी, बिस्कीट, लाडू, शेवया, चकली, शेव इ. अनेक पदार्थ तयार केले जातात. उपवासाला वरईचा भात किंवा भाकरी खाल्ल्यामुळे कोणत्याही प्रकारचे पित्त होत नाही. त्यामुळे वरी आरोग्यास लाभदायक ठरते.

पौष्टिक घटक
१) यात अँटी ऑक्सिडन्ट घटकांचे प्रमाण भरपूर असून, ते शरीरातील धोकादायक अशा मुक्तकणांपासून (फ्री रॅडिकल्स) पेशींचे संरक्षण करतात. त्यामुळे त्वचा, केस यांचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.
२) वरईमध्ये ‘व्हिटॅमिन बी ३’ भरपूर असून, आहारात नियमित घेतल्यास पेलेग्रा या कुपोषणजन्य व्याधीपासून बचाव होऊ शकतो. पेलेग्रा ही व्याधी ‘बी ३- नियासीन’च्या कमतरतेमुळे होते. या त्वचा खरखरीत होऊन खवले पडू लागतात. ज्या व्यक्तींचा प्राथमिक आहार मांसाहार आहे, अशा लोकांनाही ‘B३’ची कमतरता जाणवू शकते. अशा व्यक्तींनी भगरीचा समावेश आहारात करावा.
३) यात तंतुमय पदार्थ (फायबर) भरपूर असून, पचनासही हलकी आहे. वरईमुळे भुकेचे शमन लवकर होते. वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारात वरईचा वापर वाढविल्यास फायदा होतो.
४) भगर खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तो दूर होतो. गॅसेस होत नाहीत. अपचनामुळे पोट दुखत असेल तर ते सुद्धा दुखायचे कमी होते.
५) भगरीमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. तांदूळ, गहू, ज्वारी या धान्यांपेक्षा भगरीत कॅलरी कमी असतात. जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊनही अंगात शक्ती येते. कॅलरी कमी असल्यामुळे वजन आटोक्यात ठेवण्यासाठीही भगर उपयुक्त ठरते.
६) भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे कर्बोदके (कार्बोहायड्रेट) प्रमाण कमी असलेले अन्न. भगरीमध्ये असलेले कर्बोदकेही पचायला अतिशय सोपी आहेत. अशा ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असलेल्या अन्नांचा आहारात वापर केल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेह असणाऱ्या लोकांनी भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर त्यांच्यासाठी ते फायदेशीर असते.
७) साधारण शंभर ग्रॅम भगरीतून १८.५ मिलिग्रॅम लोह मिळते. विशेषतः शाकाहारी लोकांसाठी भगर हा लोहाचा सर्वोत्तम स्रोत आहे.
८) भगरीत व्हिटॅमिन ‘सी’, ‘ए’ आणि ‘इ’ जास्त प्रमाणात असतात. भगरीत खनिजेसुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.

९) भगरीत सोडिअम नसल्यामुळे (सोडिअम फ्री फूड) रक्तदाब (बीपी) नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो.

शुभांगी वाटाणे, ९९२१३२९०९४
(कार्यक्रम सहायक गृहविज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, वाशीम)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT