सां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत नुकत्याच आलेल्या महापुरात द्राक्ष बागा सापडल्या. या भागात सतत पाऊसही झाला, त्यामुळे द्राक्ष बागेत पाणी साचून राहिले. काही भागांत द्राक्षवेलींच्या वर ४-५ फूट पाणी जवळपास ११-१२ दिवस राहिले. त्यानंतर बागेतून पाणी निघून गेले. अशा द्राक्षवेलीमध्ये शरीरशास्त्रीय हालचाली, घडामोडी होत आहेत, त्या सद्यःस्थितीमध्ये परवडणाऱ्या नाहीत. काही बागेत द्राक्ष बाग पाण्यात नसली तरी सततच्या पावसामुळे बागेत काहीच कार्यवाही करणे शक्य झाले नाही. परिणामी, रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्याचे चित्र दिसत आहे. काही बागांमध्ये खालील प्रमाणे परिस्थिती असेल, त्यामध्ये बागेत पुढील कामे करावीत.
बागेत काहीच पाने शिल्लक नाहीत ज्या द्राक्ष बागा १०-१२ दिवस पाण्यात होत्या. पाणी गेल्यानंतर वेलीवरील सर्व पाने सुकली. बागेतून पाणी निघून गेल्यानंतर आता तापमान वाढत असून, आर्द्रता १०० टक्क्यांपर्यंत आहे. ज्याप्रमाणे आपण रूटस्टॉकची काडी पिशवीत लावण्यापूर्वी २४ तास पाण्यात ठेवतो. बाहेर काढल्यानंतर काडीची जी अवस्था दिसते, त्याप्रमाणे या बागेतील काडीची अवस्था दिसते. या ठिकाणी काडीवर एकही पान शिल्लक नाही. काडीसुद्धा शेंड्यापर्यंत परिपक्व झाली आहे. अशा परिस्थितीत बागेत वाढत्या आर्द्रतेमध्ये डोळा फुटायला सुरुवात होते. साधारण परिस्थितीत शेंड्याकडील डोळा आधी फुटतो. मात्र बागेत काडीवरील सर्वच डोळे फुटताना दिसतील. अशा बागेत फळछाटणी लवकर घ्यावी. कारण बागेतील परिस्थिती एक आठवड्यानंतर छाटणी घेण्यायोग्य वाटत असली वातावरणामुळे दुसऱ्याच दिवशी काडीवरील डोळे कापसायला सुरुवात झालेली दिसेल. अशा बागेत सतत पाहणी करून बागेचा आढावा घेणे गरजेचे असेल. काडीवरील डोळे कापसायला सुरुवात झाल्यास फळछाटणी घेणे फायद्याचे राहील. या बागेत नवीन फुटी लवकर आणि जोरात निघतील. काही कालावधीनंतर वाढ थांबलेली दिसेल. नदीतून आलेला गाळ ज्या बागेत गोळा झाला, त्या बागेत जुन्या बोदावर काही इंच चिकणमातीचा थर जमा झालेला असेल. हा मातीचा थर ऊन पडल्यानंतर कडक झाला तरी त्याखालील जुनी माती जास्त काळ ओलसर राहू शकते. म्हणून अशा बागेत माती मोकळी करून घ्यावी. जास्त काळ मुळे पाण्यात राहिल्यास ती काम करणार नाहीत. वेलीमध्ये उपलब्ध अन्नद्रव्य नवीन फुटी निघण्यासाठी वापरले जाईल. मात्र पुढील काळात अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी मुळे कार्यरत करणे गरजेचे आहे.
बागेत पावसापूर्वी काडी परिपक्व झालेली नसल्यास
काही बागेत उशिरा खरड छाटणी झाल्यामुळे पावसाच्या कालावधीत काडीची परिपक्वता फक्त सुरू झाली होती. अशा बागेत सबकेनच्या १-२ डोळा आधीपासून किंवा सबकेनच्या दोन डोळ्यांच्या पुढे काडी कच्ची होती. या बागेमध्ये आता डोळे फुटायला सुरुवात होते. ज्या ठिकाणी पुढील भागात काडी जास्त कच्ची आहे, अशा वेलीवर पुढे जास्त फुटी फुटतील. मात्र काडी कच्ची असल्यामुळे डोळे फुटण्याचा वेग काडीच्या शेंड्याकडे जास्त असेल. या बागेत ८-१० दिवस किंवा जास्त काळ थांबता येईल. तेव्हा पुढील वाढ जितक्या लवकर होईल, तितका मागील आवश्यक डोळा सुप्तावस्थेत जाईल. यावेळी नवीन निघणाऱ्या हिरव्या फुटीमध्ये जास्त अन्नद्रव्य वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी शेंड्याकडील फक्त एका डोळ्यातून निघालेली फूट राखून मागील डोळे थांबवण्याचा प्रयत्न करतील. मात्र असे करू नये. शेंड्याकडील २-३ फुटी ४-५ पाने होईपर्यंत वाढवणे गरजेचे आहे. या वेळी वेलीमध्ये काडीवर डोळे फुगणे व हिरवी फूट निघणे अशा घडामोडी घडत असतील. या दोन्ही घटकांतील समतोल साधणे गरजेचे आहे. चार, पाच पाने आल्यानंतर शेंडा खुडून पालाशची फवारणी व जमिनीतून उपलब्धता करावी. काडीमध्ये अन्नद्रव्य जमा होईल. फक्त जोमदार पावसात अडकलेली द्राक्ष बाग
या बागेत सतत पाऊस सुरू होता. परंतु बागेत पाणी जमा राहिले नाही किंवा बाग पाण्यात बुडाली नाही. या बागेत आता रोग व किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. ज्या बागेत नवीन फुटी काढल्या गेल्या असून आता फक्त जुनी पाने आहेत, काडीची परिपक्वतासुद्धा झाली आहे किंवा शेवटच्या टप्प्यात आहे, अशा बागेमध्ये पानांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. पानाच्या खालील बाजूस पिवळ्या रंगाची भुकटी जमा झाल्याचे चित्र दिसते. जास्त प्रमाणात रोग असलेल्या परिस्थितीत हे जिवाणू पानामधून रस शोषून घेतात. त्यामुळे पान अशक्त होतील आणि नंतर पाने गळायला सुरुवात होईल. बऱ्याचशा बागेत तांबेराचा ७० ते ८० टक्के प्रादुर्भाव दिसून येतो. तांबेरा (रस्ट) रोगाच्या नियंत्रणाकरिता, हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर किंवा टेट्राकोनॅझोल ०.७५ मि.लि. प्रतिलिटर किंवा फ्युझिलॅझोल १२.५ मि.लि. प्रति १०० लिटर पाणी किंवा डायफेनोकोनॅझोल ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी (यापैकी एक किंवा आलटून पालटून) प्रत्येक पाच दिवसांच्या अंतराने फवारणी घ्यावी. टेब्युकोनॅझोल ०.५ मि.लि. प्रतिलिटर किंवा टेब्युकोनॅझोल ०.५ मि.लि. अधिक ट्रायफ्लॉक्सीस्ट्रॉबीन १.७५ मि.लि. प्रतिलिटर पाणी (टॅंक मिक्स) याप्रमाणे फवारणी केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. ज्या बागेत तांबेरा नाही किंवा कुठेतरी प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसते, अशा बागेत क्लोरोथॅलोनील २ ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी प्रतिबंधात्मक घ्यावी. पुढे अडचण येणार नाही. ट्रायझोल गटातील बुरशीनाशकांच्या दोन फवारण्यानंतर क्लोरोथॅलोनील किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साइडची फवारणी रोगाचा पुढील प्रसार थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. सतत व जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे आता बागेत आर्द्रता जास्त वाढली असेल. अशा बागेत नवीन फुटींचा जोम जास्त राहील. या बागेत करपा (ॲन्थ्रॅक्नोज) रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. अशा बागेत थायोफिनाईट मिथाईल किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. करपा रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा बागेत फ्लुओपायरम अधिक टेब्युकोनॅझोल (टॅक्स मिक्स) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे ५-७ दिवसांच्या अंतराने फवारणी महत्त्वाची असेल. काही बागेत डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. नवीन निघालेल्या फुटीवर रोगाचा प्रादुर्भाव लवकर येण्याची शक्यता असेल. या परिस्थितीत बागेतील नवीन फुटी त्वरित काढाव्यात. याचसोबत पोटॅशिअम सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ॲसिड ४ ग्रॅम प्रतिलिटर पाणी किंवा मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. मॅन्कोझेबच्या फवारणीमुळे डाउनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासोबत बॅक्टेरीयल लिफ स्पॉटवरही नियंत्रण मिळणे सोपे होईल.