Team Agrowon
ॉद्राक्ष बागेत पावसाचे पाणी साचल्यामुळे द्राक्ष वेलीची मुळे कार्यक्षम राहत नाहीतं. अशावेळी द्राक्ष वेली स्वतःचा बचाव करण्यासाठी वेलीच्या काडी, ओलांडा व खोडांवरील भागांवर मुळे तयार करते. याला ‘एरियल रूट्स’ असेही म्हणतात.
जमिनीत जोपर्यंत पाणी साचलेले आहे, तोपर्यंत वेलीवर तयार झालेली ही मुळे कार्य करून आपली गरज पूर्ण करते. पाऊस संपल्यानंतर किंवा जमिनीतून पाणी निघून गेल्यानंतर जमीन वाफश्यात आल्यानंतर तेव्हा पुन्हा बोदात थोडे खोदून मुळे तपासल्यास पांढरी मुळे तयार होताना दिसतील.
एरियल मुळांमुळे मुळे सुकणे व जमिनीतील मुळे तयार होणे यातील कालावधी जास्त राहिल्यास मात्र घडाच्या विकासात किंवा काडीमध्ये अन्नद्रव्य साठविण्यात अडथळे निर्माण होतात.
बऱ्याचशा बागेत सध्याच्या वातावरणामुळे शेंडा वाढ जास्त प्रमाणात दिसून येते. त्यामुळे शाकीय वाढ जास्त प्रमाणात होते. त्यामुळे द्राक्ष बागेत रोगाचा प्रादुर्भावही वाढतो.
जास्त प्रादुर्भाव झालेल्या स्थितीमध्ये फुटींची वाढ होत नाही व घडाचा विकासही थांबतो. यावर मात करण्यासाठी शेंडा पिंचिंग करणे, बगलफुटी काढणे, फुटी तारेवर बांधून घेणे इ. उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.
पोषक वातावरण असल्यामुळे रोगनियंत्रणासाठी जैविक नियंत्रकांचा वापर फायद्याचा राहील. यासाठी मांजरी वाईनगार्ड २ मिलि किंवा बाजारात उपलब्ध असलेला ट्रायकोडर्मा ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे चार दिवसांच्या अंतराने तीन ते चार फवारण्या करून घ्याव्यात.
मांजरी ट्रायकोशक्ती १० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणे ड्रेंचिंग करून घ्यावे. दहा दिवसाच्या अंतराने चार ते पाच वेळा ठिबकद्वारे ड्रेचिंग केल्यास रोग नियंत्रण सोपे होईल.