डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. अजयकुमार उपाध्याय
Grape Grafting : ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून नवीन द्राक्ष बागेची लागवडीची आठवण येते. या महिन्यात द्राक्षवेलीची कलम करण्याचा हा महत्त्वाचा कालावधी असतो. नवीन द्राक्ष लागवड ही दोन प्रकारे केली जाते. एकतर जमिनीत खुंटाची लागवड करून, नंतर त्यावर आवश्यक त्या जातीचे कलम करणे किंवा तयार असलेल्या कलमरोपांची लागवड करणे. खुंट रोपांची लागवड केलेल्या बागेत (जानेवारी - फेब्रुवारी) या वेळी कलम करण्याकरिता आवश्यक त्या जाडीची काडी तयार झालेली असावी. साधारणतः ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात कलम करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी आवश्यक असलेल्या खुंटाची व सायन काडीची गरज कशी असते, याची माहिती घेऊ.
खुंट काडीची तयारी ः
जानेवारी - फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या खुंट रोपांची वाढ या वेळी बऱ्यापैकी झाली असावी. काही बागेत जूनमध्ये रिकट घेतल्यानंतर या वेळी बऱ्याचशा फुटी जमिनीतून निघालेल्या असतील. आपल्याला कलम करण्यासाठी सर्वच फुटींचा गरज नसते. खालील निकष पूर्ण केलेल्या फुटींचा कलम करण्यासाठी वापर करावा.
१) खुंटरोपाची काडी रसरशीत असावी. कलम करतेवेळी ही काडी जितकी रसरशीत राहील, तितके कलम यशस्वी होण्याची शक्यता वाढते. यालाच सॅप फ्लोसुद्धा म्हटले जाते. अर्ध परिपक्वतेपर्यंत असलेल्या काडीमध्ये रसाचे प्रमाण जास्त असते. त्यात रसनिर्मिती चांगली होऊन, वहनही चांगले होते. खुंट काडी परीपक्व झालेली असल्यास त्यातील रसाचे प्रमाण कमी असते. तसेच पूर्ण कोवळ्या काडीमध्येही अपेक्षित रसनिर्मिती होत नाही. त्याचा परिणाम कलमाच्या यशस्वितेवर होतो.
२) खुंट काडीही जमिनीपासून सव्वा ते दीड फुटांपर्यंत जवळपास ८ ते १० मि.मी. (पेन्सिलच्या जाडीची) असावी. इतक्या जाड काडीमध्ये कलम यशस्वी झाल्यानंतर नवीन फूट तयार होईपर्यंत अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता असते. ही जाडी मिळण्याकरिता फुटींवर निघालेल्या बगलफुटी कमी करणे, तसेच अनावश्यक फुटी कमी करून साधारणतः तीन ते चार फुटी राखणे गरजेचे असेल. इतक्या फुटी असल्यास दोन फुटीवर कलम करण्यासाठी निवड सोपी होते.
३) सरळ आणि सशक्त खुंटकाडी महत्त्वाची ः जूनमध्ये रिकट घेतलेल्या बागेत या वेळी चोवीस ते पंचवीस फुटी दिसून येतील. यापैकी सशक्त अशा सरळ वाढणाऱ्या तीन ते चार फुटी राखून काढून घ्याव्यात. कलम करण्याकरिता दोन आठवड्यांचा कालावधी असल्यामुळे ज्या खुंटाची आवश्यक ती जाडी मिळाली नाही, अशा ठिकाणी बगलफुटी दोन टप्प्यांत काढून खत व्यवस्थापन सांभाळावे. या वेळी जमिनीतून ठिबकद्वारे युरिया एक ते सव्वा किलो प्रति दिवस (आठ ते दहा दिवस) उपलब्धता करावी. या वेळी पावसाचे वातावरण असल्यामुळे जमीन वाफशामध्ये राहील, अशा प्रकारे बागेतील नियोजन करावे. परिणामी, मुळे कार्यरत राहतील. या वेळी इतर खतांचा वापर फायद्याचा नसेल.
सायन काडीची निवड ः
सायन काडी निवडताना बागेत काही गोष्टी महत्त्वाच्या असतील.
- ज्या वेलीवरून सायन काडी काढणार आहोत, ती वेल रोगमुक्त व अधिक उत्पादन देणारी असावी.
- निवडलेली सायन काडी ही पूर्ण परिपक्व असणे गरजेचे आहे. काडी कच्ची असल्यास कलम केल्यानंतर लवकर डोळे फुटतात. दोन ते तीन पाने अवस्थेत पाने सुकायला सुरुवात होते. शेवटी कलम मरते. कारण या कच्च्या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा मुळीच नसतो. कलम करतेवेळी आपण फक्त दोन डोळ्याची काडी घेतो. त्या काडीमध्ये फारसे अन्नद्रव्य तसेही नसते.
- वेलीवरील काडी निवडताना सबकेनच्या आधी तीन ते चार डोळे व सबकेननंतर तीन ते चार डोळे वापरल्यास कलम यशस्वी होण्यास मदत होते. काडी पूर्णपणे परिपक्व झाले ही समजण्यासाठी त्या काडीमधील पिथ हा पूर्णपणे तपकिरी रंगाचा झालेला असावा. कच्च्या काडीतील पिथ हा पांढरा किंवा दुधाळ रंगाचा असतो. बऱ्याचदा कलम करण्यासाठी सबकेनच्या पुढे चार डोळे सोडून पुढील भागातील काडीचा वापर केला जातो. मात्र या काड्यामध्ये अन्नद्रव्यांचा साठा मुळीच नसल्यामुळे कलम यशस्वी होण्यात अडचणी येतात.
-निवडलेली सायन काडी ठिसूळ व गोल असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा बागेत अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास काडी चपटी दिसून येते. चपट्या काडीमध्ये अन्नद्रव्याचा साठा कमी असतो. काडीची परिपक्वता झालेली नसल्यास बागेत शेंडा पिंचिंग त्वरित करून घ्यावे. पालाशची फवारणीद्वारे (०-०-५० हे खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे दोन ते तीन फवारण्या) आणि जमिनीतून सव्वा ते दीड किलो प्रति एकर या प्रमाणे चार ते पाच वेळा पूर्तता करणे गरजेचे असेल.
द्राक्ष जातींची निवड ः
द्राक्ष लागवड करतेवेळी बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन सायन काडीची निवड करावी. निर्यातक्षम द्राक्ष जातीमध्ये थॉमसन सीडलेस, तास ए गणेश, माणिक चमन, सुपर सोनाका, सोनाका इ. हिरव्या जाती, तर सरीता सीडलेस, नानासाहेब पर्पल, रेड ग्लोब, क्रिमसन सीडलेस, फॅण्टसी सीडलेस, फ्लेम सीडलेस इ. रंगीत जातींची निवड करता येईल.
बेदाण्याच्या उद्देशाने लागवड करण्यासाठी थॉमसन सीडलेस, मांजरी किशमीश या जातींची निवड करता येईल. पुढील काळात रंगीत बियांच्या बेदाण्याची बाजारपेठेमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रंगीत बियांच्या जातींचा विचार करणे गरजेचे असेल.
प्रत्यक्ष कलम करणे ः
कलम करतेवेळी बागेतील तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि ८० ते ९० टक्के आर्द्रता असे वातावरण गरजेचे असेल. या सोबत खुंटकाडी ही रसरशीत असणे व पाचर कलम करतेवेळी कलमजोड हा प्लॅस्टिकची पट्टीने व्यवस्थित बांधून घेणे गरजेचे असते. बऱ्याच ठिकाणी कलम करण्याच्या कालावधीत पावसाला खंड पडलेला असतो. अशा स्थितीत सायन काडीमध्ये रसनिर्मिती कमी होते. अशा परिस्थितीतील असलेल्या बागेत कलम करण्याच्या आधी तीन ते चार दिवस भरपूर पाणी द्यावे. त्याचा फायदा काडीमध्ये रसनिर्मितीला होतो. कलम केल्यानंतर बागेत उन्हे जास्त असल्यास सायन काडीच्या टोकावर मेण लावून घ्यावे. कलम केल्यानंतर साधारणतः १५ ते १६ दिवसांत सायनकाडीवरील डोळ्या फुटण्यास सुरुवात होते. त्यापूर्वी खुंटकाडीवरील सकर्स भरपूर प्रमाणात दिसून येतील. वेळीच सकर्स काढून घ्यावेत. अन्यथा, डोळे फुटणार नाहीत. डोळे लवकर फुटण्यासाठी बागायतदार हायड्रोजन सायनामाइडचे पेस्टिंग करतात. यामुळे काडी लवकर फुटून काही दिवसांतच ती फूट जळण्यास सुरुवात होते. परिणामी, कलम यशस्वी होणार नाही. त्यासाठी हायड्रोजन सायनामाइडचा वापर या बागेत टाळावा. त्यापेक्षा डोळा फुगलेल्या अवस्थेत जमिनीतून नत्राचा वापर फायद्याचा ठरेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.