Grape Advisory
Grape Advisory Agrowon
ॲग्रो गाईड

Grape Advisory : सद्यःस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापन

डॉ. आर. जी. सोमकुंवर 

गेल्या आठवड्यातील वातावरणाचा विचार केला असता काही ठिकाणी पाऊस जास्त झाला, तर काही ठिकाणी नुसतेच ढगाळ वातावरण (Cloudy Weather) दिसून आले. कोणत्याही परिस्थितीमध्ये या वेळी बागेतील तापमानात घट झाली, आर्द्रताही वाढली. परिणामी, बागेतील वेगवेगळ्या अवस्थेतील द्राक्ष वेलीमध्ये काही विपरीत, तर काही चांगले परिणाम होताना दिसून येतात.

कलम यशस्वी होण्यासाठी
सध्या कलम करण्याचा हा योग्य कालावधी असून, बागेत आवश्यक त्या द्राक्ष जातीची निवड करून कलम करून घ्यावे. कलम यशस्वी होण्यासाठी बागेतील तापमान (३० ते ३५ अंश सेल्सिअस) आर्द्रता (८० ते ९० टक्के) असावे. योग्य प्रकारच्या खुंटकाडी व सायन काडीची निवड केली पाहिजे.


कलमाच्या यशस्वितेसाठी बागेतील वातावरण, खुंटकाडी व सायन काडी या सोबतच कलम करणाऱ्या व्यक्तीची कुशलताही तितकीच महत्त्वाची असते. कलम करताना वापरलेले प्लॅस्टिक हे कलमजोडाभोवती व्यवस्थितरीत्या बांधावे. अशा काडीमध्ये लवकर कॅलस तयार होऊ शकते. अन्यथा, त्यात हवा शिरल्यास पाचर कलम सुकून जाईल किंवा पावसाचे पाणी आत गेल्यास कलमजोड कुजण्याची भीती असते. काही ठिकाणी बऱ्याच दिवसापासून पाऊस झाला नसल्याचीही स्थिती असेल, अशा ठिकाणी बागेत आर्द्रता कमी असेल किंवा खुंटकाडी रसरशीत नसेल. तेव्हा बागेत कलम करण्याच्या तीन ते चार दिवसआधी पाणी द्यावे. बोद पूर्णपणे भिजवून घ्यावा. त्यामुळे काडी रसरशीत होण्यास मदत होईल. कलम यशस्वी होईल.


खुंटकाडी निवड
- जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरापर्यंत काडी सरळ, सशक्त आणि रोगमुक्त असली पाहिजे.
- ती रसरशीत असावी. कलम करण्यासाठी निवडलेली काडी कोवळी ते अर्ध परिपक्व असावी. अशा प्रकारच्या काडीमध्ये रस निर्मिती चांगली असते.
- काडीची वाढ जोमदार असावी. पेऱ्यातील अंतर वाढलेले असल्यास जोम चांगला आहे, असे म्हणता येते.

सायन काडी निवड
-कलम करण्यासाठी निवडलेली सायन काडी ही पूर्ण परिपक्व असावी.
- परिपक्व काडीमध्ये पीथ पूर्णपणे तयार झालेला असावा. अशा काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा पुरेसा असून, हे कलम यशस्वी होण्यास मदत होईल.
- निवडलेली सायन काडी ही रोगमुक्त आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वेलीची असावी.
-सायन काडी निवडतेवेळी पानगळीसाठी रसायने वापरलेल्या बागेतून सायन काडी निवडणे टाळावे. जर अगदीच आवश्यक असल्यास रसायनांची फवारणी केल्यानंतर पहिल्या तीन दिवसांच्या आतच काडी घेतल्यास फारसे नुकसान होणार नाही. रसायनांच्या वापरामुळे पानगळ होऊन आधीच डोळे कापसलेले असल्यास कलम केल्यानंतर लगेच डोळे फुटून फुटीच्या सुकण्याची समस्या उभी राहू शकते.
- निवडलेली काडी रोगमुक्त राहण्यासाठी कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात दोन ते तीन तास भिजवून ठेवावी.

२) नुकतीच फळछाटणी झालेली बाग


गेल्या आठवड्यात फळछाटणी झालेल्या बागेत सध्या पोंगा ते घड बाहेर पडण्याची अवस्था दिसून येईल. या काळात जर पाऊस झालेला असल्यास वेलीमध्ये जिबरेलिन्सचे प्रमाण जास्त वाढते आणि सायटोकायनीनची पातळी कमी होते. अशा वेळी वेलीचा जोम जास्त वाढतो. पोंगा अवस्थेत बागेत जरी जोम दिसत नसला तरीही वाढ जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास काडीतील घड एकतर जिरण्याची किंवा गोळीघडात रूपांतर होण्याची समस्या उद्भवेल. ही परिस्थिती टाळण्यासाठी वेलीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे असेल. यासाठी ०-०-५० अर्धा ते एक ग्रॅम किंवा ०-५२-३४ अर्धा ते एक ग्रॅम किंवा ०-९-४६ पाऊण ते एक ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे पोटॅशच्या दोन ते तीन फवारण्या करता येतील. तसेच ०-०-५० अडीच ते तीन किलो प्रति एकर या प्रमाणे ठिबकद्वारे देऊन जमिनीतून सुद्धा पालाशची पूर्तता करता येईल. या सोबत सायटोकायनीनयुक्त संजीवकांचा वापर (उदा. ६ बीए १० पीपीएम या प्रमाणे) फवारणीद्वारे करता येईल.


या वातावरणात घड कुजण्याची समस्या जास्त प्रमाणात दिसून येते. फळछाटणीनंतर फेलफूट काढण्याची अवस्था साधारणतः १४ ते १७ दिवसांच्या कालावधीत दिसून येईल. या वेळी घडही व्यवस्थित दिसतील. तेव्हा निघालेल्या घडांचा विचार करून आवश्यक तितके घड राखून अनावश्यक फुटी किंवा द्राक्ष घड नसलेल्या फुटी त्वरित काढून टाकाव्यात. त्यामुळे कॅनॉपीमध्ये हवा खेळती राहील व आर्द्रता कमी होऊन कुजीची समस्या राहणार नाही. या वेळी बागेमध्ये पालाश, झिंक आणि बोरॉन यांचा वापर तितकाच महत्त्वाचा असेल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर, ९४२२०३२९८८
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

Poultry Management : तापमान नियंत्रणासाठी पोल्ट्रीशेडवर कोरडा चारा, पाचट, पाण्याचे फवारे

Drought Update : ‘बाहत्तर’च्या दुष्काळाची आठवण होतेय ताजी

Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

Onion Export : कांदा निर्यातीची खोटी बातमी देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल - अनिल घनवट

SCROLL FOR NEXT