Well Agrowon
ॲग्रो गाईड

Water Conservation : जलक्रांतीतून संपन्नतेच्या वाटेवर...

 गोपाल हागे

गोपाल हागे

Water Revolution : जलसंधारणाच्या कामांचा दीर्घकालीन व सर्वव्यापी बदल कसा होऊ शकतो हे पाहायचे असेल तर नांदुरा (जि. बुलडाणा) तालुक्यातील कमळजा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जावे लागेल. कधीकाळी दुष्काळाच्या फेऱ्यात अडकलेल्या कंडारी, खैरा व बेलुरा या इथल्या गावांत जलसंधारणाच्या कामांतून जलक्रांती होत चित्र पूर्ण पालटले आहे. ही गावे आज संपन्नतेच्या वाटेवर आहेत.

विदर्भात किंवा राज्याच्या काही भागांत जुलैचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी यंदा मुबलक पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्याचे चित्र आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील कंडारी गावाचे शिवार मात्र हिरवळीने दाटलेले दिसून आले. गावशिवारातील प्रत्येक शेतात कपाशीचे पीक डोलत होते. गावात प्रवेश करताच संपन्नतेची झलक दिसून आली. सुमारे सहाशे लोकवस्तीच्या या गावातील प्रत्येक घरात सिमेंट काँक्रिटचे, सुंदर शाळा, घरोघरी मुबलक पाणी पुरवठा अशी अनेक सुविधांची रेलचेल बघायला मिळत होती. हा बदल कसा घडला त्यामागील वाटचाल जाणून घेणे गरजेचे आहे.

दुष्काळाच्या फेऱ्यात

बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा तालुक्यामधील बेलुरा, खैरा, कंडारी ही गावे काही वर्षांपूर्वी दुष्काळाच्या फेऱ्यात अडकली होती. टँकरच्या पाण्यावर उन्हाळा काढावा लागे. शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष सुरू होता. अजिंठा पर्वत रांगेत उगम पावणाऱ्या कमळजा नदीवर कंडारी गावाशेजारी १९८४ ते १९८७ दरम्यान लघुसिंचन प्रकल्प झाला. सुमारे २५० हेक्टर सिंचन क्षमतेच्या या प्रकल्पातून तेवढे सिंचन मात्र होऊ शकले नाही. नदी गावापासून १४ किलोमीटर पुढे निंबोळा येथे नद्यांच्या त्रिवेणी संगमात विलीन होते. प्रकल्पाचा कंडारी गावाला फायदा झाला. पण बारमाही वाहणारी नदी खंडित होऊ लागली. प्रकल्पाच्या खालील भागातील गावांमधील शेतीवर परिणाम झाला. दुष्काळाची समस्या काही सुटेना. टँकरने पाणीपुरवठा करण्याचीच वेळ होती. दरम्यान २०२९ च्या दरम्यान शासनाने जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रम हाती घेतला. टप्प्याटप्प्याने बेलुरा, खैरा, कंडारी गावांची निवड त्यात झाली.

लोकसहभाग ठरला महत्त्वाचा

अभियानांतर्गत जलसंधारणाची विविध कामे पूर्णत्वास गेली. त्यात ग्रामस्थ, कृषी विभाग, जिल्हा परिषद, मृद- जलसंधारण विभाग आदींचा सहभाग महत्त्वाचा ठरला. तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पुरषोत्तम अंगाईत, तत्कालीन कृषी सहाय्यक पुरुषोत्तम वनारे, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री.मोरवाल, सिंचन मित्र मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, तत्कालीन सरपंच सीमा विनोद मेहेंगे (बेलुरा), रमेश मापारी, रवींद्र मापारी (खैरा), शिवाजी पाटील कंडारी, उपसरपंच, सदस्य,ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी आदींचा त्यात समावेश राहिला. यंत्रांसाठी भारतीय जैन संघटना व डिझेलसाठी लोकवर्गणी उपयोगी ठरली.

जलसंधारण कामांचे फलित

-कंडारी, खैरा, बेलुरा या तीन गावांतील सुमारे अडीच ते तीन हजार लोकसंख्येला थेट फायदा.
-१५ गावांना पिण्याचे पाणी.
-कंडारीतील विहिरी पुनर्जिवित झाल्या. (या गावातील संपूर्ण सिंचन विहिरींवर आधारित)
-कंडारीची जमीन खडकाळ आहे. पण गाळ उपसा व वापरातून अनेक शेतकऱ्यांच्या शेताची सुपीकता वाढण्यास मदत झाली.

-खरीप, रब्बीसह वर्षभर भाजीपाला पिके घेणे शक्य झाले. त्यातून शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावला.
-पावसाचे पाणी जमिनीत जिरविले जाऊ लागले.
-पाण्याचा मोजका वापर सूक्ष्म सिंचन पद्धतीने सुरू झाला. शंभर टक्के संरक्षित सिंचनाची सोय.--
-आज गावशिवारातील विहिरींवरून दुसऱ्या गावांसाठी टँकर भरून दिले जातात.

झालेली कामे (दृष्टीक्षेपात) (इन्फो)

गाव- बेलुरा
-कमळजा नदीवर नवे तीन मोठे बंधारे निर्मिती व खोलीकरण. हेच काम खैरा येथेही झाले.
-नदीवरील जुना कोल्हापूर बंधारा अर्धबंद, दुरुस्ती व खोलीकरण.
- स्थानिक नाल्यावरील मातीनाला बंधारा खोलीकरण व गाळ काढणे.
- नाल्यावरील १२ जुन्या बंधाऱ्यातून गाळ काढणे व खोलीकरण. असेच काम खैरा येथे झाले.
- पाणी पुरवठा विहिरीजवळ खोलीकरण व विहीर बळकटीकरण
-ग्रामपंचायतीकडून वृक्षलागवड

गाव- खैरा
-बेलुरात झालेली बहुतांश कामे येथे झाली.
-जुन्या काळातील वसंत बंधाऱ्यांचे खोलीकरण.
-सिमेट नालाबांध, खोलीकरणात यंत्राचा मोठा सहभाग

गाव- कंडारी

-प्रकल्पातील हजारो ब्रास गाळ काढला.
- कमळजा नदीवर दोन नवे सिमेट बंधारे निर्मिती व खोलीकरण.
-नदीवर पाच ठिकाणी खोलीकरण व डोह निर्मिती.
-स्थानिक नाल्यांवर सहा ठिकाणी गॅबियन बंधारे निर्मिती व खोलीकरण.
-शेतरस्त्याच्या आजूबाजूला चर खोदणे व मुरूम- मातीमधून सहा किलोमीटर शेतरस्ते निर्मिती.


जिथे पाणी गेले तिथे विकास झाला असे म्हटले जाते. भौगोलिक स्थिती, भूगर्भरचना, चार महिने पडणारे पावसाचे विषम प्रमाण यावर मात करून संपूर्ण शेती हिरवीगार व सुजलाम् सुफलाम् होण्यास मदत झाली. शासनाकडून मूलस्थानी जलसंधारण हा कार्यक्रम गतिमान ठेवणे आवश्यक आहे.
- रामकृष्ण पाटील कुटे, रा. पोटा, ता. नांदुरा
(अध्यक्ष, सिंचन मित्रमंडळ जिल्हा बुलडाणा)
९८२३७८२८८६)

विविध जलसंधारण कामे, शेतरस्ते यात शेतकऱ्यांनीही खर्च उचलला आहे. आज परिसर पाणीदार असून शेतकऱ्यांची प्रगती वेगाने होत आहे.
- शिवाजी पाटील, पुरस्कार प्राप्त शेतकरी, कंडारी
९८५०२३७४४५

सन २०१७-२८ मध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून सहा विहिरी उपलब्ध झाल्या. याद्वारे तसेच टाकरखेड येथून टँकरद्वारे नागरिक व जनावरांची तहान भागवली. आज गावात १०० विहिरी असून ७० टक्के विहिंरीना पाणी आहे. ठिबकवरील पूर्वहंगामी कपाशी व उन्हाळ्यात मका ही प्रमुख पिके आहेत. पूर्वी पाच- सात एकर शेती असणारे उन्हाळ्यात शहरात रोजगारासाठी जात. आज हे स्थलांतर थांबले आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी, तरुणांचा चमू दरवर्षी कोल्हापुरी बंधाऱ्यात श्रमदान करतो. त्यात पाणी अडवण्यात येते.
सीमा विनोद मेहेंगे, उपसरपंच, बेलुरा (मो.७०६६७९७९५८)

माझी साडेपाच एकर शेती आहे. पूर्वी शेतातील विहीर १० वर्षांपासून कोरडी पडली होती. शेतापासून काही अंतरावर दोन बंधारे झाल्याने नशीबच पालटले. ४५ फूट खोल विहिरीतून
तीन ते चार तास पंप चालेल एवढे पाणी मिळते. ठिबकच्या वापरातून संपूर्ण शेतात कपाशी लागवड करू शकलो. पुरेसा पाऊस नसतानाही पीक घेता येत आहे.
-विष्णू काशिराम गणगे, रा. खैरा, ता. नांदुरा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT