डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ, डॉ. संजय भोयर, डॉ. विशाखा डोंगरे
Nutrient Management : सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळपिकांवर अनिष्ट परिणाम दिसून येतात. याचा थेट फळपिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यासाठी कमतरतेची लक्षणे ओळखून आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्यांचा प्रमाणशीर वापर करणे आवश्यक आहे.
पिकाची अपेक्षित वाढ, उत्पादन आणि पोषणासाठी अन्नद्रव्यांचा प्रमाणशीर वापर अत्यंत आवश्यक आहे. एकूण १७ पोषक अन्नद्रव्यांपैकी १४ अन्नद्रव्यांचा वापर जमिनीमधून केला जातो. त्यातील नत्र, स्फुरद व पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाची आहेत. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये कमी प्रमाणात; तर लोह, मंगल, जस्त, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम, निकेल आणि क्लोरिन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये अत्यंत अल्प प्रमाणात आवश्यक असतात.
सातत्याने जास्त उत्पादन देणारी पीक पद्धती आणि रासायनिक खतांच्या अतिवापर यामुळे मातीमध्ये अन्नद्रव्ये पुनर्भरण योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता फळपिकांमध्ये दिसून येते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे फळझाडांमध्ये विविध प्रकारची विकृतीची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे फळांची गुणवत्ता, पौष्टिकता आणि उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
राज्यात मोसंबी, संत्रा, लिंबू, डाळिंब, द्राक्षे, आंबा, पेरू, केळी, पपई इ. फळपिकांमध्ये जस्त, लोह, बोरॉन आणि मंगल या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जास्त दिसून येते. त्यामुळे या फळपिकात योग्य व संतुलित प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते. माती परीक्षण करून जमिनीतील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखता येते. माती परीक्षण न केल्यास झाडांच्या पानांवरून कमतरतेची लक्षणे ओळखता येतात.
जस्त (झिंक)
महत्त्व
लिंबूवर्गीय फळे, आंबा, डाळिंब, पेरू, पपई, द्राक्षे इत्यादींमध्ये महत्त्वाचे.
मॅग्नेशिअमचे प्रमाण वाढल्यास जस्ताचे प्रमाण कमी होते. स्फुरदाच्या जास्त वापरामुळे जस्त कमतरता निर्माण होते.
कमतरतेची लक्षणे
फांद्याची किंवा शेंड्याची वाढ मर्यादित होऊन पर्णगुच्छ तयार होतो.
पानांचा आकार लहान व निमुळता होतो.
लिंबूवर्गीय फळपिकांत फळगळ होते.
जुन्या पानांच्या मध्यशीर आणि इतर शिरांजवळचा भाग हिरवा राहतो. इतर भागावर तपकिरी ठिपके पडून शेवटी पाने पिवळी दिसतात.
पानगळ होते. फळांचा आकार लहान होतो. साल पातळ होते.
उपाय
झिंक सल्फेट ४० ग्रॅम किंवा चिलेटेड झिंक २० ग्रॅम (यापैकी एक) अधिक चुना ३० ते ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या घ्याव्यात. किंवा
माती परीक्षण अहवालानुसार, झिंक सल्फेट २ ते ८ किलो प्रति एकर याप्रमाणे तीन वर्षांतून एक वेळ जमिनीद्वारे द्यावे.
मंगल (मँगेनीज)
महत्त्व
पिकांच्या जैविक आणि जैव- रासायनिक क्रियांना उत्तेजित करते.
वनस्पतीमध्ये मॅग्नेशिअमचे प्रमाण वाढल्यास जस्त व मंगल यांचे प्रमाण कमी होते.
कमतरतेची लक्षणे
नवीन पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग हळूहळू पिवळा होतो. नंतर पांढरट व करडा होऊन संपूर्ण पान फिक्कट होऊन गळून पडते.
उपाय ः
चिलेटेड मंगल २० ग्रॅम किंवा मँगेनीज सल्फेट ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
मँगेनीज सल्फेट ४ ते १० किलो प्रति एकर प्रमाणे कमतरतेच्या प्रमाणानुसार जमिनीद्वारे वापर करावा.
तांबे (कॉपर)
महत्त्व
वनस्पतींच्या श्वसन आणि प्रकाश संश्लेषणामध्ये उत्प्रेरक म्हणून आवश्यक.
हरितद्रव्ये निर्मितीमध्ये मदत करते.
कमतरतेची लक्षणे
शेंड्याची कोवळी पाने गर्द हिरवी होऊन नंतर फिक्कट पिवळी होतात. वाढ खुंटते. पाने गळून पडतात.
पाने देठाजवळ वाकतात, दुमडतात. शेंडा सुकून जातो.
खोडांची वाढ कमी होऊन वेडीवाकडी होतात.
लिंबूवर्गीय झाडांमध्ये डायबॅकचा प्रादुर्भाव दिसून येतो. फुलगळ होते.
उपाय
मोरचूद ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा बोर्डो मिश्रणाची फवारणी घ्यावी.
बोरॉन
महत्त्व
डाळिंब, संत्रा, मोसंबी, पेरू, पपई इ. फळपिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे.
फळाची गुणवत्ता, आकार आणि चव उत्तम राखण्यासाठी आवश्यक.
नवीन पेशी व उतींच्या निर्मितीसाठी तसेच पिष्टमय पदार्थांच्या वहनास चालना मिळते.
पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते.
कमतरतेची लक्षणे
झाडाची कोवळी मुळे व शेंडे सडतात.
नवीन फुटव्याच्या टोकाकडील पाने फिक्कट होऊन आकसतात.
मुख्य शेंडा सुकून मरतो. त्यामुळे बगल डोळे फुटतात.
पाने पिवळी पडून जाड, रखरखीत व कडक होतात.
नवीन पालवी, फुले, फळे, पाने, खोड यांचा आकार बिघडतो.
खोडावर भेगा पडून ठिसूळ बनतात.
कच्ची फळे गळून पडतात. मोठ्या फळावर तांबडे ठिपके पडतात. फळे कडक होऊन भेगा पडतात.
द्राक्षामध्ये फळे छोट्या आकाराची आणि आंबट होतात.
उपाय
आवश्यकतेनुसार तीन वर्षांतून एक वेळ बोरॅक्स १ ते २ किलो प्रति एकर प्रमाणे मातीमध्ये मिसळून द्यावे. मात्र मातीमधून जास्त प्रमाणात वापर करणे टाळावे. शिफारशीत मात्रेत वापर करावा. फळझाडांना फुलधारणा होण्याच्या एक आठवडा आधी आणि संपूर्ण फुलधारणा झाल्यावर बोरॅक्स २० ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
फळपिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर
विद्राव्य खत वापर प्रमाण (प्रति १० लिटर पाण्यासाठी)
बोरॅक्स (बोरॉन १०.५ टक्के), बोरीक ॲसिड (बोरॉन १७.५ टक्के), सोल्युबर (बोरॉन १९ टक्के फळे तडकल्यास, झाडाचा शेंडा व कोवळी पाने पांढरट झाल्यास, फुले धरत नसल्यास बोरॅक्स किंवा बोरीक ॲसिड २० ग्रॅम प्रमाणे कोमट पाण्यात विरघळते.
फेरस सल्फेट (लोह १९ टक्के, गंधक १०.५ टक्के), चिलेटयुक्त आयर्न ईडीटीए (लोह १२ टक्के) झाडांची वाढ खुंटून शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा पडल्यास फेरस सल्फेट (०.४ टक्का) ४० ग्रॅम, चिलेटयुक्त आयर्न ईडीटीए (०.२ टक्के) २० ग्रॅम.
झिंक सल्फेट (जस्त २१ टक्के), झिंक ऑक्साइड (जस्त ५५ ते ७० टक्के), चिलेटयुक्त झिंक ईडीटीए (जस्त १२ टक्के) पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा झाल्यास, पाने कमी लागल्यास आणि झाडांची वाढ खुंटल्यास झिंक सल्फेट (०.३ ते ०.५ टक्के) ३० ते ५० ग्रॅम, चिलेटयुक्त झिंक (ईडीटीए ०.२ टक्के) २० ग्रॅम.
पीडीकेव्ही द्रवरूप मायक्रोग्रेड II फळझाडांना ताण संपल्यानंतर फुले येण्यापूर्वी व फळ धारणेवेळी पहिली फवारणी ५० मिलि व दुसरी फवारणी १०० मिलि.
डॉ. ज्ञानेश्वर कंकाळ, ८२७५१५२५५७
(मृद् विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.