Water Conservation : पाण्याचे संवर्धन करुन त्याचा काटकसरीने वापर करावा

Rain Update : पाऊस कमी पडो की अधिक, पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीनेच वापर याची आता सर्वांनी सवयच लावून घेतली पाहिजेत.
Water Conservation
Water ConservationAgrowon
Published on
Updated on

Sowing Update : मृग नक्षत्र लागून १० दिवस होऊन गेले आहेत. आता दोन दिवसांनंतर सूर्याचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होईल. परंतु अजूनही भुई भेगाळलेलीच असून पुरेशा पावसाअभावी राज्यभर पेरण्या रखडल्या आहेत. खरिपाच्या १४२ लाख हेक्टरपैकी केवळ एक लाख ४४ हजार हेक्टरवर, अर्थात खरीप पिकाखालील एकूण क्षेत्रापैकी केवळ १.२९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे.

बहुतांश धरणे तळ गाठून आहेत. विहिरी, तलाव कोरडे पडल्याने फळे-भाजीपाला अशी पिकेही धोक्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. ऐन पावसाळ्यात राज्यात जवळपास दोन हजार वाड्यावस्त्यांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरू असून, पाऊस लवकर आला नाही तर अजून काही गावांची त्यात भर पडू शकते.

लांबलेल्या पावसाने एकंदरीतच शेतकऱ्यांचे खरीप पेरणी नियोजन बिघडणार आहे. मूग, उडीद अशा कमी कालावधीची कडधान्ये पेरणीतून बाद होतील. उशिरा पेरणी झालेल्या पिकांच्या उत्पादनातही घट होईल.

मॉन्सूनच्या उर्वरित काळात समाधानकारक पाऊस पडला नाही, तर रब्बी, उन्हाळी हंगामही धोक्यात येऊन देशाच्या अन्नसुरक्षेला धक्का बसू शकतो. त्यामुळेच लवकरच पाऊस पडू दे, अशा विनवण्या शेतकरी वर्गातून चालू आहेत.

मृगाच्या दमदार पावसाने शेतशिवारात चैतन्य पसरते. मात्र सध्या शेतशिवारात भयाण शांतता आहे. शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहतोय. खरे तर या वर्षी कमी पावसाचा अंदाज एप्रिलमध्ये वर्तविण्यात आला होता. परंतु शासन-प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. आता पाऊस लांबत असताना केवळ पेरण्यांची घाई नको, असे न सांगता लांबलेल्या पावसानुसार कोणती पिके घ्यायची याचे आपत्कालीन नियोजन कृषी विभागाने शेतकऱ्यांना द्यायला हवे.

Water Conservation
Rain Update In Maharashtra : राज्यात अल्पशा पावसाची शक्यता

बदलत्या पीक पेरणी नियोजनानुसार सर्व निविष्ठांची पूर्तता शेतकऱ्यांना होईल, हेही पाहायला हवे. पाऊस कमी पडून टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली, की आपल्याकडे पाण्यावर विचार सुरू होतो, हे योग्य नाही. आपल्याकडे सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला तरी अनेक गावांत उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते.

त्यामुळे पाऊस कमी पडो की अधिक, पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीनेच वापर याची आता सर्वांनी सवयच लावून घेतली पाहिजेत. या वर्षी तर कमी पाऊस आहेच, त्यामुळे पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरेल, नाहीतर भूपृष्ठावर तो साठवून ठेवला जाईल, तसेच शेती असो की उद्योग, त्याचा वापर मोजून मापूनच होईल, याची काळजी घेतली गेली पाहिजे.

पाऊस-पाण्याचा संबंध केवळ कमी उत्पादन, पाणीटंचाई एवढ्या पुरताच मर्यादित नाही, तर आपल्या देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतोय. पाणीटंचाईने अनेक उद्योग-व्यवसायही अडचणीत येतात. कोयनेचा एक विद्युतनिर्मिती संच पाण्याअभावी बंद पडल्याने वीजटंचाई देखील निर्माण होऊ शकते.

सध्या पाऊस लांबल्याने देशाच्या अनेक भागांत उष्णतेची लाट सुरू आहे. उष्णतेच्या लाटेने उत्तर प्रदेश, बिहारसह उत्तरेकडील राज्यांत मागील चार दिवसांत १०० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर गुजरात, राजस्थानमध्ये वादळी पावसाचा हाहाकार सुरू आहे.

उन्हाळाभर सुरू असलेला पाऊस, आता त्याने ऐन पावसाळ्यात मारलेली दडी हे सर्व हवामान बदलाचे परिणाम आहेत. हवामान बदलाचे चटके जगाला मागील दोन दशकांपासून बसत आहेत. अनेक प्रगत देश याचा सविस्तर अभ्यास करून त्यावर मात करण्याचे उपाय शोधून काढत आहेत. आपल्याकडे मात्र चर्चेच्या पुढे हा विषय गेला नाही.

पावसाचा बदलत्या पॅटर्नसह एकूणच बदलत्या हवामानाचा अभ्यास आपल्याकडे झाला पाहिजेत. एवढेच नव्हे, तर त्याला संशोधनाची जोड देऊन बदलत्या हवामानात तगेल असे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसह पाऊस-पाण्यावर आधारित सर्वांना मिळायला पाहिजेत. असे झाले तरच भविष्यात शेतीत शेतकरी टिकतील अन् येथील अन्नसुरक्षा अबाधित राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com